VIDEO : नाशिकमध्ये गारपिटीसह अवकाळी पाऊस, शेतक-यांचं प्रचंड नुकसान
By Admin | Published: April 30, 2017 04:25 PM2017-04-30T16:25:58+5:302017-04-30T16:39:20+5:30
ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 30 - नाशिकमधील सटाणा तालुक्यात अनेक गावात वादळी वा-यासहीत अवकाळी पाऊस व गारपीटदेखील झाली. चांदवड, ...
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 30 - नाशिकमधील सटाणा तालुक्यात अनेक गावात वादळी वा-यासहीत अवकाळी पाऊस व गारपीटदेखील झाली. चांदवड, मालेगाव, अंबासन, आसखेडासह अन्य गावांमध्ये वादळी वा-यासह गारांचा पाऊस झाला. यामुळे शेतक-यांचं प्रचंड नुकसान झाले आहे.
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे द्राक्ष, डाळिंब, कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आर्थिक नुकसानीत अधिक भर पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
दरम्यान, शनिवारी सांगली व मराठवाड्यातील लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळी भागाला गारपिटीचा तडाखा बसला. विजांच्या कडकडाटात, वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने परिसराला अक्षरक्ष: झोडपून काढले.
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले, तर मराठवाड्यातील शेतकऱ्यांची मापाविना बाजार समितीत पडून असलेली हजारो क्विंटल तूर भिजली.
लातूर आणि बीड जिल्ह्यातील अनेक गावांना या पावसाचा तडाखा बसला. यामुळे आंबा तसेच द्राक्ष बागांचे नुकसान झाले. बीड जिल्ह्यात चौसाळ्यासह हिंगणी खुर्द व बुद्रुक परिसरात पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांनी तयार करुन ठेवलेल्या ज्वारी खळ्यांचे नुकसान झाले. उस्मानाबाद जिल्ह्यात वीज पडून तीन दुभती जनावरे दगावली.
हजारो क्विंटल तूर भिजली
मराठवाड्यातील लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात गारपिट झाली. चाकूर, जळकोट आणि जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली हजारो क्विंटल तूर या पावसामुळे भिजली़ गेल्या अनेक दिवसांपासून बाजार समितीच्या आवारात ही तूर मापाविना पडून होती, परिणामी, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
तर दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील तापमानात सातत्याने वाढ होताना पाहायला मिळतेय. मात्र या वाढत्या तापमानातून कोकणवासीयांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. उन्हाच्या काहिलीनं राज्य होरपळत असताना येत्या 24 तासांत दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात अवकाळी पावसाचा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे. राज्यात सर्वत्र उन्हाच्या प्रचंड तडाख्यानं लोकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. तर महाराष्ट्रात उष्माघातानं आतापर्यंत 11 बळी गेल्याचंही समोर आलं आहे.
महाबळेश्वर आणि रत्नागिरीत कमाल तापमान 34 अंशांपर्यंत नोंदवलं गेलं आहे. भीरा येथे तापमान पुन्हा 43 अंशांपर्यंत गेलं आहे, तर विदर्भातल्या अकोल्यातही 43, अमरावती 40, ब्रह्मपुरी 45, बुलडाणा 39, चंद्रपूर 44, नागपूर आणि वर्धा येथे 43, यवतमाळमध्ये 42 अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदवलं गेलं आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात येत्या काळात उष्मा आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील तापमानात मोठी वाढ नोंदवली गेली असली तरी दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पुढील 24 तासांत गडगडाटासह पावसाच्या सरींची शक्यता स्कायमेटनं वर्तवली आहे.
https://www.dailymotion.com/video/x844wlk