VIDEO : लातूरच्या कीर्ती आॅईल मिलमध्ये नऊ कामगारांचा मृत्यू

By Admin | Published: January 31, 2017 01:07 AM2017-01-31T01:07:03+5:302017-01-31T01:52:03+5:30

ऑनलाइन लोकमत   लातूर, दि. 31 -  येथील १२ नंबर पाटीजवळ असलेल्या कीर्ती आॅईलमिलमध्ये  वेस्टेज सेटलमेंट टँकमध्ये स्वच्छता करण्यासाठी ...

VIDEO: Nine workers die in Latur's fame and mill mill | VIDEO : लातूरच्या कीर्ती आॅईल मिलमध्ये नऊ कामगारांचा मृत्यू

VIDEO : लातूरच्या कीर्ती आॅईल मिलमध्ये नऊ कामगारांचा मृत्यू

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
 
लातूर, दि. 31 -  येथील १२ नंबर पाटीजवळ असलेल्या कीर्ती आॅईलमिलमध्ये  वेस्टेज सेटलमेंट टँकमध्ये स्वच्छता करण्यासाठी उतरलेल्या नऊ कामगारांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.   तर निलेश पंढरीनाथ शिंदे (वय २३, रा. सध्या १ नंबर चौक, तर मुळ दापका ता. औराद बा-हाळी) या एका जखमीवर लातूरच्या विवेकानंद रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  मात्र मृतांचा आकडा अधिकृतपणे रात्री १ वाजेपर्यंत घोषित करण्यात आला नव्हता. परंतु, एक वाजता नरेंद्र टेकाळे (साखरा, ता.जि. लातूर), दगडू शामराव पवार, बळीराम शामराव पवार (दोघे रा. नागझरी, ता. जि. लातूर), रामेश्वर दिगंबर शिंदे (बोधेगाव, परळी वैजनाथ बीड),  राम नागनाथ येरमे (रा. हरंगुळ, ता. जि. लातूर), शिवाजी आतकरे, मारुती गायकवाड, आकाश भुसे, परमेश्वर अरुण बिराजदार अशा नऊ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. बाकीच्यांचा शोध चालू होता. 
कामगार कल्याण मंत्र्यांच्या जिल्ह्यातीलच औद्योगिक वसाहतीत घडलेल्या या मृत्यूच्या तांडवाने उद्योग नगरी हादरली आहे. साडेदहा वाजता मृतदेह बाहेर काढण्याची मोहीम सुरू झाली. मात्र रात्री १२.३० वाजेपर्यंत चार मृतदेह बाहेर आले. तर अन्य टँकमध्येच अडकून होते. रात्री घटनास्थळी भेट दिलेल्या कामगार कल्याण मंत्र्यांना नातेवाईकांनी घेराव घालून ‘असे किती बळी जाणार?’ असा सवाल केला. याची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, या आश्वासनानंतरच लोकांनी त्यांची सुटका केली. 
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लातुरातील प्रसिद्ध कीर्ती आॅईल मिलचे १२ नंबर पाटी येथे युनिट आहे. या मिलमधील वेस्टेज सेटलमेंट टँकची दर महिना-दीड महिन्यातून बाहेरच्या कामगारांकडून एकदा स्वच्छता करण्यात येते.  याचे कंत्राट यावेळी हरंगुळ येथील एका ठेकेदाराला दिले होते. सोमवारी सायंकाळी त्या ठेकेदारासह तीन कामगार या टँकच्या स्वच्छतेसाठी मिलमध्ये आले. सुरुवातीला ते तीन कामगार स्वच्छतेसाठी टँकमध्ये उतरले. 
ठेकेदार थोड्यावेळाने परत आला. तर त्याला एकही कामगार दिसला नाही. त्यामुळे तो टाकीत उतरला, तर तोही टाकीत पडला. ही घटना कंपनीच्या कामगारांनी पाहिली आणि त्याला वाचवायला म्हणून अन्य तिघे टँकमध्ये उतरले. ते सुद्धा बुडाले. दरम्यान, आत बुडालेल्या कामगारांचे काय झाले? हे पाहण्यासाठी कंपनीचे कामगार निलेश शिंदे यांच्या कमरेला दोर बांधून आत सोडले. त्यांनी श्वास घेता येत नाही, ही तक्रार केल्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आली. त्यांची शुद्ध हरपल्याने त्यांना तातडीने लातूरच्या विवेकानंद रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाकीचे अन्य कामगार मात्र त्या टँकमध्येच अडकले. 
जखमी निलेश शिंदे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, सोमवारी दुपारी ३ वाजता मी कामावर हजर झालो. मिलमध्ये बॉयलर आॅपरेटर म्हणून काम करीत असून, दुपारी टँक स्वच्छतेसाठी काही कामगारांच्या पोटाला दोरी बांधून सोडण्यात आले होते. त्यातील एकाला मी वर काढले. दुस-याला काढण्यासाठी दोरीचा हुक सोडला होता. मात्र त्याचवेळी मी चक्कर येऊन पडलो.
 
रात्री एक वाजता पाच मृतदेह बाहेर; उर्वरित टँकमध्ये
रात्री बारा वाजेपर्यंत मृतदेह बाहेर काढण्याचे काम चालू होते. साडेबारा वाजता तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले. साडेदहा वाजता टँक खालून फोडण्याला प्रारंभ झाला होता. २५ फूट उंच आणि २५ फूट लांब असलेल्या या वेस्टेज सेटलमेंट टँकच्या तळाला चोहोबाजूंनी छोटे-मोठे होल करून टँकमधील विषारी वायू, गाळ बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू होती. तीन-चारवेळा टँकमध्ये पाणी सोडून त्यातील विषारी वायू व गाळ कमी करण्याची प्रक्रिया सुरू होती. व्यक्ती गुदमरणार नाही, अशी स्थिती टँकमध्ये झाल्यानंतरच मृतदेह बाहेर काढणार, अशी भूमिका मिल व्यवस्थापनाने घेतली. त्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यास विलंब होत होता. 
 
मयतांत दोन सख्खे भाऊ...
साडेबारा वाजता बाहेर काढण्यात आलेल्या मृतांमध्ये नागझरी येथील शामराव पवार यांची दगडू व बळीराम अशी दोन सख्खी भावंडे मृत झाल्याचे पुढे आले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तर एक परळी वैजनाथ तालुक्यातील बोधेगावचा आहे.
 
नातेवाईकांचा कामगार कल्याण मंत्र्यांना घेराव...
घटनेची माहिती मिळताच आमदार अमित देशमुख, आ. त्रिंबक भिसे यांनी घटनास्थळी भेट दिली. याशिवाय, कामगार कल्याण मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनीही कीर्ती आॅईल मिल गाठले. यावेळी मयत कामगारांच्या नातेवाईकांनी कामगार कल्याण मंत्र्यांना घेराव घालून ठोस कारवाईची मागणी केली. पंधरा मिनिटे नातेवाईकांच्या गराड्यात कामगार कल्याण मंत्री अडकून पडले होते. अखेर याबाबत सखोल चौकशी करण्यात येईल व दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन देऊन त्यांनी स्वत:ची सुटका करवून घेतली. खा. सुनील गायकवाड यांनीही जिल्हाधिका-यांना फोन करून लक्ष घालण्याच्या सूचना केल्या.
 
काय आहे वेस्टेज सेटलमेंट टँक...
कीर्ती आॅईल मिलमध्ये असलेल्या वेस्टेज सेटलमेंट टँक हा २५ फूट लांब व २५ फूट उंच असणारा मोठा हौद आहे. या हौदामध्ये कंपनीतून बाहेर पडणारा सर्व गाळ, अशुद्ध पाणी साठवून ठेवले जाते. दर दीड ते दोन महिन्याला बाहेरच्या कंत्राटी कामगारामार्फत ते स्वच्छ करण्यात येते. सोमवारी त्यासाठीच एका ठेकेदारासह तीन कंत्राटी कामगार मिलमध्ये दाखल झाले होते.
 
अफवांचे पेव फुटले...
लातूरच्या कीर्ती आॅईल मिलमधील टँकमध्ये झालेल्या या घटनेचे वृत्त  शहरात वा-यासारखे पसरले. या घटनेत कोणी १५ तर कोणी २० जणांचा मृत्यू झाल्याच्या अफवेचे पेव फुटले होते. कोणी शॉक लागून तर कोणी केमिकल टँकमध्ये अडकून तर कोणी विषारी वायूने कामगारांचा मृत्यू झाल्याचे सांगत होते. लातूरच्या उद्योजकांमध्ये मात्र अशा अफवांमुळे चिंतेचे वातावरण पसरले होते. अधिकृत माहिती असल्याशिवाय अशी माहिती पसरवू नये, अशी भूमिका पोलीस अधीक्षकांशी बोलताना उद्योजकांनी मांडली. 
 
अधिकृतपणे सर्वकाही सांगितले जाईल : भुतडा
या दुर्घटनेनंतर माध्यमातून कीर्ती आॅईल मिलचे संचालक कीर्ती भुतडा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी भ्रमणध्वनी उचलला नाही. दुसरे संचालक अशोक भुतडा यांनी घटनास्थळी व्यस्त आहोत. आधी घटनास्थळीच्या उपाययोजना महत्त्वाच्या असून, त्या चालू आहेत. अधिकृतपणे नंतर सर्व काही सांगितले जाईल, असे माध्यमांशी बोलताना सांगितले.
 
विवेकानंद रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी...
दरम्यान, ही घटना घडल्याची माहिती मिळताच कीर्ती आॅईल मिलमध्ये काम करणा-या कामगारांच्या नातेवाईकांनी थेट शहरातील विवेकानंद रुग्णालयाकडे धाव घेतली. त्यामुळे रुग्णालय परिसरात एकच गर्दी झाली होती. प्रत्येक नातेवाईक आपल्या मुलासंदर्भात चौकशी करीत होते. दरम्यान, रुग्णालयातील कर्मचा-यांकडून केवळ एकजणच येथे दाखल झाला असल्याचे सांगितले जात होते.
 
कीर्ती आॅईल मिलसमोर हजारोंचा जमाव...
या घटनेची माहिती मिळताच कीर्ती आॅईल मिलसमोर शहरातील व परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेतली. त्यामुळे हजारोंचा जमाव जमला होता. तीनशे ते चारशे नागरिक आॅईल मिलमध्ये तर पाचशेपेक्षा जास्त नागरिकांचा जमाव मिलच्या बाहेर जमला होता. त्यामुळे पोलिसांच्या हस्तक्षेपाने गेट बंद करण्यात आले. घटनास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजीराव राठोड हे दाखल होऊन पोलिस कर्मचा-यांना सूचना करीत होते.      
 
                   

https://www.dailymotion.com/video/x844q6y

Web Title: VIDEO: Nine workers die in Latur's fame and mill mill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.