VIDEO : अष्टविनायकाचे दर्शन घडविणारे सुवर्ण मंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2016 12:27 PM2016-09-07T12:27:13+5:302016-09-07T13:12:27+5:30
बुलडाणा शहरातील गणेश भक्तांचे आराध्य दैवत असलेला प्रसिध्द सुवर्ण नगरातील सुवर्ण गणेश पंचक्रोशीत प्रसिध्द असून या ठिकाणी अष्टविनायकाचे दर्शन घडते.
Next
हर्षनंदन वाघ
ऑनलाइन लोकमत
बुलडाणा : शहरातील गणेश भक्तांचे आराध्य दैवत असलेला प्रसिध्द सुवर्ण नगरातील सुवर्ण गणेश पंचक्रोशीत प्रसिध्द असून या ठिकाणी अष्टविनायकाचे दर्शन घडते. त्यामुळे दररोज भाविकांची गर्दी दिसून येत असून गणेश उत्सवानिमित्त प्रत्येक वर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
सुवर्ण नगरातील काही युवकांनी एकत्र येऊन सार्वजनिक गणेशाची स्थापना करीत होते. १२ -१३ वर्षानंतर सुवर्ण नगरात गणेश मंदिर निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आला. तसा प्रस्ताव जागेचे मालक स्व.देवलाल वाणी यांच्यापुढे ठेवण्यात आला. त्यांच्याच अध्यक्षतेखाली ११ व्यक्तींची कार्यकारिणी गठीत करून धर्मदाय आयुक्ताकडे संस्थेची नोंदणी करण्यात आली. तसेच सुवर्ण नगर परिसरातील नागरिक, व्यापारी यांनी वर्गणी गोळा करून मंदिर निर्माण कार्यास प्रारंभ करण्यात आला. प्रारंभी साधे मंदिर बांधून जयपूर येथून सुमारे साडेचार फुटाच्या उंचीची आकर्षक व सुंदर अशी गणेश मुर्ती आणून १८ जून १९९१ रोजी मुर्तीची स्थापना करण्यात आली. कालांतराने शहर परिसरातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली. शहरवासियांचे श्रध्देचे स्थान झाले. अनेक भाविकांचे नवस याठिकाणी पूर्ण झाल्याने नवस पूर्ण करणारा सुवर्ण गणेश म्हणून गणेशाची ओळख निर्माण झाली. भाविक भक्तांच्या भावनेचा आदर करून ७ वर्षापूर्वी या मंदिराचा जिर्णोध्दार करून अष्टविनायकाची स्थापना करण्यात आली. मात्र मंदिर परिसराची जागा लहान असल्यामुळे संस्थेचे अनेक विस्तारीकरणाचे संकल्प पूर्ण झाले नाहीत. तरीही राजेंद्र पंजाबी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणी सदस्यांच्या सहकार्याने संस्थेची प्रगती सुरू असून प्रतिवर्षी गणेश उत्सव, स्थापना दिवस, पर्जंन्ययाग, चतुर्थी आदि कार्यक्रम येथे नियमित होतात.