VIDEO : उत्साह मंगळागौरीच्या खेळाचा
By admin | Published: August 9, 2016 12:02 PM2016-08-09T12:02:15+5:302016-08-09T12:24:10+5:30
श्रावण महिन्यास सुरूवात होताच सर्व महिलांना वेध लागतात ते मंगळागौरीचे.. रात्रीच्यावेळी झिम्मा, फुगड्या, गाठोडी, जातं यांसारखे विविध खेळ खेळून रात्र जागविण्याचा प्रघात आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ९ - श्रावण महिन्यास सुरूवात होताच सर्व महिलांना वेध लागतात ते मंगळागौरीचे.. रात्रीच्यावेळी झिम्मा, फुगड्या, गाठोडी, जातं यांसारखे विविध खेळ खेळून रात्र जागविण्याचा प्रघात आहे.
हारल ग..गाडल...तुला कुणी मारल
सासू नी मारलं...
कसं कसं मारलं
अस अस मारलं...
सासुरवाशिनी मोकळे होण्यासाठी माहेरी येतात. पण तेथेही प्रत्यक्ष काही बोलता येत नाही. मग गाण्यातूनच सांगावे लागतं. नव्याने लग्न झालेली माहेरवाशिणीच्या मैत्रीणींचा गप्पांचा कट्टा म्हणजे मंगळागौर. आधुनिक युगातही श्रावणातील मंगळागौर आपले महत्व टिकून आहे.
श्रावणसरी बरसू लागल्या की महिलांना सणांचे वेध लागतात. मंगळागौर हेही श्रावणातल्या मंगळवारी ठेवले जाणारे विशेष व्रत. नव्याने लग्न झालेली महिला मंगळागौरीच्या निमित्ताने माहेरवाशिण म्हणून घरी येते. तेव्हा आपल्या मैत्रिणींशी तिच्या रंगणा-या गप्पा, नातेवाईकांशी हसण्याखेळण्यात रमलेली ही लाडकी लेक माहेरपणात अक्षरश: रमून जाते.
कीस बाई कीस दोडका कीस
दोडक्याची फोड लागते गोड
आणिक तोड बाई आणिक तोड
कीस बाई कीस दोडका कीस
माझ्यानं दोडका किसवेना
दादाला बायको शोभेना
कीस बाई कीस दोडका कीस
कधी आपला लाडका दादा इतका चांगलाय की त्याला बायको शोभत नाही असे म्हणत भावाचे कौतुक करते.
जय देवी मंगळागौरी
सुवासीन मी तुला पुजिते
कुंकुम-तिलक माझ्या ललाटी
मंगल-मणी हे शोभत कंठी
रत्न-पाचूचा चुडा मनगटी
स्त्रीजन्माचे अहेव लेणे
तुज्या कृपेने मला लाभते
पतीला दिर्घायुष्य मिळावे म्हणून मंगळागौरीचे व्रत ठेवले जाते. यामध्ये सकाळच्या वेळात नव्याने लग्न झालेल्या मुलींना सवाष्ण म्हणून बोलावून एकत्रित पूजा केली जाते.
नाच ग घुमा कशी मी नाचू
या गावचा त्या गावचा कसर नाही आला
बांगड्या नाही मला कशी मी नाचू
नाच ग घुमा कशी मी नाचू
या गावचा त्या गावचा सोनार नाही आला
पाटल्या नाही मला कशी मी नाचू
नाच ग घुमा कशी मी नाचू
कधी मला बांगड्या नाहीत, पाटल्या घेतल्या नाहीत, म्हणून नाराजी व्यक्त करते. माहेरच्य प्रेमापुढे सासरचं काहीच आवडत नाही.
चला चला गं चला सया
चला गं चलाफेर धरू चला
मंगळागौरीचे खेळ खेळू चला
गोल करू चला फेर धरू चला
मंगळागौरीला जागवूया चला
रात्रीच्यावेळी झिम्मा, फुगड्या, गाठोडी, जातं यांसारखे विविध खेळ खेळून रात्र जागविण्याचा प्रघात आहे.
आता महिलांना नोकरीच्या निमित्ताने पुरेसा वेळ नसला तरीही या सणाच्या निमित्ताने एकत्रित येऊन खेळांची मजा आजही तितक्याच उत्साहाने लुटली जाते. यानिमित्ताने शारीरिक व्यायाम तर होतोच पण महिला एकत्रित आल्याने त्यांचा वर्षभराचा शीण निघून जाण्यास निश्चितच मदत होते