VIDEO - भगवानगडाला पोलिसांचा पडला गराडा !
By admin | Published: October 10, 2016 08:48 PM2016-10-10T20:48:41+5:302016-10-10T20:48:41+5:30
गडाच्या पायथ्यापासून ते गडावरील नामदेवशास्त्रींच्या निवासस्थानापर्यंत पोलीसांचा पहारा...भक्तनिवासाजवळ आणि प्रसादालयाजवळही पोलीसांचा बंदोबस्त. गडावर जागोजागी
Next
>प्रताप नलावडे/ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 10 - गडाच्या पायथ्यापासून ते गडावरील नामदेवशास्त्रींच्या निवासस्थानापर्यंत पोलीसांचा पहारा... भक्तनिवासाजवळ आणि प्रसादालयाजवळही पोलीसांचा बंदोबस्त. गडावर जागोजागी पोलीसांची आणि प्रशासनाची वाहने. ठिकठिकाणी भक्तगण बसलेले. गडाच्या प्रवेशद्वारावर लाकडी बॅरागेटींग लावून एकावेळी एकालाच प्रवेश करता येईल, अशी व्यवस्था केलेली. एकूणच भगवान गडाला पोलीसांचा गराडा पडलेला. मंगळवारी साजºया होत असलेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची सगळ्यांच्याच चेह-यावर चिंता स्पष्टपणे जाणवणारी. सिमोल्लंघन निर्विध्न पार पडावे, असे भक्तांशी बोलताना स्पष्टपणे जाणवत होते.
भगवान गडावरील सोमवारचे हे चित्र. गडाच्या पायथ्यापासून गडाकडे जाताना थोडेसे अंतर पुढे गेल्यानंतर डाव्या बाजुला रस्त्याच्या कडेलाच हेलीपॅड तयार करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू होते. शासकीय वाहने तेथेच थांबलेली. हेलीपॅडला अधिक सुरक्षित करण्यासाठी कडेने गोलाकार लाकडी बॅरागेटींग लावण्याचे काम सुरू होते. काही महिला आणि पुरूष तेथे गवत काढण्याचे काम करत होते तर एक रोड रोलर फिरत होता.
तेथून फर्लांगभर अंतरावर गडाचे मुख्य प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या बाजुलाच वाहने लावण्याची जागा आहे. तेथे अनेक इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांच्या ओबी व्हॅन थांबलेल्या. नेहमीपेक्षा वाहनांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणात जाणवणारी. प्रवेशद्वाराजवळ उभ्या केलेल्या लाकडी बॅरागेटींगजवळ गडावरील स्वयंसेवक थांबलेले. आत कोण जातय आणि कोण बाहेर पडतय यावर त्यांचे लक्ष. गडाच्या कमानीवरही चार-दोन स्वयंसेवक बसलेले. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर समोरच भगवानबाबांचे मंदिर आहे. मंदिरात दर्शनासाठी जाणाºया भाविकांची गर्दी दिसत होती. त्याचवेळी गडाच्या आवारात आणि मंदिराच्या सभा मंडपात घोळक्या घोळक्याने भक्तगण बसलेले. गडावरचे हे सगळे चित्र नेहमीपेक्षा अगदी वेगळे आणि वर्धापन दिनाच्या उत्साहापेक्षाही हे चोवीस तास कधी उलटतात, याचीच चिंता अधिक असलेले.
प्रवेशद्वाराजवळच उजव्या बाजुला एक भक्तनिवास आहे. परंतु यावेळी तेथे भक्तांऐवजी खाकी वर्दीतील पोलीसांची गर्दी दिसत होती. मंगळवारच्या बंदोबस्त वाटपाचे काम तेथे सुरू होते. स्टेनगनधारी पोलीसही अधून मधून दिसत होते. आवारात सगळीकडेच पोलीसांच्या गाड्या आणि गाड्यांमधून बसलेले पोलीस दिसत होते. मंदिराच्या बाजुलाच गडावर सर्वात शेवटी नामदेवशास्त्री यांचे निवासस्थान आहे. बाहेर भक्तांची गर्दी होती. त्यांच्या निवास्थानाच्या प्रवेशद्वारावरही चार-पाच पोलीस आणि दोन स्टेनगनधारी पोलीस बंदोबस्तासाठी तैनात होते. नामदेवशास्त्री बाहेर येऊन पोलीसांना ‘त्याला आत येऊ द्या...अमुकला सोडा आत...असे सांगत होते. त्यानंतरच त्यांच्या निवासस्थानात प्रवेश देण्यात येत होता. आतमध्ये प्रशस्त जागेत दोन चार लोक सोफ्यावर बसलेले. दोन-चार लोक मधल्या पॅसेजमध्ये उभे राहून आत येणाºयांच्या चहापाण्याची व्यवस्था करत होते.
गडावरचे नेहमीचे धार्मिक वातावरण असे एखाद्या दंगलग्रस्त भागाप्रमाणे दिसत होते. कोणी कोणाशी फारसे बोलत नव्हते. नामदेवशास्त्री तेथेच बसलेले. आलेल्या भक्तांशी एक-दोन शब्द बोलायचे आणि पुन्हा अगदी निर्विकार बसून रहायचे. मध्येच कोणीतरी येऊन त्यांच्या कानाशी लागायचे. बहुदा ताज्या घडामोडींचे अपडेट ते देत असावेत. मध्येच कोणीतरी येऊन टीव्हीवर अमुक बातमी सुरू आहे म्हणून सांगायचे. नामदेवशास्त्री केवळ स्मीतहास्य करायचे. पुन्हा वातावरण काही क्षणात गंभीर होऊन जायचे.
पन्नास दिवसापासून गड सोडला नाही - नामदेवशास्त्री
गेली पन्नास दिवसापासून मी गड सोडलेला नाही. स्वत:ला बंदिस्त करून घेतले आहे. गडाचे राजकारण करणारे लोक उद्या माझ्यावर काहीही आरोप करून मला बदनाम करू शकतात. त्यामुळे मी दसरा मेळाव्यावरून वादंग सुरू झाल्यापासून गडच सोडलेला नाही. एका महंतावर अशी वेळ यावी, यापेक्षा वाईट वेळ ती कोणती असू शकते, असे सांगत नामदेवशास्त्री ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, हा गड राजकारणातून मोकळा करण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. गडावर राजकीय भाषण करण्यासाठी पंकजा यांना पोलीसांनी परवानगी दिली नसल्याचे मला समजले. असे असेल तर खºया अर्थाने गडाचा श्वास मोकळा झाला, असे मी मानतो. त्यांनी गडाच्या पायथ्याला मेळावा घेतला तर त्याला आपला आक्षेप असण्याचे काहीही कारण नाही.