VIDEO - कोकण रेल्वेत चहाबिस्कीट घोटाळा, सतर्क प्रवाशाने केला उघड
By Admin | Published: August 26, 2016 06:20 PM2016-08-26T18:20:21+5:302016-08-26T19:15:51+5:30
लांब पल्याच्या रेल्वे गाडयांमध्ये चहा विकणाऱ्याकडुन प्रवाशांची होणारी फसवणुक एका प्रवाशाने उघडकीस आणली. इतकेच नव्हे तर लुबाडणाऱ्या रेल्वेच्या कंत्राटदाराला देखील त्याने चांगलाच धडा शिकवीला.
- जनशताब्दी लोकलमधील प्रकार
गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई: लांब पल्याच्या रेल्वे गाडयांमध्ये चहा विकणाऱ्याकडुन प्रवाशांची होणारी फसवणुक एका प्रवाशाने उघडकीस आणली. इतकेच नव्हे तर लुबाडणाऱ्या रेल्वेच्या कंत्राटदाराला देखील त्याने चांगलाच धडा शिकवीला.
दिपक जाधव असे या प्रवाशाचे नाव आहे. ते मुळचे गोरेगावचे रहिवासी असुन ते 'लोकसेवा प्रतिष्ठान' या संस्थेचे अध्यक्ष आहेत. कोकणातील देवगड या त्यांच्या गावी गेलेले जाधव पाच जुलै रोजी कणकवलीहुन मुंबईला जनशताब्दी गाडीने परतत होते. जवळपास अडीचच्या सुमारास त्यांनी गाडी पकडली. त्याच संध्याकाळी गाडीत चहा विक्रीसाठी येणाऱ्या एका व्यक्तीकडे त्यांनी चहा मागितला. तेव्हा त्या चहाची किंमत त्याने दहा रुपये असल्याचे सांगितले. त्यामुळे जाधव यांनी त्याच्याकडे मेनुकार्ड मागितले. तेव्हा मेनुकार्ड न दाखवता त्याने चक्क जाधव यांना 'लेने का है तो लो, वरना जाओ', असे उद्धटपणे उत्तर दिले. त्यावेळी त्यांनी तुझ्या मेनेजरला बोलव, असे सांगितले. तेव्हाही 'तुम जाकर बुलाकर लाओ', असे उत्तर त्याने जाधव याना दिले. अखेर जाधव यांनी आवाज चढवला, तेव्हा कोणीतरी जाऊन चहा विक्रेत्यांचा मॅनेजर ए के राय जो सनशाईन प्रायव्हेट लिमिटेड नामक कंपनीचा प्रमुख आहे त्याला बोलावुन आणले. तो आल्यानंतर जाधव आणि अन्य प्रवाशांनी रायला घेरले आणि त्याची चांगलीच कानउघडणी केली. मुख्य म्हणजे ज्यांना दहा रुपयाने चहाचा कप विकण्यात आलेला त्या सर्वांना त्यांचे तीन रुपये परत करण्यास सांगण्यात आले. ज्यात वतानुकुलीत डब्यातील प्रवाशांचा देखील समावेश होता. रायला जाधव यांच्यासह अन्य प्रवाशांनी देखील घेरले. त्यानंतर याप्रकरणी टीसीकडे लेखी तक्रार करण्यात आली. ज्याची प्रत 'लोकमत' कडे आहे. यांच्यावर काय कारवाई करणार असे विचारले असता त्यांना मेमो देण्यात येणार असे उत्तर टीसीकडून देण्यात आले. दर दिवशी लाखो प्रवासी या लोकलने प्रवास करतात. त्यामुळे दिवसभरात गाडीत चहा पिणाऱ्यांची संख्या देखील तितकीच मोठी आहे . त्यानुसार प्रत्येकाकडून जर तीन रुपये विनाकारण आकारले जात असतील तर रेल्वेचे कंत्राटदार महिनाभरात लोकलमधुन किती कोटींची फसवणुक करत असतील याचा नुसता अंदाजच केलेला बरा, ज्याची माहिती खरच रेल्वे प्रशासनाला नसेल का, असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे.
'बिस्कीट मिळालेच नाही' !
'आम्ही राय याला अख्या रेल्वेत फिरवले आणि त्याच्या माणसांनी कोणा कोणाला चहा विकला याबाबत विचारणा केली. तेव्हा ज्यांना या लोकांनी चहा विकला त्या प्रत्येकाकडून चहाच्या एका कपासाठी दहा रुपये आकारण्यात आलेले मात्र कोणालाही बिस्कीट चा पूड मिळाला नसल्याचे उघड झाल्याचे जाधव यांनी 'लोकमत' शी बोलताना सांगितले.
प्रत्येक डब्यात रेटकार्ड लावा
दर दिवशी प्रवाशांची नकळतपणे फसवणुक करणाऱ्या कंत्राट दारांना धडा शिकवायचा असेल तर खाद्य पदार्थाचे रेट कार्ड प्रत्येक डब्यात लावण्यात यावे, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. कारण हे कार्ड नेहमी लपविले जाते आणि त्याचा गैरफायदा उठविला जातो.
(जागरूक प्रवासी दीपक जाधव)