VIDEO : नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कांदा फेको आंदोलन
By admin | Published: August 24, 2016 01:06 PM2016-08-24T13:06:41+5:302016-08-24T13:19:48+5:30
कळवण येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीवर बुधवारी सकाळी कांदा फेको आंदोलन करण्यात आले.
Next
ऑनलाइन लोकमत
कळवण (नाशिक), दि. २४ - शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल भावाने विकला जात असून उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने कळवण तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सरकारने यात तातडीने हस्तक्षेप करून कांद्याला हमीभाव जाहीर करावा या मागणीसाठी कळवण येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीवर आज बुधवारी दि. २४ ऑगस्ट रोजी सकाळी 11 .30 वाजता कांदा फेको आंदोलन करण्यात आले.
केंद्रातील भाजप सरकारने सर्वसामान्य जनतेला व शेतकऱ्यांना भूलथापा देऊन सत्ता काबीज केली आहे. मात्र शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नसल्याने कवडीमोल भावाने कांदा विकला जात असून भाजपचे सरकार शेतकरी विरोधी असल्याने भाजपच्या खासदार, आमदार यांना तालुक्यात फिरु न देण्याचा इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रवीण रौंदळ यांनी दिला.
कांद्याचे भाव वाढल्यावर भाव खाली येऊन स्थिर रहावे यासाठी सरकारतर्फे हस्तक्षेप केला जातो. त्याच प्रमाणे आज रोजी कांद्याचे भाव अत्यंत कमी झाले आहेत. शेतकऱ्यांचे उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने शेतकरी प्रचंड हतबल झाला असून आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. दि. 1 जानेवारी 2016 पासून नाशिक जिल्ह्यातील सुमारे 63 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने बाजार हस्तक्षेप योजना राबवून कांद्याला हमीभाव जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण हिरे यांनी यावेळी केली. यापूर्वी देखील या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुक्यात रास्ता रोको व अन्य आंदोलने करण्यात आली. परंतु सरकारला जाग येत नसून शेतकऱ्यांची कीव सुद्धा येत नसल्याने सरकार कांद्याबाबत काहीही निर्णय घेत नाही असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला आहे.