VIDEO - कोणी घर देतं का घर, म्हणत त्यांचा प्रपंच सटवाईच्या मंदिरात !
By Admin | Published: August 23, 2016 08:16 PM2016-08-23T20:16:09+5:302016-08-23T21:22:44+5:30
सटवाई मंदिराचा निवारा म्हणून वापर करत जिंवतपणी मरणयातना भोगण्याची पाळी निवृत्त एस.टी. महामंडळाचे कर्मचारी सुरेश भोसले यांच्यावर आली असून, त्यांना आधाराची गरज आहे
अनिल महाजन / ऑनलाइन लोकमत
बीड, दि. २३ : म्हातारपणाची काठी असणारा मुलगा उघड्यावर टाकून निघून गेल्याने व स्वत:चा हक्काचा निवारा नसल्यामुळे सटवाई मंदिराचा निवारा म्हणून वापर करत जिंवतपणी मरणयातना भोगण्याची पाळी निवृत्त एस.टी. महामंडळाचे कर्मचारी सुरेश भोसले यांच्यावर आली असून, त्यांना आधाराची गरज आहे
अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार येथील रहिवासी असणारे सुरेश विठ्ठल भोसले हे अहमदनगर येथील एस. टी. वर्कशॉपमध्ये येथे हेड मेकॅनिक म्हणून कार्यरत होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या दोन मुलांना कामधंद्यासाठी त्यांनी आपली जीवनभराची पुंजी पणाला लावली. दुदैर्वाने एक मुलगा अपघातात मरण पावला अन् सुरेश भोसले यांचा वाईट काळ सुरू झाला.
धारूरला नातेवाईकाच्या साहायाने संतोष हा सोनार काम व इतर काम करून राहात होता. पाच वर्षांपूर्वी आपल्याला आता एवढाच मुलगा आधार म्हणून सुरेश भोसले व त्यांची पत्नी सविता या मुलाकडेच राहण्यास आले निवृत्तीनंतर मिळालेला पैसा मुलाना देऊन मोकळे झाले होते. पेन्शन नसल्याने संतोष हाच त्यांचा आधार होता. एक-दीड वर्षांपूर्वी संतोषचा धंदा तोट्यात आल्याने तो धारूर सोडून निघून गेला. अवघ्या तीन महिन्यांतच त्यांच्यावर भाड्याचे घर सोडण्याची पाळी आली. काही दिवस सांस्कृतिक सभागृहात काढल्यावर त्यांनी आता बारा कमानजवळील उघड्या सटवाई मंदिरात संसार मांडला आहे. त्यांना शासनाच्या निराधार योजनेचा मोठा आधार मिळत असून यावर उपजीविका करीत आहेत.सुरेश भोसले हे दोन्ही डोळ्यांनी अंध झाले आहेत, तर पत्नी आजाराने त्रस्त आहे. उघड्यावर संसार करण्याची वेळ आली.
धारूर येथील राजमुद्रा ग्रुप च्या लक्षात हा प्रकार येताच मार्गदर्शक सुरेश शेळके, कार्यकर्ते सुनील कावळे, बबलू सावंत आदीनी पुढाकार घेऊन यांना सर्व एक ते दीड महिन्याचा धान्य व किराणा दिला.
यवतमाळ येथील दिलासा या संस्थेने सुरेश गवळी यांच्या मार्फत वीस हजार रुपयाचा निवारा करून देण्याचे जाहीर केले. या मदती मुळे या कुटुंबाला थोडासा दिलासा मिळाला आहे