VIDEO- लोणार तालुक्यात राज्यात एकमेव झिंग्याची मायक्रो प्रजाती
By admin | Published: September 7, 2016 06:38 PM2016-09-07T18:38:53+5:302016-09-07T18:40:54+5:30
महाराष्ट्रात प्रथमच लोणार तालुक्यातील टिटवी या आदिवासी बहुल भागातील भगवान कोकाटे यांनी मत्स्यपालन करण्यासाठी आणला आहे.
ऑनलाइन लोकमत
लोणार (बुलडाणा), दि. 7 - मायक्रो ब्रेकियम रोजनबर्गाई हा झिंगा बीज प्रकार महाराष्ट्रात प्रथमच लोणार तालुक्यातील टिटवी या आदिवासीबहुल भागातील भगवान कोकाटे यांनी मत्स्यपालन करण्यासाठी आणला आहे. या नवीन प्रजातीच्या झिंग्याविषयी
जाणून घेण्यासाठी जिल्हाभरातील मत्स्यपालन करणाऱ्या व्यावसायिकांनी ६ सप्टेंबर रोजी टिटवी येथे भेटी दिल्या.
आदिवासी बहुल भागातील भगवान कोकाटे यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून मत्स्यपालन व्यवसाय सुरु केला. सुरुवातीला याविषयी ज्ञान कमी असल्याने त्यांना नुकसान सोसावे लागले. पण चिकाटी आणि शिकण्याची जिद्द घेऊन त्यांनी विविध ठिकाणी जाऊन मत्स्यपालन विषयी माहिती गोळा करुन मेहनतीने शेती व्यवसायासोबत मत्स्यपालन व्यवसायात झोकून दिले.
नवनवीन प्रयोग करुन व्यवसायात वाढ केली. मायक्रो ब्रेकियम रोजनबर्गाई या झिंगा प्रजातीविषयी त्यांना माहिती मिळताच त्यांनी केरळ गाठले. तेथे जाऊन मायक्रो ब्रेकियम झिंगा प्रजातीच्या मत्स्य व्यवसायाविषयी सखोल प्रशिक्षण घेऊन जवळपास दोन लाख बिज मत्स्यपालन करण्यासाठी घेऊन आले. याविषयी माहिती मिळताच जिल्हाभरातील अनेक मत्स्य व्यावसायिकांनी मंगळवारला सकाळपासूनच टिटवी येथे मायक्रो झिंगा मत्स्य बिज प्रकल्पाला भेटी देण्यास सुरुवात केली आहे.
मत्स्यपालन व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळते. या व्यवसायाला शेतीचा दर्जा दिल्यास अनेक शेतकरीही या व्यवसायाला जोडधंदा म्हणून करतील. यामुळे शेतकऱ्यांचे जिवनमान नक्कीच उंचावेल.
भगवान कोकाटे
मत्स्यपालन व्यावसायिक