VIDEO : बेगम परवीन सुलताना यांच्या गायनाने जळगावकर मंत्रमुग्ध
By Admin | Published: March 18, 2017 11:14 PM2017-03-18T23:14:46+5:302017-03-18T23:48:53+5:30
ऑनलाइन लोकमत जळगाव, दि. 18 - बंदीश, भैरवी, झुला, अभंग, वेगवेगळे राग, ताल आणि त्याला तेवढ्याच तोलामोलाची संगीत साथसंगत ...
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 18 - बंदीश, भैरवी, झुला, अभंग, वेगवेगळे राग, ताल आणि त्याला तेवढ्याच तोलामोलाची संगीत साथसंगत यांच्या मिलापाने पं. भीमसेन जोशी स्मृती शास्त्रीय संगीत महोत्सवात दुस-या दिवशी रंग भरले. या कार्यक्रमाचे खास आकर्षण असणा-या भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ गायिका बेगम परवीन सुलताना यांच्या ‘फागून दिन चार, सब फुलन फुली बाग डाल डाल’ या बंदिशीने रसिकांच्या टाळ््यांची चांगलीच दाद मिळवित ही बंदिशी सर्वांच्या मनाला भिडली.
बालगंधर्व सभागृहात सुरू असलेल्या या तीन दिवसीय संगीत महोत्सवात आज बेगम परवीन सुलताना यांचे गायन होणार असल्याने सभागृह रसिकांनी भरगच्च भरले होते.
टाळ््यांच्या कडकडाटात उभे राहून स्वागत
गायनासाठी बेगम परवीन सुलताना रंगमंचावर येताच रसिकांनी उभे राहून टाळ््या वाजवित त्यांचे स्वागत केले. गायनापूर्वी त्यांनी संवाद साधत महाराष्ट्र शासनाच्या या पुरस्काराबद्दल आभार मानत या संगीत महोत्सवाचे तोंडभरून कौतुक केले व यामध्ये आम्हाला गायनाची संधी दिली या बद्दल आभार व्यक्त केले.
बेगम परवीन सुलताना यांनी राग यमनने आपल्या गायनास सुरुवात केली. त्यानंतर राग बसंतबहारमध्ये सादर केलेल्या ‘फागून दिन चार, सब फुलन फुली बाग डाल डाल’ या बंदिशीने तर सुरुवातीपासून अखेरपर्यंत टाळ््या मिळविल्या. बंदिशीतील आलाप संपूर्ण परिसरात घुमला व लयातील चढ-उतार तर सर्वांना चांगलाच भावला. त्यानंतर त्यांनी भैरवी सादर केली व उभे राहून रसिकांना हात जोडत निरोप घेतला. यावेळी त्यांना मुकुंदराज देव (तबला), श्रीनिवास आचार्य (संवादिनी), शादाब सुलतान खान व अनघा नाईक (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
तत्पूर्वी देबवर्णा बासू यांनी शास्त्रीय गायन सादर केले. यामध्ये त्यांनी मारू बिहाग रागाने गायनास सुरुवात केली. त्यानंतर झुला हे उपशास्त्रीय गायन सादर केले आणि दादरा ताल धृप कल्याण रागातील ‘कदरा नाल लाया अखिया’ हे गीत सादर केले. त्यांना देवेंद्र देशपांडे (हार्मोनियम), गणेश तानावडे (तबला) यांनी साथसंगत केली.
झपताल व अभंगाचा संगम
धनंजय हेगडे यांनी विविध ताल व अभंगाचा संगम घडून आणला. यामध्ये त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत सादर करताना अभोगी रागमध्ये मध्यलय झपतालात ‘चरण धर आये...’ हे गायन सादर केले. त्यानंतर धृप तीन ताल ‘दिन दयालू परमेश’ आणि धृप एक ताल ‘लाज रखो मोरी’ या बोलीत सादर केले आणि ‘संतभार पंढरीत...’ या अभंगाने समारोप केला. त्यांना निरंजन लेले (हार्मोनियम), मंदार पुराणिक (तबला) यांनी साथसंगत केली.
सरोद वादनाने समारोप
अभिषेक लाहिरी यांच्या सरोद वादनाने दुस-या दिवसाच्या कार्यक्रमाचा समारोप झाला.
वादा है मेरा, मै फिर आऊंगी
गायनानंतर संवाद साधत बेगम परवीन सुलताना यांनी पुन्हा एकदा जळगावला येण्याचे वचन दिले. असे रसिक असले तर रात्रभर गाता येईल असे म्हणत जळगावकर रसिकांचे कौतुक केले आणि ‘वादा है मेरा, मै फिर आऊंगी’ असे सांगताच रसिकांनी टाळ््यांचे याचे स्वागत केले. मधून-मधून त्यांनी मराठीत संवाद साधला.