VIDEO - मेघालयातल्या या मुलीला आहे मराठीचं प्रेम
By Admin | Published: June 29, 2017 02:34 PM2017-06-29T14:34:59+5:302017-06-29T17:44:31+5:30
ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 29 - खासी जनजातीय पारंपरिक पोेषाख परिधान केला म्हणून दिल्लीच्या उच्चभ्रू वर्तुळात मेघालयातील एक महिलेस अपमानाला ...
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 29 - खासी जनजातीय पारंपरिक पोेषाख परिधान केला म्हणून दिल्लीच्या उच्चभ्रू वर्तुळात मेघालयातील एक महिलेस अपमानाला सामोरं जावं लागलं. या परवाच्या घटनेनं ईशान्येसह सर्वदूर देशात असंतोष पसरलेला असताना नाशिक शहरात मात्र त्याच मेघालयाच्या लेकी आयुष्याचा एक नवा अध्याय घडवत आहेत. त्यातलीच एक मालसीलीन, नाशकातच दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ती उच्चशिक्षणासाठी पुन्हा नाशकात परतली आहे, तेही शिक्षणाच्या आणि इथल्या माणसांच्या ओढीनं !
आता उत्तम मराठी बोलणारी मालसीलीन नाशकात आली तेव्हा फक्त नऊ वर्षांची होती. मेघालयात जयंतिया खासी हिल्स परिसरातील ही मुलगी. वडिलांचं अकाली निधन झालं. घरात भाऊबहीण मिळून आठ भावंडं. ही सगळ्यात लहान. आईनं धीर करून शिकायला एवढ्या लांब पाठवलं. आधी दोन वर्षे पुण्यात आणि मग नाशिकच्या रा.स्व. संघ संचलित पूर्वांचल विकास समितीच्या वसतिगृहात तिच्या राहण्या-जेवणाची सोय झाली. तिच्यासह मेघालयातील मुली इथं वस्तीस आहेत आणि विद्या प्रबोधिनी प्रशाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेत आहेत.
मालसीलीनही विद्या प्रबोधिनी प्रशाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दहावीपर्यंत शिकली. नुकतीच ती ८५.८० टक्के गुण मिळवून उत्तीर्णही झाली. एसएससी बोर्डाच्या परीक्षेत मराठी भाषा सक्तीची. या मुलींसाठी मात्र मराठी भाषा, लिपीसह शिकणं आणि बोलणं सोपं नव्हतंच. पण मालसीलीन तेही शिकली. दहावीत तिला मराठीत ७९ गुण आहेत. दहावी उत्तीर्ण झाल्यावर ती घरी परतली खरी; पण उच्च शिक्षणासाठी तिनं पुन्हा नाशकात यायचं ठरवलं. आता तिनं विज्ञान शाखेत अकरावीला प्रवेश घेतला आहे. डॉक्टर व्हायचं असं तिचं स्वप्न आहे. मेघालयातल्या आदिवासी जमातीतली असली तरी महाराष्ट्रातल्या आदिवासी जाती-जमातीत त्या जमातींचा समावेश नसल्यानं ही मुलगी खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेत उत्तम मेहनत करते आहे.
घरापासून इतकं दूर राहत, आपल्या सवयीपेक्षा वेगळ्या जगात, वेगळ्या वातावरणात राहत, खाण्यापिण्याच्या चवींशी जुळवून घेत राहणं कसं जमतं असं विचारल्यावर ती सांगते, ‘अब जब इधर ही रहना है, तो इधर का सब सिखना जरुरी है! तसंही आता इतकी वर्षे झाली इकडे येऊन की घरी गेलं तरी इकडची आठवण येते, इकडे असताना तिकडची आठवण येते. पण शिकायचं तर आहेच..’ शिकायचं आणि मागे हटायचं नाही, याच बाण्यानं ही हसरी मुलगी आता नव्या उत्साहानं उच्चशिक्षणाच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकते आहे.
मूळच्या मेघालयातल्या, आमच्या शाळेत शिकणाऱ्या या मुली दिवाळीचे दोन दिवस माझ्या घरी आल्या होत्या. आम्ही एकत्र दिवाळी साजरी केली. मात्र त्यांच्यामुळे माझीच दिवाळी खूप आनंदानं आणि वेगळ्याच रीतीनं साजरी झाली. अत्यंत शिस्तीत जगणाऱ्या, स्वयंपूर्ण अशा या मुली. अत्यंत टापटीप जगतात. मजेत आपल्या भाषेतली गीतं गातात. बोअर होतंय हे शब्दच त्यांच्याकडे नाही. सतत कशात न कशात गुंतवून घेतात स्वत:ला, मन रमवतात. आपल्यापेक्षा लहानांची काळजी घेतात. शेअरिंग तर अत्यंत मनापासून करतात. आणि अभ्यासही त्याच सातत्यानं करतात. हे सारं त्यांच्याकडून शिकण्यासारखंच आहे. आपल्याकडची मुलं पाहता हे ‘स्वावलंबन’ फार ठळक दिसतं.
- सुरेखा कुलकर्णी,
मुख्याध्यापक, विद्या प्रबोधिनी प्रशाला
मेघालयातल्या खासी हिल्स भागातील मुली १९९७ पासून नाशिकच्या वसतिगृहात शिकायला येतात. तेव्हा मुख्य प्रश्न असतो तो भाषेचा, सामाजिक वातावरणाचा आणि खानपानाचा. मात्र गेल्या काही वर्षात हे प्रश्न सोडवत वाटचाल करत असताना अनेक मुली इथं शिकल्या. त्यातल्या काही आता डॉक्टर आहेत, कुणी शिक्षण अधिकारी आहेत, शिक्षिका आहेत. आणि त्या साऱ्या जणी परत आपापल्या गावी जाऊन तिथं शिक्षणाचा प्रचार-प्रसार करत आहेत.
- मंगला सवदीकर,
पूर्वांचल विकास समिती, वसतिगृहाच्या संचालक