VIDEO: नायलॉन मांजाने केला गरुडाचा घात!
By Admin | Published: January 16, 2017 07:37 PM2017-01-16T19:37:21+5:302017-01-16T19:37:21+5:30
राम देशपांडे / ऑनलाइन लोकमत अकोला, दि. 16 - जिल्ह्यातील निंबी मालोकार येथे मांजामुळे जखमी अवस्थेत आढळलेल्या गरुड पक्ष्यावर ...
राम देशपांडे / ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 16 - जिल्ह्यातील निंबी मालोकार येथे मांजामुळे जखमी अवस्थेत आढळलेल्या गरुड पक्ष्यावर सोमवारी दुपारी कृषी विद्यापीठ परिसरातील स्नातकोत्तर पशुविज्ञान व पशुवैद्यकीय संस्थेत उपचार करण्यात आले; मात्र खोल जखम आणि अधिक रक्तस्राव झालेला असल्यामुळे उपचारादरम्यान त्याने प्राण सोडले.
आकाशात उंच भरारी घेण्यासाठी मानवाला सदोदित प्रेरित करणारा पक्षी म्हणजे गरुड. पक्ष्यांचा राजा समजला जाणारा हा पक्षी अत्यंत कठीण परिस्थितीसुद्धा जीवन जगण्याची क्षमता बाळगतो; मात्र दिवसेंदिवस त्यांची संख्या कमी होण्यास केवळ आणि केवळ मानवच कारणीभूत ठरत आहे. याचा प्रत्यय सोमवारी अकोलेकरांना आला. जिल्ह्यातील निंबी मालोकार या गावात नॉयलॉनच्या मांजामुळे जखमी झालेला चार फूट आकाराचा गरुड पक्षी, याच गावातील रहिवासी पर्यावरण मित्र प्रकाश राऊत यांना आढळून आला.
विद्युत खांबावरील तारेमध्ये गुतंलेल्या नॉयलॉनच्या मांजात तो लटकलेल्या अवस्थेत त्यांना आढळून आला. महत्प्रयासाने त्याची मुक्तता करून त्यांनी जखमी गरुडास येथील उप वनक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आणले. त्यानंतर त्यास कृषी विद्यापीठ परिसरातील स्नातकोत्तर पशुविज्ञान व पशुवैद्यकीय संस्थेत उपचारार्थ हलविण्यात आले. या ठिकाणी त्याच्यावर डॉ. एस. पी. वाघमारे, डॉ. एम. जी. थोरात, परिविक्षाधीन विद्यार्थी डॉ. सचिन कोकोडे, डॉ. वैजनाथ काळे व विष्णू दळवी यांनी उपचार केले; मात्र खोल जखम आणि अधिक रक्तस्राव झालेला असल्यामुळे उपचारादरम्यान तो गतप्राण झाला. यानंतर सर्पमित्र मुन्ना खान यांच्या सहकार्याने त्याचा अंत्यविधी करण्यात आला.
https://www.dailymotion.com/video/x844ohx