VIDEO- कात्रज प्राणिसंग्रहालयातील नवे पाहुणे तेजस, सुब्बी प्रेक्षकांच्या भेटीला
By Admin | Published: April 9, 2017 01:52 PM2017-04-09T13:52:50+5:302017-04-09T13:52:50+5:30
ऑनलाइन लोकमत पुणे, दि. 9 - मागील जवळ जवळ चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर रविवारी जेव्हा तेजस व सुब्बी ही सिंहाची ...
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 9 - मागील जवळ जवळ चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर रविवारी जेव्हा तेजस व सुब्बी ही सिंहाची जोडी आवास पिंजऱ्यातून बाहेर आली. त्यानंतर त्या जोडीला पाहणा-यांची अक्षरशः झुंबड उडाली. अनेकांनी गर्दीतून शिट्टी व टाळ्यांनी त्या जोडीचे स्वागत केले.
जंगलाचा राजा आणि राणी बाहेर येताच अनेकांचे कॅमेरा फोटो काढण्यासाठी सरसावले होते, यात बच्चेकंपनीला उत्सुकता होती, अनेक पालक देखील यात सहभागी झाले होते. जंगलच्या राजाराणीची ही जोडी अजिबात घाबरली नाही, न बावरता प्रेक्षकांना सामोरी जाऊन पोजमध्ये फोटो काढण्यासाठी उभे राहिले होते. अंदाजे 4 ते साडेचार फूट उंचीची दणकट यष्टी, त्याबरोबरच मानेवर असणारे आयाळ असलेला तेजस राजासारखा शोभत होता.
या उपक्रमाचा शुभारंभ महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप तसेच प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव यासह या विषयाचा अभ्यास करणारे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. आशियाई सिंह असण्याचे राज्यातील हे पहिलेच संग्रहालय असल्याने याची मोठी उत्सुकता होती. गुजरातहून आलेल्या तेजस आणि सुब्बी या सिंहाच्या जोडीला रविवारी नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले. या जोडीला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. कात्रजच्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या शिरपेचात एक नवीन तुरा रोवला गेला.
राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात साडेसहा वर्षांचा तेजस आणि सुब्बी या आशियाई सिंहाच्या जोडीला 21 डिसेंबर 2016 रोजी गुजरात येथील जुनागडच्या शक्करबाग प्राणिसंग्रहालयातून आणण्यात आले. या जोडीला आतापर्यंत तज्ज्ञांच्या निगराणीमध्ये प्रेक्षकांपासून दूर ठेवण्यात आले होते. त्यांना येथील वातावरण अनुकूल झाल्याने सध्या पांढऱ्या वाघाच्या खंदकात या जोडीची सोय करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी स्वतंत्र खंंदक बांधण्यात येत आहे.