VIDEO- ...येथे किडनी विकणे आहे !

By Admin | Published: August 12, 2016 07:33 PM2016-08-12T19:33:16+5:302016-08-12T20:34:34+5:30

विवंचनेतून मार्ग काढण्यासाठी तिच्या डोक्यात थेट किडनी विकण्याचा विचार आला

VIDEO- ... here is selling kidneys! | VIDEO- ...येथे किडनी विकणे आहे !

VIDEO- ...येथे किडनी विकणे आहे !

googlenewsNext

सायली जोशी-पटवर्धन/ ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 12 - तिचं वय अवघं ३८ वर्ष...पदरी तीन मुलं...१५ वर्षांच्या संसारानंतर आयुष्याच्या साथीदाराने साथ सोडली...कुठं काम करायचं तर हाताला कामही नाही. या सगळ्या विवंचनेतून मार्ग काढण्यासाठी तिच्या डोक्यात थेट किडनी विकण्याचा विचार आला. कायद्याच्या चौकटीत हे शक्य नाही आणि म्हणावे तितके सोपेही नाही. पण मुलांचे भवितव्य घडविण्यासाठी तिला हाच एकमेव मार्ग वाटतो. किडनी विकून पोरांचं तरी भलं होईल... अशी भाबडी आशा घेऊन पुण्यातील एक महिला किडनी घेणारा कुणी आहे का? असा शोध घेत होती असे समोर आले आहे.
लाखो हातांना काम देणाऱ्या पुण्यासारख्या शहरातील नीलमवर (नाव बदलले आहे) ही वेळ आली आहे. आपल्या मुलांना चांगले जीवन जगता यावे, यासाठी ती आपली किडनी विकायला तयार झाली आहे. यातून आपल्याला २० ते २५ लाख रुपये मिळतील अशी तिची अपेक्षा आहे. मुंबईतील किडनी रॅकेटच्या पार्श्वभूमीवर एका प्रसिद्ध डॉक्टरांशी संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती ह्यलोकमतह्णला दिली. आपण संबंधित महिलेचे समुपदेशन करुन हा गुन्हा असल्याचेही या महिलेला सांगितल्याचे डॉक्टर म्हणाले. ही माहिती डॉक्टरांनी लोकमतला कळविली असता प्रतिनिधीने या महिलेची भेट घेतली, तेव्हा ही बाब समोर आली.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार खात्री करण्यासाठी लोकमत प्रतिनिधीने या महिलेला दूरध्वनी करून भेटू शकाल का, असे विचारले असता आपण कधी येताय असा आग्रहच ती करीत होती. पण या आग्रहामागचं कोडं उलगडत नव्हतं. तिची भेट घेऊन संवाद साधला असता तिची करुण कहाणी ऐकून अंगावर शहारे आले. तुम्ही किडनी घ्यायला आलात ना? असा तिचा पहिलाच थेट प्रश्न आणि तिच्या डोळ्यातलं पाणी परिस्थितीचं उघडं अधांतरी वास्तव सांगत होतं.
नीलम म्हणाली, मी गांजून गेली आहे. ...मग मरायचचं असलं तर एखादा अवयव देऊन थोडाफार आर्थिक हातभार पोरांसाठी देऊन मरायला काय हरकत आहे. आपलं जीवनमान कमी झालं तरी चाललं, पण किडनी विकून आलेल्या पैशातनं आपल्या २ मुली आणि एका मुलाचं शिक्षण होईल...अन् त्यांचं जीवन तरी चांगलं होईल. असं भाबड्या आशेनं नीलम सांगत किडनी विकायला तयार असल्याचे तिच्याशी बोलताना जाणवलं. तिने काही ठिकाणी चौकशीही केली असल्याचं ती सांगत होती. मात्र ज्या ठिकाणी तिने चौकशी केली, तिथे तिला किडनी देता येत नसल्याचेच सांगण्यात आले. मात्र, काही दिवसांपूर्वी टीव्हीवर बघितलेल्या बातमी आणि एका कार्यक्रमातून आपल्याला हा मार्ग सुचल्याचे नीलमचे म्हणणे आहे.
पती आणि सासरकडील मंडळी त्रास देत असल्याने तिने पोलिसांत तक्रार केली. मात्र, त्यानंतर परिस्थिती आणखी बिघडली आणि घटस्फोट घेतला तर रहाणार कुठे आणि त्या प्रक्रियेसाठी पुरेसे पैसेही नाहीत. त्यामुळे सध्या पतीच्याच रहात असल्याचे नीलमने सांगितले. एका कंपनीची उत्पादने विकून घरसंसार सुरू आहे. मात्र, त्यात काही कामाची शाश्वती नाही, त्यामुळे नीलम या निर्णयापर्यंत आल्याचे स्पष्टपणे दिसत होते.

किडनी विकणे गुन्हा
किडनी विकणे हा कायद्याने गुन्हा आहे. या गुन्ह्यासाठी ५ ते १० वर्षांचा कारावास आणि दंडाची शिक्षा आहे. मात्र, रुग्णालय प्रशासनाने अवयव दानाची शस्त्रक्रिया करत असताना दाता आणि रुग्णाचे नाते, त्यांची सर्व कागदपत्रे यांची योग्य छाननी करणे आवश्यक आहे. मात्र, काही चित्रपटांतून किडनी विकल्याचे दाखविले जाते. त्यामुळे परिस्थितीने गांजलेल्यांनाही हा एक मार्ग वाटतो

Web Title: VIDEO- ... here is selling kidneys!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.