VIDEO- अनधिकृत धर्मस्थळांवर अखेर हातोडा
By Admin | Published: December 28, 2016 08:35 PM2016-12-28T20:35:35+5:302016-12-28T20:37:42+5:30
ऑनलाइन लोकमत चंद्रपूर, दि. 28 - मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत ठरविण्यात आलेल्या १७ पैकी १२ धर्मस्थळांवर बुधवारी कारवाईचा ...
ऑनलाइन लोकमत
चंद्रपूर, दि. 28 - मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत ठरविण्यात आलेल्या १७ पैकी १२ धर्मस्थळांवर बुधवारी कारवाईचा हातोडा चालला. सकाळी ११ वाजता सुरु झालेल्या या कारवाईत दिवसभरात १२ अनधिकृत धर्मस्थळांना भुईसपाट करण्यात आले. सायंकाळनंतर ही कारवाई थांबली असली तरी उद्या गुरुवारी सकाळीपासून ती पुन्हा सुरू होऊन उर्वरित पाच धर्मस्थळांना हटविण्याची कारवाई केली जाणार आहे.
बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास बुलडोजर, अग्निशामक दलाचे वाहन, सफाई कर्मचारी, पोलीस अधिकारी व शिपाई आणि महानगर पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. या पथकाने पहिला हातोडा जिल्हा परिषदेलगतच्या शिवमंदिरावर आणि बाबा ताजुद्दीन यांच्या दर्ग्यावर मारला. अगदी एकमेकाला लागून असलेले हे मंदिर आणि दर्गा म्हणजे चंद्रपुरातील सामाजिक सद्भावनेचे प्रतिक समजले जात होते. या दोन्ही ठिकाणच्या इमारती केवळ अर्धा तासात भूईसपाट केल्या. अकस्मातपणे सुरू झालेल्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये प्रारंभी प्रचंड कुतूहल निर्माण झाले होते. अगदी वर्दळीच्या मार्गावर ही धर्मस्थळे असल्याने सुरक्षेच्या कारणावरून वाहतूक विभागाने प्रियदर्शनी चौकातून येणारा एकेरी मार्ग बंद केला होता. केवळ अर्धा तासात हे अतिक्रमण हटवून पथक पुढील कारवाईसाठी रवाना झाले.
या ठिकाणी ही कारवाई सुरू असतानाच, मूल मार्गावरील वनविभागाच्या कार्यालयाजवळील माता मंदिरही पाडण्यात आले. नवरात्रीच्या काळात या मंदिरात मोठ्या संख्येने ओटी भरण्यासाठी येणाऱ्या महिला वर्गात आणि नागरिकांमध्ये यामुळे हळहळ व्यक्त होताना दिसली. मात्र न्यायालयाच्या आदेशानेच ही कारवाई सुरू असल्याचे लक्षात आल्यावर विरोधासाठी कुणीही सामोरे आले नाही.
महानगर पालिकेने आणि पोलीस विभागाने या अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईसाठी मनपाच्या झोननिहाय तीन पथके स्थापन केली होती. या पथकांचे नेतृत्व सहाय्यक आयुक्त विजय देवळीकर, सचिन पाटील आणि अश्विनी गायकवाड या अधिकाऱ्यांकडे होते. त्यांंनी दिवसभर पथकासोबत राहून ही कारवाई पार पाडली. या सोबतच चंद्रपूर मनपाचे उपायुक्त रामनगर पोलीस निरीक्षक संपत चव्हाण, वाहतूक पोलीस निरीक्षक कोळी, डॉ. विजय इंगोले सर्व घटनास्थळी प्रामुख्याने उपस्थित होते.
बुधवारी दिवसभरात एकूण १२ अनधिकृत प्रार्थनास्थळे हटविण्यात आली. यात, मूल मार्गावरील माता मंदिर, जिल्हा परिषदेलगतचे शिवमंदिर आणि ताजुद्दीन बाबा दर्गा, अरविंदनगर येथील शिवमंदिर, गंज वॉर्डातील नागमंदिर, बागला चौकातील हनुमान मंदिर, महाकाली मंंदिराजवळील वाघोबाची तीन मंदिरे, तुकूम परिसरातील पाच मंदिरे हटविण्यात आली.
आक्षेपावरील उत्तरानंतरच कारवाई
मुंबई उच्च न्यायालयाने २००९ नंतर बांधण्यात आलेली सर्व धार्मिक स्थळे अवैध ठरविली आहेत. या अवैध धार्मिक स्थळांवर मे २०१६ पर्यंत कारवाई करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले होते. चंद्रपूर शहरात प्रारंभी ५९० धार्मिक स्थळे अनधिकृत आढळली होती. त्यांवर संबंधितांकडून आक्षेप मागविल्यावर ३१ धार्मिक स्थळे २९ सप्टेंबर २००९ नंतरची आढळली होती. नंतर त्यातील काहींकडून आक्षेपावर उत्तरे आल्यावर १७ धर्मस्थळे अवैध ठरविण्यात आली होती. पालिकेने संबंधित व्यवस्थापकांना नोटीस बजावून धार्मिक स्थळ निष्काशित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यासाठी प्रशासनासोबत बैठका घेवून सामंजस्याने तोडगा काढण्यात आला होता. त्यामुळेच कारवाई सुरु असताना विरोध दिसला नाही.
न्यायालयाच्या आदेशावरूनच ही कारवाई सुरू आहे. नागरिकांनीही या मोहिमेला सहकार्य केले आहे. आज १२ अतिक्रमणे हटविण्यात आली असून गुरूवारी उर्वारित पाच अतिक्रमणे हटविण्याची कारवाई केली जाईल.
- डॉ. विजय इंंगोले, उपायुक्त मनपा, चंद्रपूर
https://www.dailymotion.com/video/x844mrd