VIDEO: समृद्धी महामार्गाचं लोकार्पण अन् पंतप्रधान मोदींची CM शिंदेंच्या पाठिवर कौतुकाची थाप!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 11:20 AM2022-12-11T11:20:13+5:302022-12-11T11:21:10+5:30
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आलं.
नागपूर-
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आलं. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंत्री नितीन गडकरी आणि डॉ. भारती पवार यांच्यासह भाजपाचे प्रमुख नेते उपस्थित होते. मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या कोनशिलेचं अनावरण केलं त्यावेळी पंतप्रधानांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या पाठिवर कौतुकाची थाप दिली.
तब्बल ७०० किमी लांबीचा महाराष्ट्रासाठी गेम चेंजर ठरणारा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. महामार्गाचं काम विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आलं आणि अखेर आज याचा नागपूर ते शिर्डी असा पहिला टप्पा सुरू झाला आहे. या महामार्गावरुन प्रवासाचा अनुभव देखील मोदींनी यावेळी घेतला. त्याआधी महामार्गाच्या कोनशिलेचं अनावर मोदींच्या हस्ते झाले.
कोनशिलेचं अनावरण केल्यानंतर फोटोसेशनवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूला उभे असेलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोदींनी जवळ घेतलं आणि त्यांच्या पाठिवर कौतुकाची थाप दिली. मुख्यमंत्रीही मोदींचे आभार मानताना दिसले. थोड्याच वेळात मोदी या कार्यक्रमात संबोधित करणार आहेत. मोदींच्या हस्ते आज नागपूरात जवळपास ७५ हजार कोटींच्या विविध प्रकल्पांच्या उदघाटन आणि भूमीपूजनाचा कार्यक्रम होत आहे.
पंतप्रधानांनी लुटला ढोल वादनाचा आनंद
समृद्धी महामार्गावरुन प्रवास केल्यानंतर पंतप्रधानांच्या ताफ्याचं ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं. यावेळी पंतप्रधानांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. तसंच त्यांनीही आनंदात सामील होत ढोल वादनाचा आनंद लुटला.
A traditional welcome in Nagpur, Maharashtra. pic.twitter.com/v1Yw75v1o3
— PMO India (@PMOIndia) December 11, 2022