VIDEO- गॅसचा टँकर उलटल्यानं घोडबंदर रोडवर वाहतुकीची कोंडी
By Admin | Published: July 3, 2017 05:24 PM2017-07-03T17:24:27+5:302017-07-03T21:55:19+5:30
ऑनलाइन लोकमत ठाणे, दि. 3 - घोडबंदर मार्गावरील काजुपाडा येथे ज्वलनशील एलपीजी गॅसने भरलेला टँकर उलटून गॅस गळती सुरु ...
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 3 - घोडबंदर मार्गावरील काजुपाडा येथे ज्वलनशील एलपीजी गॅसने भरलेला टँकर उलटून गॅस गळती सुरु झाल्याने दुपारी साडेबारा वाजल्या पासुन रात्री उशीरा पर्यंत येथील वाहतूक बंद करण्यात आली होती. या मुळे दोन्ही दिशेने वाहनांच्या ४ ते ५ किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या.
उरणवरुन १८ टन एलपीजी गॅस भरलेला मोठा टँकर घोडबंदर मार्गावरुन वसईच्या दिशेने जात होता. काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काजुपाडा येथील अपघाती वळणावर चालकाचे नियंत्रण सुटून टँकर रस्त्यावरच उलटला. टँकर उलटताच त्यातून गॅसची काही प्रमाणात गळती सुरू झाली. त्यामुळे परिसरात एकच घबराट माजली.
वाहतूक पोलिसांसह काशिमीरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. टँकरमधून गॅसची गळती होत असल्याचे पाहून ठाण्याकडून येणारी वाहने काजुपाडा येथेच अडवून धरण्यात आली. तर भार्इंदर-मुंबई-वसईकडून येणारी वाहतूक चेणे गावाजवळच रोखून धरण्यात आली. नेहमी प्रचंड वर्दळ असलेला घोडबंदर मार्ग बंद झाल्याने दोन्ही दिशेला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. शेकडो लोकं अडकून पडली. बहुतांशी लोकांनी पायपीट करत वरसावे नाका वा नागला गाठले.
टँकरमधून होणारी गॅस गळती पाहता परिसर रिकामा करण्यात आला. मोबाईल, वीज पुरवठ्यासह आग लागेल अशा सर्वच गोष्टी बंद करण्यात आल्या. मीरा भार्इंदर महापालिका व ठाणे महापालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. गॅसने भरलेला टँकर असल्याने क्रेनने उचलण्यात धोका असल्याने अग्नीशमन दलाने टँकरवर पाण्याचा मारा सुरू ठेवला. अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत कदम, तहसीलदार किसन भदाणे, पालिका उपायुक्त दीपक पुजारी, अग्निशमन दल प्रमुख प्रकाश बोराडे, मंडळ अधिकारी लक्ष्मण पवार, चौधरी, पोलीस निरीक्षक जगदीश शिंदे, राम भालसिंग, धनाजी कलंत्रे, वैभव शिंगारेंसह पोलीस, महसूल व पालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उरण येथून रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलं. पण त्यांना यायला उशीर होणार म्हणून अखेर दुपारी चार वाजता थांबलेली वाहनं माघारी वळवण्यात आली. भिवंडी - कामण मार्ग तेच मुंबईतील मार्गांवरून वाहतूक वळवण्यात आली.
सायंकाळी भारत पॅट्रोलियमची रेस्क्यू टिम आल्या नंतर रात्री उशीरा पर्यंत टँकर क्रेनने सरळ करण्याचा प्रयत्न सुरु होता. टँकर क्रेनने उचलून सरळ केल्यावर त्यातील गॅस हा रॅस्क्यू टीमने आणलेल्या दोन टँकर मध्ये भरण्यात येणार होता. त्या मुळे रात्री उशिरापर्यंत घोडबंदर मार्गावरील वाहतूक सुरू होऊ शकली नव्हती.
धोकादायक वळण व बाचकवणारे पालिकेचे होर्डिंग अपघातास कारणीभूत
काजूपाडा चे हे वळण अतिशय तिव्र आहे. या ठिकाणी नेहमीच लहान मोठया वाहनांना अपघात होत असतो. त्यामुळे अपघाती वळण म्णुनच कुप्रसिध्द आहे. परंतु या वळणावरच महापालिकेने प्रचंड मोठे लोखंडी फ्रेमचे होर्डिंग उभारलेले आहे. सदर होर्डिंग मोठे असुन वळणावरच असल्याने वाहन चालक येथे बाचकतात. या मुळे देखील अपघात होत असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.