VIDEO- जमिनीला मिळाला कवडीमोल दर; धरणही उठले मुळावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2016 05:43 PM2016-08-16T17:43:15+5:302016-08-16T22:06:18+5:30
शेतीला शाश्वत सिंचनाची सोय मिळणार, या आशेने शेतकऱ्यांनी ८ वर्षांपूर्वी आपल्या लाखमोलाच्या जमिनी अगदीच कवडीमोल दरात धरणासाठी दिल्या
सुनील काकडे/ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 16 - शेतीला शाश्वत सिंचनाची सोय मिळणार, या आशेने शेतकऱ्यांनी ८ वर्षांपूर्वी आपल्या लाखमोलाच्या जमिनी अगदीच कवडीमोल दरात धरणासाठी दिल्या. मात्र प्रारंभीपासून रेंगाळलेले धरणाचे काम, रस्त्यांअभावी शेतात जाण्याची बंद झालेली वहिवाट, खंडित असणारा विद्युत पुरवठा, धरणाच्या बुडित क्षेत्रात उगवलेली झाडे यासह असंख्य समस्यांनी फायदेशीर ठरू पाहणारे धरण अक्षरश: शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे.
वाशिम जिल्ह्यातील कवठळ (ता. मंगरूळपीर) येथील शेतकऱ्यांसंदर्भातील हा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असताना प्रशासकीय यंत्रणेला मात्र त्याचे कुठलेच सोयरसुतक राहिलेले नाही. ८ वर्षांपूर्वी कवठळला सिंचन प्रकल्प मंजूर झाला. यासाठी गावातील शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने लाखमोलाच्या जमिनी लघूसिंचनला ७० हजार रुपये प्रतिएकराने संपादित करून दिल्या. मात्र, मध्यंतरीचे सुमारे ७ वर्षं या धरणाचे काम प्रचंड प्रमाणात रेंगाळले. धरणाची भिंत उभारत असताना त्या ठिकाणी असलेली झाडे मुळासकट न उखडल्यामुळे धरणाच्या बुडित क्षेत्रात आजमितीस शंभरावर मोठी झाडे उभी झाली आहेत. यामुळे धरणाला धोका उद्भवण्यासोबतच मत्स्यव्यवसायावरही गदा आली आहे. धरणाच्या दोन्ही बाजूंनी गावातून शेतात जाण्यासाठी असलेला जुना रस्ता थातूरमातूर स्वरूपात तयार झाला. सद्या या रस्त्यावरून साधी बैलगाडी देखील जावू शकत नाही. विद्यूत पुरवठ्यासंबंधीच्या विविध समस्यांमुळेही शेतकरी अक्षरश: हैराण झाले आहेत. लघूसिंचन विभागाने शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष पुरवावे, अशी मागणी जोर धरत आहे.
..........................
शेतीला सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी, या हेतूने कवडीमोल दराने शासनाला जमीन दिली. मात्र, धरणाचे काम अत्यंत बोगस झाल्याने विविध समस्या उद्भवल्या आहेत. मध्यंतरी विद्यूत खांब कोसळल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले.
-संजय देशमुख, शेतकरी, कवठळ