VIDEO- राजीनामा देतो म्हणणे शिवसेनेचा राजकीय स्टंट- रावसाहेब दानवे
By Admin | Published: February 9, 2017 07:08 PM2017-02-09T19:08:37+5:302017-02-09T19:08:37+5:30
ऑनलाइन लोकमत वर्धा, दि. 9 - राज्यात २५ जिल्हा परिषदा आणि १० महापालिकांच्या निवडणुका आहे. यामध्ये शिवसेना आणि भारतीय ...
ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. 9 - राज्यात २५ जिल्हा परिषदा आणि १० महापालिकांच्या निवडणुका आहे. यामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती नाही. त्यामुळे आम्ही स्वतंत्रपणे निवडणुका लढतो आहे. निवडणुकीचा स्टंट म्हणून एखादा पक्ष आम्ही राजीनामा देतो म्हणत असेल, तर मला वाटते त्याला गांभीर्याने घेण्याचे कारण नाही, असा पलटवार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी येथे केला.
सेलू तालुक्यातील येळाकेळी येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचार सभेअंती पत्रकारांशी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, आमच्या दोन्ही पक्षांची युती या निवडणुकीमध्ये नाही. परंतु राज्य सरकारमध्ये आम्ही मिळून काम करतो. शिवसेनेने भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा काढलेला नाही. राजीनामा खिशामध्ये घेऊन फिरतो, असे जे ते म्हणत असले तरीही ते राजीनामा देणार नाही. याची मला खात्री आहे. हे सरकार पाच वर्षे चालणारे सरकार आहे. सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
अतिरेक्यांना बनावट नोटा देऊन भारतात पाठवले होते. आता नोटाबंदीमुळे अतिरेक्यांना जायला पैसे नाही. त्यामुळे बऱ्याच अतिरेक्यांनी सरकारला समर्थन दिलेले आहे. पाकिस्तानातीलच ते चारशे अतिरेकी असल्याचे सांगून नोटाबंदीचे समर्थन खा. दानवे यांनी यावेळी केले. यावेळी खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, भाजपाचे विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, वर्धेचे नगराध्यक्ष अतुल तराळे, राणा रणनवरे यांच्या भाजपाचे उमेदवार उपस्थित होते.
गोपीनाथ मुंडेंच्या वाढदिवसाबाबतचे वक्तव्य बिनबुडाचे
अजित पवारांनी गोपीनाथ मुंडेंबाबत जे वक्तव्य ते अत्यंत निराधार, चुकीचे आणि बिनबुडाचे आहे. गोपीनाथराव या राज्याचे एक ज्येष्ठ नेते होते. तळागाळापर्यंत पोहोचलेले नेते होते, अशा शब्दांत त्यांनी अजित पवारांच्या त्या वादग्रस्त वक्तव्याला खोडून काढले.