VIDEO : महाराष्ट्र रडतोय, गुजरात हसतोय...
By Admin | Published: August 10, 2016 06:24 PM2016-08-10T18:24:07+5:302016-08-10T18:24:07+5:30
महाकाय सरदार सरोवर प्रकल्प तुडुंब भरला असून धरणाच्या भिंतीवरून फेसाळणाऱ्या धबधब्याचा गुजरात सरकार पर्यटन उत्सव साजरा करीत असून दुसरीकडे मात्र नर्मदेच्या वाढलेल्या पाणी
- रमाकांत पाटील
नंदुरबार, दि.10 - महाकाय सरदार सरोवर प्रकल्प तुडुंब भरला असून धरणाच्या भिंतीवरून फेसाळणाऱ्या धबधब्याचा गुजरात सरकार पर्यटन उत्सव साजरा करीत असून दुसरीकडे मात्र नर्मदेच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे महाराष्ट्रातील एक हजारावर कुटुंबांच्या जीवावर बेतली आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठा मानला जाणारा सरदार सरोवर प्रकल्प अखेर पुढे रेटला असून या प्रकल्पाने नियोजित उंची गाठली आहे. १३८ मीटर उंचीचा हा प्रकल्प असून सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनुसार वेळोवेळी त्याचे बांधकाम झाले आहे. धरणाची भिंत १२१.९२ मीटर पूर्ण झाली असून त्यावर १६ मीटर उंचीचे ३६ दरवाजे बसविण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. आता दरवाजे बंद करण्याचा निर्णय न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे. या प्रकल्पामुळे वीज निर्मितीही सुरू झाली असून करारानुसार त्याचे वितरण महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशला होत आहे.
सध्या नर्मदेच्या उगम क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने नर्मदेवरील मध्य प्रदेशातील चारही धरणे तुडुंब भरली आहेत तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर असलेला सरदार सरोवर प्रकल्पदेखील भरला आहे. या प्रकल्पाचे दरवाजे बंद करण्याचे आदेश नसल्याने प्रकल्पाच्या भिंतीवरून साडेतीन मीटरवरून पाणी ओसंडून वाहत आहे. हे पाणी १२२ मीटर खाली कोसळत असल्याने याठिकाणी भव्य असा धबधबा निर्माण झाला आहे. पर्यटकांसाठी तो लक्षवेधी ठरल्याने गुजरात सरकारनेही ते ‘कॅच’ केले आहे. याठिकाणी ‘केवडीया मान्सून फेस्टीव्हल’ सुरू करण्यात आला असून पर्यटकांना आकर्षीत करण्यासाठी गुजरात पर्यटन विभागातर्फे विविध गॅलरी व मनोरंजनाचे उपक्रमही सुरू केले आहेत. त्यामुळे गुजराथी पर्यटकांना चांगलीच मेजवानी मिळाली असून पर्यटकांची येथे धूम सुरू आहे.
गुजरातमध्ये मान्सून फेस्टीव्हलचा जल्लोष
- सरदार सरोवर प्रकल्पाच्या ठिकाणी गुजरातच्या पर्यटन विभागाने केवडीया मान्सून फेस्टीव्हल सुरू केला आहे. या फेस्टीव्हलचा आनंद लुटण्यासाठी रोज जवळपास १० हजारापेक्षा अधिक पर्यटक येथे येत आहेत. धरणस्थळी निर्माण झालेला भव्य धबधबा पर्यटकांना आकर्षीत करीत असून हे नयनरम्य दृष्य डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटकांची अक्षरश: झुंबड उडत आहे. याठिकाणी गुजरात पर्यटन विभागाने स्वतंत्र मनोरंजनाची सुविधाही उपलब्ध केली आहे. विशेषत: पाण्याच्या थंडगार फवाऱ्याखाली डीजेच्या तालावर ‘गरबा’ खेळण्याची येथे सुविधा उपलब्ध केल्याने हजारो पर्यटक गरबाच्या तालावर घेर घेत आहेत. याशिवाय डीजेच्या तालावर तरुणाई थिरकत आहे. याचठिकाणी दोन भव्य तंबू टाकून त्यात संपूर्ण गुजरातमधील लक्षवेधी स्थळांची छायाचित्रे आहेत. त्याठिकाणी पर्यटकांना फोटो घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तर दुसरीकडे गुजरात पर्यटन विभागाच्या जाहिराती भव्य स्क्रीनवर दाखवल्या जात आहेत. याच प्रकल्पाजवळ सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात मोठा ‘स्टॅचू आॅफ युनिटी’चे बांधकामही सुरू असून त्याची माहितीही येथे दिली जात आहे.
महाराष्ट्रातील एक हजार कुटुंब रडकुंडीला
- सरदार सरोवर प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील ३३ गावांचे पुनर्वसन सुरू आहे. अद्याप मूळ गावात घोषित-अघोषित असे सुमारे एक हजारापेक्षा अधिक कुटुंब त्या गावांमध्ये राहत आहेत. पाण्याची पातळी वाढल्यामुळे या गावांना टापूचे स्वरुप प्राप्त झाले आहे. साहजिकच त्या मूळ गावात राहणाऱ्या कुटुंबांना जगण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. आधीच रस्ते, वीज, पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण याची गंभीर समस्या त्यातच पाणी पातळी वाढल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेषत: नर्मदेत मगरींचे प्रमाण अधिक असल्याने पाण्याची पातळी घराजवळ आल्याने नदीकाठावरील कुटुंबांना त्याचा धोका निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी किंवा लोकांना बाजारहाटसाठी होडीचाच वापर करावा लागतो. चिमलखेडी, मणिबेली, भादल, बामणी, बिलगाव आदी गावातील अनेक कुटुंबांच्या घराजवळ पाणी आले असून शेतकऱ्यांची शेतीही पाण्यात बुडाली आहे. पाणी पातळी वाढल्यानंतर या कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी प्रशासनातर्फे तेथे शेड बांधण्यात आले असले तरी त्यांची अवस्था वाईट आहे. त्यामुळे येथील जनता अक्षरश: रडकुंडीला आली आहे.