VIDEO : वाशिम जिल्ह्यातील अनेक गावांत उघड्यावर होतात अंत्यसंस्कार!
By Admin | Published: October 7, 2016 02:30 PM2016-10-07T14:30:47+5:302016-10-07T14:31:09+5:30
वाशिम जिल्ह्यांतील अनेक गावांमध्ये सुसज्ज स्मशानभूमी तर सोडाच; पण मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाटी साधी टिनशेडही नाही.
सुनील काकडे, ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. ७ - जिल्ह्यातील ७९२ गावांपैकी अधिकांश गावांमध्ये अद्याप सुसज्ज स्मशानभूमी तर सोडाच; पण मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी साधे ‘टिनशेड’ देखील उभारले गेलेले नाही. परिणामी, विकासाच्या वाटा धूसर झालेल्या संबंधित गावांमधील ग्रामस्थांना उघड्यावरच अंत्यसंस्कार उरकावे लागत आहेत.
महाराष्ट्रातील अनेक बडी शहरे सद्या ‘मेट्रो सिटी’च्या नावाने ओळखल्या जावू लागली आहेत. मात्र, वाशिमसारख्या मागासलेल्या जिल्ह्यांच्या विकासाकडे शासनकर्त्यांचे अद्याप पुरेसे लक्ष नसल्याची बाब अविकसीत खेड्यांकडे वळल्यानंतर प्रकर्षाने अधोरेखीत होते. ४९१ ग्रामपंचायती आणि ७९२ गावे मिळून १ जुलै १९९८ मध्ये नव्याने उदयास आलेल्या वाशिम जिल्ह्यातील खेड्यांमध्ये वास्तव्य करणारे नागरिक आजही सर्वांगीण विकासापासून कोसोदूर आहेत.
जीवन जगत असताना विविध समस्यांचा धैर्याने सामना करणाºयांची किमान मृत्यूनंतर तरी अवहेलना व्हायला नको, यासाठी प्रत्येक ठिकाणी ‘टिनशेड’, बैठक व्यवस्थेसह सुसज्ज स्मशानभूमी असायला हवी. मात्र, जिल्ह्यातील अधिकांश गावांमध्ये सुसज्ज स्मशानभूमीची व्यवस्था नसल्यामुळे ग्रामस्थांना उघड्यावरच अंत्यविधी उरकावा लागतो. उन्हाळा आणि हिवाळ्याच्या दिवसांमध्ये हा प्रकार चालूनही जातो. मात्र, पावसाळ्याच्या दिवसांत धो-धो पाऊस कोसळत असताना अशाच बिकट परिस्थितीत मृतदेहांना अग्नी द्यावा लागतो. तथापि, प्रशासकीय उदासिनतेमुळे मृतदेहांची अशाप्रकारे विटंबना होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत आहे.