Video- जस्टिन बिबरच्या लाइव्ह परफॉर्मन्सचा व्हिडीओ व्हायरल
By admin | Published: May 10, 2017 11:02 PM2017-05-10T23:02:14+5:302017-05-10T23:51:05+5:30
कॅनडियन पॉप सिंगर जस्टिन बिबरची झलक पाहण्यासाठी आज नवी मुंबईतल्या डॉ. डी वाय. पाटील स्टेडिअमवर हजारोंच्या संख्येनं चाहत्यांनी उपस्थिती दर्शवली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी मुंबई, दि. 10 - अवघ्या 12व्या वर्षीच जगभरात नावारुपाला आलेल्या कॅनडियन पॉप सिंगर जस्टिन बिबरची झलक पाहण्यासाठी आज नवी मुंबईतल्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअमवर हजारोंच्या संख्येनं चाहत्यांनी उपस्थिती दर्शवली आहे. विशेष म्हणजे नवी मुंबईकरच नव्हे तर संपूर्ण देशातील संगीताच्या चाहत्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली आहे. तसेच आलिया भट, रविना टंडन सारख्या अभिनेत्री आणि इतरही अभिनेत्यांनी जस्टिनच्या या लाइव्ह कॉन्सर्टला हजेरी लावली आहे. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडिअमवरील कार्यक्रमात जस्टिन बिबरला पाहण्यासाठी तरुणाई अक्षरश: वेडी झाली आहे. अनेक तरुणी जस्टिनची एक झलक पाहण्यासाठी गर्दीतून मार्ग काढत आहेत. जस्टिन बिबरचे अनेक व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. त्या व्हिडीओंमध्ये पॉपस्टार जस्टिन बिबर गाण्यानं तरुणाईला भुरळ घालताना पाहायला मिळतोय.
जस्टिनच्या चाहत्यांनी आपल्या मोबाईलमध्ये हे गाणं रेकॉर्ड केले असून, सोशल मीडियावरही जस्टिनचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. आज वयाच्या 23 व्या वर्षीच कोट्यवधी डॉलर्सची कमाई करणारा जस्टिन बिबर फोर्ब्सच्या यादीतलाही थर्टी अंडर थर्टी कॅटेगिरीतला मोस्ट फेव्हरिट सेलिब्रिटी आहे. केवळ आपल्या गाण्यांच्या जोरावर तो किती कमाई करीत असेल? भारतीय रुपयांत सांगायचं झाल्यास गेल्या वर्षीची त्याची कमाई 362 कोटी रुपयांच्या घरात होती.
30 वर्षं वयाच्या आतल्या सर्वाधिक कमाई करणा-या सेलिब्रिटींमध्ये जगात जस्टिन बिबरचा सहावा क्रमांक लागतो. आपल्या सुरक्षेसाठी जस्टीन बिबरनं स्वत:चे बॉडीगार्ड सोबत आणले आहेतच, पण त्याच्या खास सुरक्षेची जबाबदारी दुस-या तिसरा कोणी नव्हे, तर सलमान खानच्या शेरा या बॉडीगार्डवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे सलमानचे चाहतेही आनंदात आहेत. मात्र जस्टिन बिबरचे नखरे सांभाळण्याची फार मोठी कसरत त्याच्या आजूबाजूला मंडळींना करावी लागते आहे. केवळ आपल्या गाण्यांमुळेच नाही, तर त्याच्या चित्रविचित्र गोष्टींमुळेही तो कायम चर्चेत असतो. त्यामुळे अनेकदा त्यानं वाद ओढवून घेतले आहेत. आताही मुंबईतल्या कार्यक्रमासाठी त्यानं ज्या मागण्या केल्या होत्या, त्यानं अनेकांवर तोंडात बोटं घालायची वेळ आली.