व्हिडिओ - मुंबई - पुणे हायवे बनतोय मृत्यूचा सापळा

By admin | Published: June 6, 2016 05:40 PM2016-06-06T17:40:13+5:302016-06-06T17:41:38+5:30

मुंबई - पुणे एक्स्प्रेसवेवर रविवारी झालेल्या भीषण अपघातामुळे मुंबई - पुणे एक्स्प्रेस हायवेवरील सुरक्षित प्रवासाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आला आ

Video - Mumbai - Pune Highway becomes the trap of death | व्हिडिओ - मुंबई - पुणे हायवे बनतोय मृत्यूचा सापळा

व्हिडिओ - मुंबई - पुणे हायवे बनतोय मृत्यूचा सापळा

Next
>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 06 - मुंबई - पुणे एक्स्प्रेसवेवर रविवारी झालेल्या लक्झरी बसच्या अपघातात 17 जणांनी आपला जीव गमावला. या भीषण अपघातामुळे मुंबई - पुणे एक्स्प्रेस हायवेवरील सुरक्षित प्रवासाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. गेल्या सहा महिन्यांत या महामार्गावर तब्बल 130 अपघात झाले असून, त्यात 70 जणांचे बळी गेले आहेत, तर जवळपास 250 जण जखमी झाले आहेत. अपघातांचा आकडा पाहता मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे मृत्यूचा सापळा ठरत आहे. 
 
रविवारी पनवेल जवळील शिवकर गावाजवळ लक्झरी बस, इनोव्हा आणि स्वीफ्ट कार यांच्यात हा  भीषण अपघात झाला. या अपघातात 17 जण ठार झाले असून, 28 जण जखमी झाले आहेत. 
 
(व्हिडीओ - मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, १७ ठार, २५ जखमी)
 
मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या शहरांतील अंतर कमी करण्याच्या दृष्टीने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तयार करण्यात आला. 2002 मध्ये 94.5 किमी लांबीच्या या महामार्गाचे काम पूर्ण झाले. त्यामुळे मुंबई ते पुणे हा 148 किमी लांबीचा प्रवास 4-5तासांवरून थेट दोन तासांवर आला. याचा परिणाम म्हणून मागील चौदा वर्षांत या महामार्गावरील वाहतूक वाढली. सुसाट व अतिवेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे अपघातांची संख्याही वाढली. विशेष म्हणजे पहिल्या दहा वर्षांत म्हणजे 2002 ते 2012 या कालावधीत या महामार्गावर लहान-मोठे तब्बल 1758 अपघात घडले होते. दिवसाआड होणाऱ्या अपघातांमुळे हा महामार्ग असुरक्षित बनला आहे. याचा परिणाम म्हणून गेल्या सहा महिन्यांत या महामार्गावरील अपघातांची संख्या सत्तरच्या घरात गेली आहे, तर जवळपास अडीचशे जण कायमचे जायबंदी झाले आहेत.
(सहा महिन्यांत ७0 बळी)
 
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातांतील मृत्यूंची संख्या कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी), महिंद्रा आणि महिंद्रा लि. तसेच सेव्ह लाइफ फाउंडेशन यांच्यात फेब्रुवारी 2016 मध्ये सामंजस्य करार झाला होता. एकत्रित सहकार्यातून पुढील तीन-चार वर्षांत महामार्गावरील अपघातांत मृतांची संख्या शून्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. परंतु सहा महिन्यांत या महामार्गावरील अपघातांची संख्या पाहता हे प्रयत्न निष्फळ ठरल्याचे दिसून आले आहे.
 

Web Title: Video - Mumbai - Pune Highway becomes the trap of death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.