VIDEO : आमदार खोपडेंचा पोलिसांसोबत वाद, व्हिडिओ व्हायरल
By Admin | Published: February 22, 2017 02:18 AM2017-02-22T02:18:39+5:302017-02-22T07:47:27+5:30
ऑनलाइन लोकमत नागपूर, दि. 22 - पूर्व नागपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार कृष्णा खोपडे यांचा पोलिसांसोबत झालेल्या वादाचा ...
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 22 - पूर्व नागपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार कृष्णा खोपडे यांचा पोलिसांसोबत झालेल्या वादाचा कथित व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात सावधगिरीची भूमिका घेतली असून, या प्रकरणाची कागदोपत्री नोंद करतानाच त्या व्हिडीओ क्लीपची चौकशी सुरू केली आहे.
लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सतरंजीपुरा आहे. प्रभाग २१ मधील तेलीपुरा मतदान केंद्राजवळ आज दुपारी काही जण गोंधळ घालत होते. परिस्थिती बिघडू नये म्हणून पोलिसांनी त्यांना हुसकावून लावले. तेवढयात तेथे अॅक्टीव्हावरून आ. कृष्णा खोपडे आले. त्यांनी तेथे बंदोबस्तावर असलेल्या महिला पोलीस कर्मचा-यांना विचारणा केली. त्यांनतर पोलिसांसोबत आ. खोपडेंचा वाद झाल्याचे या व्हिडीओ क्लिपमध्ये दिसून येते. हा वाद सुरू असतानाच लकडगंजचे ठाणेदार सत्यवान माने तेथे आले. त्यानंतर प्रकरण निवळले. आ. खोपडे आपल्या कार्यकर्त्यांसह निघून गेले. मात्र, नंतर या वादाची कथित व्हिडीओ क्लीप व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पातळीवर या प्रकरणाची माहिती दिल्यानंतर पोलीस दल आणि राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधान आले. पोलिसांनी कारवाईला सुरूवात केल्याचीही सर्वत्र चर्चा होती. दरम्यान, या प्रकरणात काय कारवाई झाली, ते जाणून घेण्यासाठी परिमंडळ - ३ चे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी व्हिडीओ क्ललीपची चौकशी केली जात असल्याचे लोकमतला सांगितले.v