VIDEO : 'काळू-बाळू’चा तमाशा फड पुन्हा मैदानात!
By admin | Published: October 14, 2016 02:34 PM2016-10-14T14:34:16+5:302016-10-14T14:35:21+5:30
चटकेबाज विनोदांची बतावणी, ढोलकीवरील अस्सल लावणी आणि सुपरहिट वगांनी अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारा काळू-बाळूचा लोकनाट्य तमाशा अखेर पूर्ण तयारीने मैदानात उतरला आहे.
Next
- सचिन लाड, ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. १४ - चटकेबाज विनोदांची बतावणी, ढोलकीवरील अस्सल लावणी आणि सुपरहिट वगांनी अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारा कवलापूर (ता. मिरज) येथील काळू-बाळूचा लोकनाट्य तमाशा अखेर पूर्ण तयारीने मैदानात उतरला आहे. तब्बल पाच दशके हुकूमत गाजविणारा हा फड दोन वर्षांपासून आर्थिक संकटात आल्याने गतवर्षी पूर्णपणे बंद होता. यंदा मात्र हंगाम ‘मारण्याच्या’ तयारीने जोमाने सराव सुरू आहे. पुढील आठवड्यात कवलापूर या जन्मगावी पुन्हा ‘श्रीगणेशा’ करून हा फड मराठवाड्यात रवाना होणार आहे.
अंकुश ऊर्फ बाळू संभाजी खाडे आणि लहू ऊर्फ काळू संभाजी खाडे यांचे आजोबा सातू-हिरू यांनी हा तमाशाचा फड सुरू केला. त्यांची मुले शिवा-संभा यांनीही ही कला पुढे नेली. तमाशाची कला जोपासण्यासाठी ‘काळू-बाळू’ची तिसरी पिढीही यात उतरली. त्यांनी महाराष्टÑासह दिल्लीही जिंकली आणि त्यांच्याच नावाने फड प्रसिद्ध झाला. दोन वर्षांपूर्वी काळू-बाळू ही जोडी दोन वर्षाच्या अंतराने पडद्याआड गेली. आता त्यांच्या पुढच्या पिढीने लोकनाट्याचा बाज सांभाळण्यासाठी कंबर कसली आहे. तब्बल ५५ वर्षे ‘लोकनाट्य तमाशा’ हेच दैवत मानून सांगली जिल्हा पर्यायाने कवलापूरचे नाव देशाच्या कानाकोपºयात नेणारा हा फड गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील दुष्काळी परिस्थिती व आर्थिक संकटामुळे अडचणीत होता. प्रतत्येकवर्षी विजयादशमीला (दसरा) हा फड गावाबाहेर पडतो. तेथून मे महिन्यातील अक्षयतृतीयेपर्यंत सव्वादोनशे प्रयोग केले जातात. तत्पूर्वी कलाकारांची जुळवाजुळव, त्यांचा पगार, वाद्ये आणि वाहनांची दुरुस्ती, रंगमंच, वीज-जनरेटर व्यवस्था याचे नियोजन करण्यासाठी किमान २५ ते ३० लाख रुपये लागतात. दोन वर्षांपासून ही रक्कम गोळा करण्यात या फडाला अडचणी येत होत्या. त्यामुळे २०१४ मध्ये विजयादशमीला त्यांना बाहेर पडता आले नाही. ग्रामस्थांनी थोडी वर्गणी गोळा करून दिली. त्या जोरावर त्यांनी फड उभा करून १५ डिसेंबर २०१४ ला ‘पहिले नमन’ केले होतेे. मे २०१५ मध्ये हंगाम संपल्यानंतर फड कवलापूर मुक्कामी आला. २०१५ मध्ये नेहमीप्रमाणे विजयादशमीला बाहेर पडण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होता, पण आर्थिक बाजूने मार बसला. शिवाय राज्यात दुष्काळाची भयावह स्थिती होती. त्यामुळे त्यांना गावातच थांबावे लागले.
पिढ्यान् पिढ्या सुरू असलेला हा तमाशा बंद ठेवण्याची गतवर्षी पहिल्यांदाच वेळ आली. ऐन हंगामात ते गावातच होते. खेळ सुरू न झाल्याची सल त्यांना टोचत राहिली. फड बंद झाला पण तो कायमचा नाही, तो पुन्हा उभारण्याचा त्यांच्या पिढीचा प्रयत्न होता. महागाई वाढली आहे. चार ट्रक, दोन जीप-बस-ट्रकचे डिझेल, शंभरहून अधिक कलाकारांचा पगार, त्यांचा चहा, नाष्टा व जेवणाच्या खर्चाचा मेळ घालताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. यावर्षी मे महिन्यापासूनच त्यांनी आर्थिक बाजू भक्कम करण्याची तयारी सुरू केली. यात त्यांना यशही आले. प्रथम त्यांनी तीन ट्रक दुरुस्तीला सोडले. दुरुस्ती झाल्यानंतर त्यांचे रंगकाम केले. अन्य वाहनांचीही दुरुस्ती करून घेतली. त्यानंतर कलाकारांची जुळवा-जुळव केली. सांगली, सातारा, इचलकरंजी, पुणे, नाशिक, जालना, बीड, भूम, परांडा (जि. उस्मानाबाद), कर्नाटक येथून कलाकार, तसेच कर्मचारी सात महिन्यांच्या करारावर घेतले. १६ नृत्यांगना, ३० इतर कलाकार यांच्यासह चालक, क्लिनर, आचारी असा ९६ जणांचा लवाजमा आता तयार झाला आहे. यात अनेक वर्षांपासून काम करणारे जुने कलाकारही मिळाले आहेत.
अनंतचतुर्दशीला सराव सुरू
कवलापूर शेजारच्या बुधगाव येथे संस्थानकालीन राजवाडा परिसरात अनंतचतुर्दशीला सरावाची तालीम सुरू केली आहे. लावण्या, हिंदी-मराठी चित्रपटांतील गाणी, गण-गवळण, बतावणी, वगनाट्य यांचा दिवसभर सराव सुरू आहे. नवीन साहित्याची जुळवाजुळवही केली आहे. कलाकारांच्या कपड्यांची नव्याने खरेदी केली आहे. जुने कपडे धुतले जात आहेत. नेहमीप्रमाणे विजयादशमीला बाहेर पडण्याचा प्रयत्न होता, पण दोन वाहनांचे रंगकाम पूर्ण झाले नसल्याने दौरा लांबणीवर पडला आहे, असे तमाशाचे फडप्रमुख संपत खाडे यांनी सांगितले.
जन्मभूमीत ‘श्रीगणेशा’
कवलापूर या जन्मगावी पुन्हा ‘श्रीगणेशा’ करून तमाशाचा फड पुढील दौºयासाठी रवाना होणार आहे. वाहनांचे रंगकाम पूर्ण होताच कवलापुरात पहिला खेळ केला जाणार आहे. कदाचित पुढील आठवड्यात याचे नियोजन होईल. त्यानंतर त्याच रात्री हा फड मराठवाड्यात जाईल. डिसेंबरपर्यंत या फडाचा विदर्भ, मराठवाड्यात मुक्काम असतो. तीन महिने दररोज प्रयोग सुरू असतात. गेली दोन वर्षे तेथील हंगामाला हा फड मुकला होता.