VIDEO - मुस्लीम उभारतात ताबूत; हिंदू होतात खांदेकरी

By Admin | Published: October 12, 2016 05:20 PM2016-10-12T17:20:01+5:302016-10-12T20:20:53+5:30

सुमारे चारशे वर्ष जुनी पारंपरिक प्रथा नाशिकमधील हजरत सय्यद इमामशहा बाबा यांच्या दर्ग्याच्या परिसरात मोहरम काळात आजही पाळली जाते. या प्रथेतून हिंदू-मुस्लीम

VIDEO - Muslims constitute coffin; Hindus become Khandekri | VIDEO - मुस्लीम उभारतात ताबूत; हिंदू होतात खांदेकरी

VIDEO - मुस्लीम उभारतात ताबूत; हिंदू होतात खांदेकरी

googlenewsNext

- अझहर शेख/ आॅनलाइन लोकमत
नाशिक, दि.12 - सुमारे चारशे वर्ष जुनी पारंपरिक प्रथा नाशिकमधील हजरत सय्यद इमामशहा बाबा यांच्या दर्ग्याच्या परिसरात मोहरम काळात आजही पाळली जाते. या प्रथेतून हिंदू-मुस्लीम ऐक्य आज सायंकाळी पहावयास मिळणार आहे. पंधरा दिवसांचे अथक परिश्रम घेऊन मुस्लीम सय्यद कुटुंबियांनी अळीवच्या बियांपासून मानाचा ताबूत उभारला असून या ताबुताचे खांदेकरीची भूमिका ‘आशुरा’च्या निमित्ताने आज सायंकाळी आदिवासी हिंदू कोळी बांधव पार पाडणार आहे. या पारंपरिक प्रथेतून दरवर्षी नाशिकमध्ये मोहरम काळात राष्ट्रीय एकात्मता व जातीय सलोखा पहावयास मिळतो.
नाशिक शहराच्या गावठाण परिसरात सारडा सर्कल भागात हजरत सय्यद इमामशहा बाबा यांचा दर्गा आहे. मुहर्रमच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच ‘आशुरा’ला या ठिकाणी यात्रा भरते. आज बुधवारी (दि.१२) सकाळपासून यात्रोत्सवाची उत्साह या भागात पहावयास मिळत होता. संध्याकाळी येथील मानाचा अळीवचा ताबूत अर्थात ‘हालौ का ताजीया’ भाविकांच्या दर्शनासाठी दर्ग्याच्या मैदानात आणण्यात येणार आहे. हा ताबूत हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक आहे. कारण मुस्लीम बांधव पंधरा दिवस परिश्रम घेऊन बांबुच्या कामट्या, कापूस, अळीवच्या बियांपासून ताबुतची निर्मिती करतात. या ताबुतचे वैशिष्ट म्हणजे अखेरच्या दिवशी ‘आशुरा’ला पुर्णपणे ताबुत हिरवळीने नटलेला पहावयास मिळतो.वर्षानुवर्षे जुनी असलेली परंपरा आजही तितक्याच उत्साहाने पाळली जाते. दोन दिवसांपासून दर्ग्याच्या परिसरात स्थापन करण्यात आलेला ताबुत दर्शनासाठी खुला करण्यात आला आहे. महिलावर्गांची या ठिकाणी संध्याकाळी दर्शनासाठी व नवस करण्यासाठी गर्दी होते. या ताबुतावरील सजावट आकर्षक असते. या ताबुताचे आगळेपण व या परंपरेचे वैशिष्ट म्हणजे हिंदू-मुस्लीम बांधवांचा एकत्रित सहभाग.

संध्याकाळी दिसणार हिंदू-मुस्लीम ऐक्य
बुधवारी (दि.१२) संध्याकाळी सारडा सर्कलवरील हजरत सय्यद इमामशहा बाबा यांच्या दर्ग्याच्या परिसरात सकाळपासून यात्रा भरली आहे. अळीवच्या हिरवळीचा तयार केलेला मानाचा ताबूत दर्ग्याच्या परिसरात दर्शनासाठी आदिवासी कोळी बांधव खांद्यावर घेऊन संध्याकाळी यात्रोत्सवामध्ये उभे राहणार आहे. अळीवच्या हिरवळीपासून तयार करण्यात आलेला ताबूत जातीय सलोख्याचे प्रतीक आहे. येथील कलीम सय्यद यांचे कुटुंबीयांनी पंधरा दिवस परिश्रम घेऊन ताबूत उभारला असून, पारंपरिक प्रथेप्रमारे आज ‘आशुरा’च्या संध्येला हिंदू कोळी बांधव ताबूतच्या खांदेकरीची भूमिका पार पाडणार आहे. यावेळी दर्गा परिसरात हिंदू-मुस्लीम बांधवांचे ऐक्य सालाबादप्रमाणे यावर्षीही पहावयास मिळणार आहे. ताबुताची ही परंपरा सुमारे साडेतीनशे वर्षाहूनही अधिक जुनी असल्याचे सय्यद सांगतात. त्यांची सहाव्या पिढीकडून सध्या ही परंपरा जोपासली जात आहे.

किमान सहा तास ताबूत खांद्यावर
सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास यात्रेमध्ये मानाचा अळीवचा ताबूत आणला जाणार आहे. यावेळी आदिवासी कोळी बांधव या ताबुताचे खांदेकरीची भुमिका पार पाडतील. रात्री बारा वाजेपर्यंत ताबूत खांद्यावर घेऊन उभे राहण्याची प्रथा आदिवासी कोळी बांधवांकडून तितक्याच श्रध्देने पाळली जाते. या ताबुताचे विसर्जन पाण्यात केले जात नाही तर दग्याच्या पाठीमागे खड्डा खोदून त्यामध्ये ताबूत दफन केला जातो. या ताबुतापुढे केलेले नवस पुर्ण होतात अशी हिंदू-मुस्लीम बांधवांची धारणा आहे. सुमारे आठ ते दहा आदिवासी तरुण खांदेकरी म्हणून अदलाबदल करत ताबुताला खांदा देतात.

 

Web Title: VIDEO - Muslims constitute coffin; Hindus become Khandekri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.