VIDEO : आदिरंग महोत्सवासाठी नाशिक सज्ज

By admin | Published: July 29, 2016 02:15 PM2016-07-29T14:15:08+5:302016-07-29T14:27:14+5:30

देशभरातील आदिवासींच्या नृत्य, नाट्य, संगीत, हस्तकलेचा जागर करणाऱ्या आदिरंग महोत्सवासाठी नाशिक सज्ज झाले आहे

VIDEO: Nasik ready for the Adirang Mahotsav | VIDEO : आदिरंग महोत्सवासाठी नाशिक सज्ज

VIDEO : आदिरंग महोत्सवासाठी नाशिक सज्ज

Next

राष्ट्रीय जागर : आदिवासी नृत्य, नाट्य, संगीताची तीन दिवस पर्वणी; हस्तकलांनाही व्यासपीठ

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. २९ -  देशभरातील आदिवासींच्या नृत्य, नाट्य, संगीत, हस्तकलेचा जागर करणाऱ्या आदिरंग महोत्सवासाठी नाशिक सज्ज झाले आहे. आजपासून (दि. २९) तीन दिवस नाशिकमध्ये हा राष्ट्रीय स्तरावरील महोत्सव रंगणार असून, यानिमित्त सोळा राज्यांतील चारशेहून अधिक कलावंतांचा कलाविष्कार पाहण्याची पर्वणी नाशिककरांना लाभणार आहे.
राष्ट्रीय नाट्य विद्यालय (एनएसडी) नवी दिल्ली आणि नाशिक महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने २९ ते ३१ जुलै या कालावधीत भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने दऱ्याखोऱ्यांतील आदिवासी बांधवांचा कलाविष्कार एकाच रंगमंचावर अनुभवण्याची संधी नाशिककरांना विनामूल्य उपलब्ध होणार आहे. नाशकात पहिल्यांदाच होणाऱ्या या महोत्सवात देशभरातील १६ राज्यांमधील ४०४ आदिवासी कलावंत सहभागी होऊन कलाविष्कार सादर करणार आहेत. त्यांत आंध्र प्रदेश, केरळ, झारखंड, ओरिसा, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, गोवा, त्रिपुरा, मणिपूर आदि राज्यांतील आदिवासी कलावंतांचा समावेश आहे. महोत्सवात ‘निसर्ग आणि आदिवासी संगीत, नृत्य व नाट्य यांचा आंतरसंबंध’ या विषयावर दोन दिवस परिसंवादाचेही आयोजन करण्यात आले आहे. याचबरोबर आदिवासींनी हस्तकलेद्वारे तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे. सदर प्रदर्शन तिन्ही दिवस सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत खुले राहणार असून, त्यात विविध कलाकुसरीच्या वस्तू उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तीनही दिवस चालणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवात आदिवासी कला व कलाप्रकारांचा परिचय करून दिला जाणार असल्याची माहिती एनएसडीचे संचालक वामन केंद्रे यांनी दिली.
दरम्यान, गुरुवारी दिवसभर या महोत्सवाची तयारी युद्धपातळीवर सुरू होती. दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या आवारात आदिवासींनी तयार केलेल्या हस्तकलेच्या वस्तूंच्या विक्रीचे सुमारे २५ स्टॉल्स लावले जाणार आहेत. खास आदिवासी पाड्यांवर दिसणाऱ्या झोपड्यांचा लूक या स्टॉल्सना देण्यात येणार आहे. हे स्टॉल्स उभारण्याचे काम सुरू होते. महोत्सवासाठी सर्व ४०४ कलावंत नाशकात दाखल झाले असून, त्यांची रंगीत तालीम दिवसभर सुरू होती.

आज होणार उद्घाटन..
या महोत्सवाचे आज सायंकाळी ७ वाजता प्रख्यात अभिनेत्री हिमानी शिवपुरी, ‘एनएसडी’चे संचालक वामन केंद्रे, महापौर अशोक मुर्तडक यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.

Web Title: VIDEO: Nasik ready for the Adirang Mahotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.