VIDEO - लोककलाकारांचा पुरस्कारांसाठी विचार करणारे लोकमत पहिले वर्तमानपत्र - अशोक हांडे
By Admin | Published: April 11, 2017 06:59 PM2017-04-11T18:59:12+5:302017-04-11T23:06:26+5:30
लोककलाकारांचा पुरस्कारांसाठी विचार करणारे लोकमत हे पहिले वर्तमानपत्र आहे असे मनोगत पुरस्कार स्वीकारल्यानंतर अशोक हांडे यांनी व्यक्त केले.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - लोकमत फक्त समाजाचा आरसा नाहीय तर, समाजात दडलेल्या प्रतिभेला शोधणारी विशाल काच आहे. लोककलाकारांचा पुरस्कारांसाठी विचार करणारे लोकमत हे पहिले वर्तमानपत्र आहे असे मनोगत पुरस्कार स्वीकारल्यानंतर अशोक हांडे यांनी व्यक्त केले. परफॉर्मिंग आर्ट्स विभागात अशोक हांडे यांना लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार मिळाला.
युपीएल प्रस्तुत लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पॉवर्ड बाय कर्म आणि अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने साकारत आहे.
मी हा पुरस्कार सर्व लोककलाकरांना समर्पित करतो असे अशोक हांडे यांनी सांगितले. मराठी भाषेचा अभिमान मराठी बाण्याने सांगणारे अवलिया कलावंत अशोक हांडे यांना यंदाच्या परफॉरमिंग आर्ट (Performing Arts) विभागातील "महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
विधान परिषदेचे विरोधी नेते धनंजय मुंडे, माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे आणि भरत दाभोळकर यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या विभागात निरंजन भाकरे, पूजा गायतोंडे, सत्यपाल विश्वनाथ चिंचोळकर (महाराज, सप्त खंजिरीवादक कीर्तनकार , अकोला), सुभाष नकाशे(कोरियोग्राफर) यानांही नामांकित करण्यात आले होते. मात्र, जनतेनं अशोक हांडे यांच्या नावाला पसंती दिली आहे.
अशोक हांडे यांच्या कार्याची संक्षिप्त माहिती
ऑर्केस्ट्राच्या जमान्यात स्वत:ची वेगळी छाप टाकत थीम बेस कार्यक्रमांची सुरुवात करणारा, देशभक्ती सारखा विषय मनोरंजक पध्दतीने मांडून तरुणांमध्ये देशाप्रती स्फुल्लिंग चेतविणारा, मराठी भाषेचा अभिमान मराठी बाण्याने सांगणारा अवलिया कलावंत. मु. पो. उंब्रज, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे येथे अशोक हांडे यांचा जन्म झाला. अत्यंत गरीब कुटुंब, घरी कोरडवाहू शेती, पण वारकरी संप्रदायाचे संस्कार त्यामुळे भजन, भारुड, जात्यावरच्या ओव्या याचे संस्कार लहानपणापासूनच त्यांच्यावर झाले. पुढे ते शालेय जीवनात मुंबईत आले. तेथे त्यांच्यातल्या लोककलेचा पींड जोपासला गेला आणि निर्माता, लेखक, दिग्दर्शक, संगीतकार, कलादिग्दर्शक, गायक आणि सूत्रसंचालक अशा विविधअंगी रुपातून त्यांच्यातला खराखुरा परफॉर्मर विकसित झाला. ज्या काळात आॅर्केस्ट्राचे पेव फुटले होते त्याकाळी स्वत:ची वेगळी छाप टाकत मंगलगाणी-दंगलगाणी नावाचा कार्यक्रम अशोकने सादर केला. मराठी गाण्यांचा प्रवास मंगलतेकडून दंगलीकडे कसा वळला हा विचारप्रर्वतक कार्यक्रम त्यांनी केला आणि त्यांना प्रेक्षकांची नस सापडली. लोककलेचा सांगितीक प्रवास रंजक पध्दतीने मांडणारा हा कार्यक्रम जगभरात गेला. त्याचे १९९७ प्रयोग झाले. त्यानंतर त्यांनी आवाज की दुनिया हा भारतीय लोककलांवर आधारित हिंदी कार्यक्रम बसवला. याचेही जगभरात १६०० प्रयोग झाले. आजादी ५० हा अनोखा कार्यक्रम अशोक हांडे यांनी सादर केला व पुन्हा एकदा लोककलेच्या माध्यमातून भारताच्या ५ हजार वर्षांचा इतिहास त्यांनी रंगमंचावर जीवंत केला. रोमांच उभे करणाºया या कार्यक्रमाचे ५५० च्या वरती प्रयोग झाले.फिल्मी संगीतावर आधारित गाने सुहाने, माणिक वर्मा यांचे सांगितीक चरित्र मांडणारा मराठी गाण्यांचा माणिक मोती, आपली आवड, मनचाहे गीत, स्वागत २०००, असे कार्यक्रमही त्यांनी केले. लता मंगेशकर यांच्या जीवनावर आधारित अमृतलता, भारतीय संस्कृतीचे समग्र दर्शन घडवणारा मेगा शो आय लव्ह इंडिया, जनकवी पी. सावळाराम यांच्या जीवनावर आधारित गंगा जमुना, मधुबालाच्या संपूर्ण जीवनावर आधारित व तिच्यावर चित्रीत झालेला मधुरबाला, कै. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी निमित्त आधारित मी यशवंत, अत्रे, अत्रे सर्वत्रे असा आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या जीवनावर आधारित कार्यक्रम अशा अनेकाविध सांगितीक कार्यक्रमाचे जवळपास ९ हजार प्रयोग अशोक हांडे यांनी केले आहेत. हा एक अनोखा विक्रम आहे.
समाजातील घडामोडींचे वास्तव मांडत, आपल्या वेदनेच्या हुंकाराला न्याय देणारा "लोकमत" समाजाला दिशा देण्याचा वसा घेतलेल्या सेवाव्रतींचा गौरव करण्याच्या संकल्पाचे "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" पुरस्काराचे यंदाचे हे चौथे पर्व आहे. चौथ्या पर्वात ‘लोकसेवा-समाजसेवा’, ‘परफॉर्मिंग आर्ट््स‘, ‘कला’, ‘क्रीडा’, रंगभूमी, मराठी चित्रपट, ‘उद्योग’, ‘पायाभूत सेवा’, ‘राजकारण’, ’प्रशासन (आश्वासक)’ यातील एकंदर १३ कॅटेगरींसह ‘वैद्यकीय’ क्षेत्राचा समावेश नव्याने करण्यात आला आहे.
या भूमीशी ज्यांनी रक्ताचे आणि घामाचे नाते जोडले, ज्यांनी आपले आयुष्य इथल्या समृद्धीसाठी वेचले, अशा महाराष्ट्रीयनांचा सन्मान करण्यासाठी लोकमतने सुरू केलेला महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर पुरस्कार सोहळा मोठ्या थाटामाटात मुंबईतील सांताक्रूझ विमानतळाजवळील सहारा स्टार हॉटेलमध्ये पार पडला.
‘लोकमत’ने केलेल्या मंथनातून जाहीर झालेली १४ कॅटेगरीतील नामांकने आणि लोकमताचा कौल यावर अंतिम निवडीचा साज चढविण्याची जबाबदारी आनंदाने पार पाडणाऱ्या ज्युरी मंडळात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, डॉ. प्रकाश आमटे, अर्णव गोस्वामी, मिलिंद देवरा, महेश भट्ट, विक्रम लिमये, विक्रम श्रॉफ, सुनील सूद, डॉ. रमाकांत पांडा, विजय दर्डा आणि मृणाल कुलकर्णी यांचा सहभाग आहे.
महाराष्ट्राचे व्यक्तिस्वरूप मानबिंदू हेरण्यासाठी "लोकमत"च्या संपादकीय चमूने गेले काही महिने मंथन केले. कर्तृत्वशाली व्यक्तिमत्वांचा शोध घेतला. त्यातून साकारलेली नामांकने आणि वाचकांच्या मताचा कौल यावर अंतिम निवडीचा साज चढविण्याची जबाबदारी ज्युरी मंडळानं आंनदानं पार पाडली.
समाजमनावर प्रभाव टाकणाऱ्या तसेच विकास आणि समृद्धीच्या वाटचालीत भर टाकलेल्या नानाविध क्षेत्रांमधील प्रतिभेचा आरसा म्हणून युपीएल प्रायोजित "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" पुरस्कारांकडे पाहिले जात आहे.
यंदा मोलाची भर...: आता चौथ्या पर्वात "लोकसेवा-समाजसेवा", "परफॉर्मिंग आर्ट्स", "कला", "क्रीडा", रंगभूमी, मराठी चित्रपट, "उद्योग", ‘पायाभूत सेवा’, "राजकारण", "प्रशासन (आश्वासक)" यातील एकंदर १३ कॅटेगरींसह "वैद्यकीय" क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या १४ पुरस्कारांच्या व्यतिरिक्त स्पर्धेच्या पलीकडे जाणारे उत्तुंग कर्तृत्व सिद्ध केलेल्या सहा महनीय व्यक्तींना विशेष पुरस्कार दिला जाणार आहे.
नामांकन प्राप्त व्यक्तींना जगभरातील वाचकांनी लोकमतच्या वेबसाइटवर मतदानाद्वारे दिलेली पसंती तसेच ११ नामवंत ज्युरींचा कौल यांच्या एकत्रित विचारातून या पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत. तब्बल दोन दशलक्ष वाचकांनी या मतदानात सहभागी होत १४ कॅटेगरीतील नामांकनांसाठी दीड कोटी मते नोंदविली.
सर्व पुरस्कारांच्या माहितीसाठी क्लिक करा