VIDEO : कवयत्री बहिणाबाई चौधरी जन्मदिवस

By Admin | Published: August 24, 2016 10:02 AM2016-08-24T10:02:48+5:302016-08-24T11:36:23+5:30

कवयत्री बहिणाबाई चौधरी यांचा आज (२४ ऑगस्ट) जन्मदिवस

VIDEO: Kavantri Bahinabai Chaudhari Birthday | VIDEO : कवयत्री बहिणाबाई चौधरी जन्मदिवस

VIDEO : कवयत्री बहिणाबाई चौधरी जन्मदिवस

googlenewsNext
- प्रफुल्ल गायकवाड
मुंबई, दि. २४ - कवयत्री बहिणाबाई चौधरी यांचा आज (२४ ऑगस्ट) जन्मदिवस. बहिणाबाईंचा जन्म असोदे (जळगाव जिल्हा ) ह्या गावी नागपंचमीच्या दिवशी जन्म  २४ ऑगस्ट इ.स. १८८० रोजी महाजनांच्या घरी झाला.  हे गाव खानदेशातील जळगावापासून अंदाजे ६ कि.मी. अंतरावर आहे. जन्म ना तीन भाऊ- घमा,गना आणि घना तीन बहिणी- अहिल्या,सीता आणि तुळसा.
 
वयाच्या तेराव्या वर्षी जळगावचे खंडेराव चौधरी यांचे पुत्र नथुजी चौधरी यांच्याशी बहिणाबाईंचा विवाह झाला. नथुजी आणि बहिणाबाईंना तीन अपत्ये- ओंकार, सोपान आणि काशी झाली. जळगावच्या प्लेगच्या साथीत ओंकारला कायमच अपंगत्व आले. वयाच्या तिसाव्या वर्षी (इ.स.१९१० ?) बहिणाबाईंना वैधव्य आले.  बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. काही रचना सोपानदेव चौधरी यांनी व काही त्यांच्या मावसभावाने टिपून ठेवल्या. बहिणाबाईंचा वयाच्या बहात्तराव्या वर्षी जळगावात ३ डिसेंबर १९५१ रोजी मृत्यू झाला.
 
त्या निरक्षर होत्या; तथापि त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती. ज्यात त्यांचे सारे आयुष्य गेले, ते शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे त्या ओव्या रचून गात असत. सोपानदेव चौधरी आणि त्यांचे एक आप्त ह्यांनी जमेल तेव्हा त्या वेळोवेळी तेथल्या तेथे उतरून घेतल्या आणि जपल्या. लिहिता न येणार्‍या बहिणाबाई अहिराणीत आपल्या कविता रचत व त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरी त्या कागदावर लिहून ठेवत.
 
बहिणाबाईंच्या कविता
महाराष्ट्रातील कवी सोपानदेव चौधरी हे बहिणाबाईंचे पुत्र. बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर बहिणाबाईंचे सुपुत्र कविवर्य सोपानदेव व त्यांचे मावसबंधू श्री. पितांबर चौधरी यांनी लिहून घेतलेली बहिणाबाईंची गाणी हस्तलिखित स्वरूपात होती. आपल्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या चीजवस्तू पाहताना हे हस्तलिखित सोपानदेवांच्या हाती लागले. ह्या कविता सोपानदेवांनी आचार्य अत्रे ह्यांना दाखविल्या. अत्रे उद्‌गारले, अहो हे तर बावनकशी सोनं आहे! हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे!,आणि अत्र्यांनी त्या कविता प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला. अत्रे ह्यांच्या विस्तृत प्रस्तावनेसह बहिणाबाईंची गाणी १९५२ मध्ये (दुसरी आवृत्ती १९६९) प्रकाशित झाली आणि धरत्रीच्या आरशामधी सरग (स्वर्ग) पाहणार्‍या ह्या कवयित्रीचा महाराष्ट्रास परिचय झाला. ह्या काव्यसंग्रहात बहिणाबाईंच्या फक्त ३५ कविता आहेत; परंतु कवित्वाची कोणतीच जाणीव मनात न ठेवता, केवळ सहजधर्म म्हणून रचिलेली त्यांची बरीचशी कविता वेळीच लेखनिविष्ट न झाल्याने त्यांच्याबरोबरच नाहीशी झालेली आहे.
 
बहिणाबाईंचे हे अमोल काव्य जगासमोर आणायला आचार्य अत्रे कारणीभूत ठरले.
 
कवितांचे विषय
बहिणाबाईंच्या कविता वर्‍हाडी-खानदेशीत, त्यांच्या मातृबोलीत, रचिलेल्या आहेत.त्यांच्या कवितांचे विषय माहेर, संसार; शेतीची साधने, कापणी, मळणी इ. कृषिजीवनातील विविध प्रसंग; अक्षय्य तृतीया, पोळा, पाडवा इ. सणसोहळे; काही परिचित व्यक्ती, असे आहेत.
 
काव्य रचनेची वैशिष्ट्ये
अहिराणी (खानदेशी) भाषेतून; अतिशय सोप्या शब्दांत जीवनाचे तत्त्वज्ञान व्यक्त करणारे. खानदेशातील आसोद हे बहिणाईंचं जन्मगाव. तिथला परिसर, तिथे बोलली जाणारी खानदेशी/अहिराणी भाषा त्यांच्या काव्यातून जिवंत होते. त्या स्वत: शेतकरी जीवन जगत असल्याने शेती, जमीन, शेतकऱ्यांची सुख-दु:खे, त्यातले चढउतार, झाडे, प्राणी, निसर्ग - या सार्‍यांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता होती असे त्यांच्या काव्यातून दिसून येते.
 
उदा० असा राजा शेतकरी, चालला रे आलवानी (अनवाणी) देखा त्याच्या पायाखाले, काटे गेले वाकीसनी.
तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षण, उपजत विनोदबुद्धी, जीवनातील सुखदुःखांकडे समभावाने पाहू शकणारे शहाणपण आणि जगण्यातून कळलेले तत्त्वज्ञान ही त्यांच्या कवित्वाची वैशिष्ट्ये होत. आला सास, गेला सास, जीवा तुझं रे तंतर, अरे जगनं-मरनं एका सासाचं अंतर! किंवा लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते अशा किमान शब्दात अर्थाची कमाल गाठणारे शब्द, अरे संसार संसार - जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके - तव्हा मीयते (मिळते) भाकर किंवा देव कुठे देव कुठे - आभायाच्या आरपारदेव कुठे देव कुठे - तुझ्या बुबुयामझार. एखाद्या मोठ्या ग्रंथाचा विषय असणारे जीवनाचे तत्त्वज्ञान त्या साध्या, सोप्या, (आणि कमी) शब्दांत सहजपणे सांगून गेल्या आहेत.
 
अभिप्राय आणि समीक्षा
जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे बावनकशी सोन्याप्रमाणे बहिणाबाईंचे काव्य आहे, हा तर मोहोरांचा हंडा आहे, अशा शब्दांत आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंच्या काव्याविषयी अभिप्राय दिला होता.
 
काव्य रचनांचा अभ्यास
बहिणाबाईंच्या काव्याचा शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश असतो.
 
काव्य रचनांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम
बहिणाबाईंच्या काव्यरचनांवर आधारित खानदेशचा मळा आणि मराठवाड्याचा गळा हा सांस्कृतिक कार्यक्रम मराठवाड्यातील गायकांच्या आवाजात सादर केला जातो. 
 
लघुपट
दूरदर्शनने बहिणाबाईंवर लघुपट काढला होता. त्यात भक्ती बर्वे बहिणाबाई झाल्या होत्या. त्यानंतर दिग्दर्शक अतुल पेठे यांनी बहिणाबाईंच्या कवितांच्या प्रेरणांवर आधारित बहिणाई नावाच्या लघुपटाची निर्मिती केली. 
 
भाषांतरे
बहिणाबाईंच्या काव्याचा इंग्रजी अनुवाद फ्रॅग्रन्स ऑफ दि अर्थ या कवितासंग्रहाच्या रूपाने प्रकाशित झाला आहे. अनुवादक माधुरी शानभाग आहेत. बहिणाबाईंचे अल्पचरित्र, आचार्य अत्रे, बा.भ. बोरकर, पु.ल. देशपांडे, इंदिरा संत यांनी लिहिलेली स्फुटे आणि मालतीबाई किर्लोस्कर आणि प्रभा गणोरकर यांची समीक्षा देखील या पुस्तकात समाविष्ट केली आहे.
 
यापूर्वी प्रा. के.ज. पुरोहित यांनी बहिणाबाईंच्या निवडक कवितांचा इंग्रजी अनुवाद केला होता.
 
सौजन्य : मराठी विकिपीडिया 
 

Web Title: VIDEO: Kavantri Bahinabai Chaudhari Birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.