VIDEO - जळगावात भक्तीमय वातावरणात वर्सी महोत्सवास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2016 06:38 PM2016-10-19T18:38:46+5:302016-10-19T18:38:46+5:30
मोठा उत्साह व भक्तीमय वातावरणात ५९ व्या वर्सी महोत्सवास बुधवारी सुरुवात झाली. या उत्सवात देशभरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 19 - मोठा उत्साह व भक्तीमय वातावरणात ५९ व्या वर्सी महोत्सवास बुधवारी सुरुवात झाली. या उत्सवात देशभरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. त्यामुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले आहे. ‘मेरे बाबा की महिमा निराली है, यहा पर हर रोज दिवाली... जो आता यहा स्वाली, भरती उसकी झोली खाली’ या भावनेने हजारो भाविक येथे नतमस्तक होत आहेत.
पंचामृत स्नानाने सुरुवात
बुधवारी पहाटे पाच वाजेपासून संत बाबा हरदासराम साहेब, संत बाबा गेलाराम साहेब यांच्या देवरी साहेब (समाधी)ला पंचामृत स्नानाने पूज्य अमर शहीद संत कंवरराम साहेब यांच्या ५९ व्या, पूज्य संत बाबा हरदासराम साहेब (गोदडीवाले) यांच्या ३९व्या व पूज्य ब्रह्मस्वरुप बाबा गेलाराम साहेब यांच्या आठव्या वर्सी महोत्सवाची सुरुवात झाली. सकाळी नऊ वाजता होम हवन विश्वशांती यज्ञ लेखराज आर्य (धुळे) व सहकऱ्यांच्या मंत्रोपचाराने करण्यात आला. यावेळी ट्रस्टतर्फे विश्वात शांती नांदो, सुख समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली.
अखंड भोजन भंडारासाहेब पूजन
सकाळी अखंड भोजन भंडारासाहेब पूजन करण्यात आले. भोजन भंडारा अखंड २४ तास सुरू राहणार आहे. सकाळी ११ वाजता वर्सी महोत्सवासाठी मंडपात येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी व सोयी सुविधा व मौल्यवान वस्तूंच्या लॉकर्स सुविधांसाठी उत्सवा दरम्यान २४ तास चालणाऱ्या ट्रस्ट कार्यालयाची सुरुवात करण्यात आली.
या वेळी अमर शहीद संत कंवरराम ट्रस्टचे हिरानंंद मंदवाणी, विषमदास मंदवाणी, अशोक मंथान, रमेश मगाणी, विजय दारा, हेमू भावनाणी, बनाराम शामनाणी, राजू प्रथानी, पूज्य पंचायतचे हरीश जगवाणी, राजकुमार वालेचा, लक्ष्मणदास अडवाणी, मावधदास भोजवाणी नारायणदास दारा, प्रकाश अडवाणी, रेणूराम वालेचा, हरगुणराम दारा, राजकुमार अडवाणी, विजय गेही, किशोरचंद रावलाणी, राम कटारिया, नंदलाल कुकरेजा, हरदास कुकरेजा, सुखरामदास मंथवाणी आदी उपस्थित होते.
अखंड पाठ व धुनी साहेब
सायंकाळी अखंड पाठसाहेब व अखंड धुनी साहेबचा आरंभ मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. अखंड पाठ व धुनी वाचन महिला मंडळातील भगिनींनी सुरू केले. या अखंड पाठ व धुनी साहेबची समाप्ती (भोेग साहेब) शुक्रवारी होणार आहे.
या महोत्सवासाठी देशभरातून भाविक दाखल झाले आहे. रायपूर, बिलासपूर, सुरत, अहमदाबाद, वाराणसी, पालीथाना, भोपाळ, कोलकता, दिल्ली, अमृतसर यासह महाराष्ट्रातील विविध शहरातील व विविध भागातील भाविक मोठ्या संख्येने येथे आल्याने परिसर फुलून गेला आहे.
भजनांनी रंगत
१९ रोजी संत बाबा हरदासराम पटापटी टोली (भजन) कार्यक्रमात सादर भजन गायनाने चांगलीच रंगत आणली. या वेळी मान्यवरांसह देशभरातील भाविक यात सहभागी झाले होते.
महोत्सवातून सामाजिक संदेश
या महोत्सवादरम्यान लहान मुलांनी हमारी लाडली ही नाटिका सादर करून बेटी बचावचा संदेश दिला. आज स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी अनेक प्रयत्न होत असले तरी हा प्रकार थांबत नसल्याने या महोत्सवात चिमुकल्यांनीच बेटी बचावचा संदेश देत सामाजिक जाणीवेचे दर्शन घडविले.
या नंतर मुंबई व उल्हासनगरच्या कलाकारांद्वारे संगीतमय भजनांचा कार्यक्रम झाला संत बाबा हरदासराम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बाबांच्या जीवनावरील नाटिकेने सर्वांची मने जिंकली.