VIDEO : मराठा क्रांती मूक मोर्चा धडकला बीदरमध्ये

By admin | Published: October 19, 2016 08:37 PM2016-10-19T20:37:28+5:302016-10-19T20:37:28+5:30

महाराष्ट्रातील मराठा क्रांती मूक मोर्चाचे लोण आता कर्नाटकातही पोहोचले आहे. कोपर्डी घटनेतील आरोपींना शिक्षा, आरक्षण यासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाज

VIDEO: Maratha Kranti silence marcha in Bidar | VIDEO : मराठा क्रांती मूक मोर्चा धडकला बीदरमध्ये

VIDEO : मराठा क्रांती मूक मोर्चा धडकला बीदरमध्ये

Next

ऑनलाइन लोकमत
बीदर, दि. 19 -  महाराष्ट्रातील मराठा क्रांती मूक मोर्चाचे लोण आता कर्नाटकातही पोहोचले आहे. कोपर्डी घटनेतील आरोपींना शिक्षा, आरक्षण यासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाज लाखोंच्या संख्येने बुधवारी बीदरच्या रस्त्यावर उतरला़ अत्यंत शिस्तीत आंदोलनकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करुन मागण्या मान्य करण्याची विनंती करण्यात आली़.
कोपर्डीतील आरोपींना कठोर शिक्षा करावी, कर्नाटकात असलेल्या ८ टक्के मराठा समाजाचा राज्य मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशी प्रमाणे ३ बी ऐवजी २ ए प्रवर्गात समावेश करावा, तेलगू भाषेप्रमाणे मराठी भाषेला अल्पसंख्याक भाषेचा दर्जा द्यावा, दावनगेरे जिल्ह्यातील होदेगेरे येथे असलेल्या शहाजीराजे भोसले यांच्या समाधी स्थळाचा विकास करून राष्ट्रीय स्मारक व तीर्थस्थळ म्हणून घोषित करावे, राजर्षी शाहू महाराज मराठा आर्थिक विकास महामंडळाची स्थापना व्हावी, उच्च न्यायालय, कर्नाटक लोकसेवा आयोग व अन्य स्वायत्त महामंडळावर मराठा समाजाला प्रतिनिधीत्व द्यावे, छ.शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी शासकीय सुट्टी जाहीर करावी, जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी मराठा विद्यार्थी वसतिगृह उभारावे, डॉ.स्वामीनाथन आयोगाचा अहवाल स्विकारून शेतीमालास उत्पादन खर्चावर आधारित हमी बाजारभाव द्यावा, ओला दुष्काळ जाहीर करुन नुकसान भरपाई देऊन कर्ज माफ करावे या मागण्या मोर्चेकऱ्यांनी मांडल्या़ दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास बीदरमधील पापनाश गेट येथून सुरु झालेला मोर्चा बसस्थानक, मडीवाळ चौक, जनरल करिअप्पा चौक, आंबेडकर चौक, शहीद भगतसिंह चौक, बसवेश्वर चौक, शिवाजी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला़ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभारलेल्या मंचावरुन मराठा समाजातील युवतींनी मागण्यांचे वाचन मराठी व कन्नडमध्ये केले. त्यानंतर अपर जिल्हाधिकारी व्यंकट राजू यांनी मंचावर येवून मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्विकारले़ हे निवेदन त्यांच्यामार्फत मुख्यंमत्र्यांना पाठविण्यात आले.

यांनी केले वाचन
जिल्हाधिकाऱ्यांद्वारे मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनाचे वाचन राजश्री पाटील, जिजाऊ बिरादार, अंजली बिरादार, वैष्णवी पाटील, निकिता वाडीकर, पद्मा पवार, कल्लेश्वरी कारभारी, पल्लवी पाटील, अदिती पाटील, संध्याराणी रावणगावे, वैष्णवी हंगरगे या युवतींनी केले़ त्यांच्याच हस्ते निवेदन प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले.

५ हजार स्वयंसेवक
बीदर येथे निघालेल्या मोर्चात जिल्हाभरातील मराठा समाजासह कर्नाटकातील गुलबर्गा, बेळगाव, कारवा, निपाणी तसेच महाराष्ट्रातील लातूर, नांदेड, उस्मानाबाद, कोल्हापूर व अन्य जिल्ह्यातील मराठा समाजही सहभागी झाला होता़ मोर्चा शिस्तीत पार पाडण्यासाठी ५ हजार स्वयंसेवकांची फळी कार्यरत होती़.

खासदार, आमदारही मोर्चात.
मराठा समाजाने मोर्चाद्वारे मांडलेल्या मागण्या रास्त असून, त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवीत बीदरचे खासदार भगवंत खुब्बा, औरादा बाऱ्हाळीचे आमदार प्रभू चव्हाण, आमदार विजयसिंग यांनीही मोर्चात सहभाग नोंदविला.

Web Title: VIDEO: Maratha Kranti silence marcha in Bidar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.