VIDEO : नाशिक - कुचीपुडी, कथक नृत्याच्या जुगलबंदीला रसिकांची दाद

By Admin | Published: August 23, 2016 03:50 PM2016-08-23T15:50:31+5:302016-08-23T16:25:45+5:30

पारंपरिक कुचीपुडी नृत्य, श्रावणी सोमवारनिमित्त रसिकांसाठी नृत्यातून सादर केलेली त्र्यंबक स्तुती, हे सर्व पहायला मिळाले कीर्ती कलामंदिरातर्फे अायोजित ‘नायक’ कार्यक्रमात

VIDEO: Nasik - Kuchipudi, Kathak Dances of Jugalbandi Rashika | VIDEO : नाशिक - कुचीपुडी, कथक नृत्याच्या जुगलबंदीला रसिकांची दाद

VIDEO : नाशिक - कुचीपुडी, कथक नृत्याच्या जुगलबंदीला रसिकांची दाद

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. २३ -  पारंपरिक कुचीपुडी नृत्याचे सादरीकरण, खास श्रावणी सोमवारनिमित्त रसिकांसाठी नृत्यातून सादर केलेली त्र्यंबक स्तुती, शिव तरंग नृत्याने जिंकलेली रसिकांची मने हे चित्र पहायला मिळाले कीर्ती कलामंदिरातर्फे अयोजित ‘नायक’ या कार्यक्रमात. सोमवारी (दि. २२) महाकवी कालिदास कलामंदिर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

२३व्या पंडित गोपीकृष्ण महोत्सवानिमित्त कीर्ती कलामंदिरातर्फे नायक या संकल्पनेवर आधारित या तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, सोमवारी या नृत्य महोत्सवाचे उद्घाटन बंगळुरू येथील कुचीपुडी नृत्यकलाकार डॉ. वसंत किरण यांच्या नृत्याने झाली. यावेळी डॉ. किरण यांनी पारंपरिक कुचीपुडी नृत्य सादर करतानाच विविध रागांच्या मालिका सादर केल्या. शिव तरंग या प्रकारात सादर केलेल्या नृत्याविष्काराला नाशिककर रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

या नृत्यसादरीकरणादरम्यान डॉ. वसंत किरण यांनी ग. दि माडगूळकरांनी रचलेल्या गीतरामायणातील ‘एकच वर द्यावा प्रभू’ या पदावर केलेल्या नृत्यातून प्रभू रामचंद्र, हनुमान आणि शबरी यांच्यातील प्रसंग आपल्या नृत्यातून अत्यंत खुबीने सादर करत रसिकांची दाद मिळवली. या नृत्यानंतर वसंत किरण यांनी आड फो दले आणि तिल्लाना या नृत्यप्रकाराचे सादरीकरण केले. यावेळी डॉ. वसंत किरण यांना रम्या सुरज (पढंत), विद्वानकुमार कृष्णन (बासरी) आणि रामदान यांनी साथसंगत केली.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात बनारस येथील कथक नृत्य कलाकार गौरव मिश्रा आणि सौरव मिश्रा या जुळ्या कलाकारांनी कथक नृत्यातील जुगलबंदी पेश केली. सुरवातीला मिश्रा बंधूंनी भटियार मिश्र रागातील शिव वंदना सादर केली. पारंपरिक कथक नृत्यात उथान, तोडा, परण, शक्करदार, लडी आदिंचे सादरीकरण केले. उत्तरोत्तर कथक नृत्याची जुगलबंदी रंगलेली असताना यानंतर मिश्रा बंधूंनी सहा मात्रातील तीन ताल, साडेसहा मात्रातील पारंपरिक कालिताल आणि त्यानंतर ‘दिमीक दिमीक डमरू कर बाजे’ हे अनंत ताडव नृत्य सादर केले. यावेळी गौरव मिश्रा आणि सौरव मिश्रा यांना विवेक मिश्रा (तबला), पं. सोमनाथ मिश्रा (गायन आणि हार्मोनिअम) आणि पं. रविशंकर मिश्रा (तबला आणि पढंत) यांनी साथ संगत केली.

दरम्यान, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदिवासी प्रकल्प विकास अधिकारी मंजूलक्ष्मी, रेखा नाडगौडा आणि आदिती नाडगौडा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि नटराज पूजन करण्यात आले. तसेच जयराम पांचाळ आणि आर्किटेक्ट अपेक्षा कुटे यांच्या हस्ते कलाकारांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली बालाजीवाले यांनी केले.

 

Web Title: VIDEO: Nasik - Kuchipudi, Kathak Dances of Jugalbandi Rashika

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.