VIDEO : लाखो भाविकांच्या उपस्थितीत जोतिबाचा पहिला खेटा
By admin | Published: February 12, 2017 01:15 PM2017-02-12T13:15:08+5:302017-02-12T13:15:08+5:30
जोतिबाच्या नावानं चांगभलं, केदारनाथाच्या नावानं चांगभलंच्या गजरात व भक्तिमय वातावरणात जोतिबाचा खेट्याला लाखो भाविकांच्या उपस्थितीत
दीपक जाधव /ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 12 - श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी जोतिबा डोंगर येथे दख्खनचा राजा जोतिबाच्या नावानं चांगभलं, केदारनाथाच्या नावानं चांगभलंच्या गजरात व भक्तिमय वातावरणात जोतिबाचा खेट्याला लाखो भाविकांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. पौर्णिमेलगतचा रविवार व पहिला खेडा आल्यामुळे भाविकांची गर्दी झाली होती.
परंपरेनुसार कोल्हापूरसह सांगली, कराड, सातारा, पुणे, लातूर, बार्शी, पंढरपूर, सोलापूर, मुंबई, बेळगावहून भाविक श्रींच्या दर्शनासाठी दाखल झाले होते. माघ महिन्यात येणाऱया रविवारी जोतिबा डोंगरावर भरणाऱया या यात्रेस जोतिबाचे खेटे असे म्हणतात. केदारविजय ग्रंथात या खेटय़ाविषयी उल्लेख आढळतो. पूर्वी केदारनाथ (श्री जोतिबा) दक्षिण मोहिम संपवून हिमालयाकडे जाण्यास निघाले असल्याचे करवीर निवासिनी अंबाबाई ला समजताच श्री अंबाबाई कोल्हापूरातून अनवाणी डोंगरावर आली व केदारनाथांना डोंगर सोडून जावू नये अशी विनंती केली. नाथांनी ही भक्त व अंबाबाई चे रक्षण करण्यासाठी जोतिबा डोंगरावरच राहण्याचे मान्य केले. तेव्हापासून कोल्हापूरहून जोतिबा डोंगरावर पायी खेटे घालण्याची प्रथा सुरू झाली.
पहाटे तीन वाजल्यापासून डोंगर दऱ्यातून कुशिरे, पोहाळे, गिरोली, केर्ली, केर्ले, वारणा येथील खडतर परिसरातून वाट काढत जोतिबा डोंगरावर भाविक पोहोचले. चार ते पाच पदरी भाविकांची रांग दर्शनासाठी लागली होती.दरम्यान पहाटे चार वाजता मंदिरात घंटानाद झाल्यानंतर मंदिरातील दरवाजे भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. त्यानंतर सकाळी नित्य धार्मिक विधी पार पडल्यानंतर श्रींची आकर्षक पूजा बांधण्यात आली.