VIDEO : ‘एक्सप्रेस वे’वर सुटीचा ब्लॉक
By admin | Published: August 14, 2016 05:47 AM2016-08-14T05:47:41+5:302016-08-14T05:47:41+5:30
शनिवार, रविवारला स्वातंत्र्यदिनाची (सोमवार) जोडून आलेल्या सुटीमुळे हजारोंच्या संख्येने मुंबईकर पर्यटनासाठी बाहेर पडल्याने शनिवारी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर
लोणावळा (पुणे) : शनिवार, रविवारला स्वातंत्र्यदिनाची (सोमवार) जोडून आलेल्या सुटीमुळे हजारोंच्या संख्येने मुंबईकर पर्यटनासाठी बाहेर पडल्याने शनिवारी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. पुण्याकडील मार्गिकेवर अमृतांजन पूल ते खालापूर टोलनाक्यापर्यंत जवळपास १३ ते १५ किमी अंतरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने द्रुतगती महामार्ग अक्षरश: ‘कासवगती’ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
द्रुतगती मार्गावर खोपोली फूड मॉल ते लोणावळ्यापर्यंत घाटक्षेत्र आहे. या परिसरात पुण्याकडे येणाऱ्या वाहनांचा वेग चढणीमुळे कमी होतो. त्यातच शनिवारी हजारोंच्या संख्येने या मार्गावर वाहने वाढल्याने वाहतुकीचा खोळंबा होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे बहुतांश पर्यटकांचा दिवस वाहतूककोंडीतच गेला. दहा ते पंधरा मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी वाहनांना तब्बल दोन ते तीन तास तिष्ठावे लागल्याने पर्यटकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महामार्ग पोलीस, आयआरबी व डेल्टा फोर्स सर्वतोपरी प्रयत्न करत होते. मात्र, वाहनांच्या अफाट गर्दीपुढे पोलीसही हतबल झाले होते. खोपोली परिसरात पर्यायी मार्ग म्हणून द्रुतगतीवरील वाहने खोपोली गावातून वळविल्याने खोपोली गावातदेखील वाहतूककोंडी झाली होती. लोणावळा शहरात तुलनेत गर्दी कमी होती.
- मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूककोंडी
लागोपाठ आलेल्या सुट्यांमध्ये वीकेण्डसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांमुळे अचानक सकाळी वाहनांची संख्या मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या महामार्गावर वाढली. त्यामुळे या महामार्गावर शनिवारी सकाळी काही काळ वाहतूककोंडी पाहण्यास मिळाली.
याचा परिणाम ठाणे शहरातील साकेत रोड आणि मुंबई-नाशिक महामार्ग व कळवा-मुंब्रा रोडवर पाहण्यास मिळाला. यामुळे शहरातील वाहतुकीचे सकाळी ९.३० वा.च्या सुमारात १२ वाजले. याचदरम्यान, मुंबई-पुणे महामार्गावरही मुंबई-नाशिकसारखे चित्र होते. मात्र, वाहतूककोंडी नव्हती. तर, ती धीम्या गती सुरू होती. ती पूर्वपदावर येण्यासाठी दोन तास लागले.