VIDEO: लष्करी व शासकीय इतमामात शहीद महादेव तुपारे यांना अखेरचा निरोप

By Admin | Published: March 12, 2017 05:19 PM2017-03-12T17:19:46+5:302017-03-12T17:19:46+5:30

ऑनलाइन लोकमत कोल्हापूर, दि. 12  - अमर रहे... अमर रहे, शहीद जवान महादेव तुपारे अमर रहे..  भारत माता की ...

VIDEO: The last message to martyr Mahadev Tupare in military and government affairs | VIDEO: लष्करी व शासकीय इतमामात शहीद महादेव तुपारे यांना अखेरचा निरोप

VIDEO: लष्करी व शासकीय इतमामात शहीद महादेव तुपारे यांना अखेरचा निरोप

Next
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 12  - अमर रहे... अमर रहे, शहीद जवान महादेव तुपारे अमर रहे..  भारत माता की जय, वीर जवान तुझे सलाम, वंदे्मातरम अशा गगनभेदी घोषणांनी व साश्रुपूर्ण नयनांनी हजारोंच्या उपस्थितीत शहीद जवान महोदव तुपारे यांना चंदगड तालुक्यातील महिपाळगड येथील शिवराज हायस्कूलच्या पटांगणावर लष्करी व शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. 
 यावेळी शहीद महादेव तुपारे यांच्या पार्थिवास राज्य शासनाच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली. याबरोबरच खासदार धनंजय महाडिक, आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी राज्यमंत्री भरमुअण्णा पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलीस अधीक्षक महादेव तांबडे यांनीही शहीद महोदव तुपारे यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी शहीद महादेव तुपारे यांचे वडील पांडुरंग तुपारे, आई सुमन तुपारे, पत्नी रुपा तुपारे आणि मुलगा प्रितम आणि औंश यांच्यासह हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. 
 शहीद महादेव तुपारे यांचे तिरंग्यात लपेटलेले पार्थिव आज सकाळी मूळ गावी महिपाळगड येथे आणण्यात आले. प्रथम त्यांच्या घरी त्यांच्या कुटुंबियांच्या अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले. वडील पांडुरंग तुपारे, आई सुमन तुपारे, पत्नी रुपा तुपारे, मुलगा प्रितम आणि औंश तसेच नातेवाईक आणि जनसमुदायांनी साश्रुनयनांनी अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. यानंतर महिपाळगड गावातून शहीद महादेव तुपारे यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूने जमलेल्या लोकांनी साश्रुनयनांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी केली. अंत्ययात्रेच्या मार्गावर दोन्ही बाजूला रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या व रस्त्याचा मध्य मार्ग विविध फुलांच्या पाकळ्यांनी सजवला होता. गावातील प्रत्येक चौकात महादेव तुपारे अमर रहे.. वीर जवान तुझे सलाम अशा घोषणांचे बॅनर्स लावण्यात आले होते. रस्त्याच्या दुतर्फा गावातील महिला, आबालवृध्द, तरूण मुले, मुली शहीद महादेव तुपारे यांच्या पार्थिवावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करत होते. 
 शहीद महादेव तुपारे यांचे पार्थिव महिपाळगड येथील शिवराज विद्यालयाच्या प्रांगणात उपस्थित जनसमुदायाच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी लष्करी व पोलीस दलातील जवानांनी शहीद जवान महादेव तुपारे यांना अखेरची मानवंदना दिली. त्यावेळी उपस्थित जवान, तसेच जनसमुदायाच्या शोकभावना अनावर झाल्या. राष्ट्रध्वज शहीद जवान महादेव तुपारे यांचे वडील पांडुरंग तुपारे यांच्या हाती लष्कराच्यावतीने अर्पण करण्यात आला. यावेळी राज्य शासनाच्यावतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तसेच कुटुंबियांनी शहीद जवान महादेव तुपारे यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली अर्पण केली.   
 शहीद जवान महादेव तुपारे यांचे  पार्थिव  महिपाळगड येथील शिवराज विद्यालयाच्या पटांगणावर खास तयार केलेल्या आणि फुलांनी सजविलेल्या चौथऱ्यावर आणण्यात आले. यावेळी वडील पांडुरंग तुपारे यांनी शहीद जवान महादेव तुपारे यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करुन अखेरचा निरोप दिला.  लष्कराच्या 8 जवानांच्या तसेच पोलीस दलाच्या 8 जवानांच्या तुकडीने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शहीद महादेव तुपारे यांना अखेरची मानवंदना दिली. त्यानंतर शहीद जवान महादेव तुपारे यांचे बंधु कुंडलिक तुपारे यांनी शहीद जवान महादेव तुपारे यांच्या पार्थिवास भडाग्नी दिला. यावेळी अमर रहे... अमर रहे शहीद महादेव तुपारे अमर रहे.. भारत माता की जय, वीर जवान तुझे सलाम अशा शोकाकुल घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
राज्य शासनाच्या वतीने 8 लाखाची मदत ..पालकमंत्री चंद्रकांत पाटील
  शहीद जवान महोदव तुपारे हे कोल्हापूरचेच नव्हे तर महाराष्ट्राचे भूषण आहेत. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात महाराष्ट्र शासन सहभागी असून शासन पूर्णपणे त्यांच्या कुटुंबियांच्या मागे खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही देऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्य शासनाच्यावतीने शहीद जवान महोदव तुपारे यांच्या कुटुंबियांना 8 लाखाची मदत प्राधान्याने दिली जाईल, याबरोबरच केंद्र शासनाकडूनही मदत मिळेल. लेह लडाखमधील दराज सेक्टरमध्ये ते सेवा बजावत असतांना प्रचंड बर्फवृष्टीत सापडून त्यांना वीरमरण आले. त्यांच्या मृतात्म्यास सदगथी लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थनाही  पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
  यावेळी प्रांताधिकारी संगीता राजापुरकर-चौगुले, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल सुभाष सासने, तहसिलदार आप्पासाहेब समिंदर,गट विकास अधिकारी एस.डी. सोनवणे, लेफ्टनंट कर्नर कावेरीअप्पा, सैनिक कल्याण विभागाचे सुभेदार मेजर शेळके,  पोलीस निरिक्षक महावीर सकळे,  गोकुळचे संचालक रामराजे कुपेकर, सग्राम कुपेकर, राजेश पाटील, गोपाळ पाटील, सरपंच दशरथ भोसले, उपसरपंच अशोक कदम यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी शासकीय, पोलीस व लष्करी अधिकारी, जवान आणि कोल्हापूर जिल्हयातील हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.
 

https://www.dailymotion.com/video/x844tzk

Web Title: VIDEO: The last message to martyr Mahadev Tupare in military and government affairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.