VIDEO - कुलभूषण जाधव यांना वाचवण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडू - राजनाथ सिंह
By Admin | Published: April 11, 2017 09:36 PM2017-04-11T21:36:23+5:302017-04-12T11:02:46+5:30
ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 11 - भारताचे माजी नौसेना अधिकारी कुलभूषण जाधव यांना वाचवण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडू असं आश्वासन ...
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - भारताचे माजी नौसेना अधिकारी कुलभूषण जाधव यांना वाचवण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडू असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलं आहे. कुलभूषण गुप्तहेर नसून भारताचा नागरिक आहे. त्यांची सुटका केलीच पाहिजे असं राजनाथ सिंह बोलले आहेत. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात बोलताना राजनाथ सिंह यांनी हे वक्तव्य केलं. आजतक वृत्तवाहिनीच्या वृत्तनिवेदिका अंजना ओम कश्यप यांनी राजनाथ सिंह यांची मुलाखत घेतली. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तान जाधव यांना भारताचा गुप्तहेर असल्याचं सांगत आहे. आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने समाजाला दिशा आणि प्रेरणा देण्याचा वसा घेतलेल्या सेवाव्रतींचा गौरव करण्याच्या "लोकमत"च्या संकल्पाचे चौथे पर्व यंदा साकारत आहे.
यूपीएल प्रस्तुत लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पॉवर्ड बाय कर्म आणि अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने साकारत आहे.
कुलभूषण जाधव यांना वाचवण्यासाठी सरकार काय प्रयत्न करत आहे असं विचारलं असता, "कुलभूषण जाधव यांना वाचवण्यासाठी जे करावं लागेल ते सर्व करणार. पण काहीही करु त्यांना वाचवणार. कुलभूषण जाधव जर गुप्तहेर असते तर त्यांनी भारतीय पासपोर्ट जवळ ठेवला नसता. पाकिस्तानच्या या कृत्याचा भारत निषेध करतो", असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे. तसंच हा एक प्री प्लान मर्डर करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप राजनाथ सिंह यांनी केला आहे.
"पाकिस्तानवर काय उपचार करायचा ते वेळ सांगेल. कोणाचाही स्वभाव बदलण्यास वेळ लागतो. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय कायदेशीर नियमांचं उल्लंघन केलं आहे. पाकिस्तानविरोधात आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवू असं सांगत पाकिस्तानवर दबाव आणण्यासाठी पुर्ण प्रयत्न करणार असल्याचं", सांगत राजनाथ सिंह यांनी भारतीयांना आश्वस्त केलं आहे.
जम्मू काश्मीरमधील परिस्थितीवर बोलताना राजनाथ सिंह यांनी "वर्षभरात जम्मू काश्मीरमध्ये बदल झालेला दिसेल", असा विश्वास व्यक्त केला आहे. "फारुख अब्दुल्ला यांनी जवानांवर दगडफेक करणा-यांचं केलेलं समर्थन चुकीचं असून त्यांनी असं करायला नको होतं", असं म्हणत राजनाथ सिंह यांनी त्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. दगडफेक करणा-यांवर नियंत्रण आणण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत असं विचारलं असता सरकार आपलं धोरण खुलं करु शकत नाही असं स्पष्ट केलं आहे.
"लष्करप्रमुखांनी दहशतवाद्यांविरोधात कारवाई करताना जे कोणी मधे येईल त्यांना परिणाम भोगावे लागतील केलेल्या वक्तव्याशी आपण सहमत असल्याचंही", राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितलं. "संकटाच्या वेळी धाव घेणारे जवान पेलेट गनचा वापर जाणुनबुजून का करतील हा विचार लोकांनी करायला हवा", असं राजनाथ सिंह बोलले आहेत.
"उत्तरप्रदेशातील विजयावर बोलताना आमचं स्पष्ट बहुमत येईल याचा मला विश्वास होता. पंतप्रधानांनाही मी तसं सांगितलं होतं. पण मला वाटलं होतं जास्तीत जास्त 250 जागा येतील. 325 आकडा आमच्यासाठी अविश्वसनीय होता", अशी कबुली राजनाथ सिंह यांनी यावेळी दिली. मुस्लिमांना तिकीट दिलं गेलं नाही असं विचारलं असता, "जो विजयी होईल त्यालाच तिकीट दिलं", असं उत्तर राजनाथ सिंह यांनी दिलं. "कोणता उमेदवार विजयी होईल यादृष्टीने तिकीटवाटप केलं जातं. मुस्लिमांनाही तिकीट दिलं आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये मुस्लिमांना तिकीट दिलं आहे", असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं.
ट्रिपल तलाकवर आमची भूमिका स्पष्ट आहे. कुराणाताही त्याचा उल्लेख नाही. सर्वांसोबत न्याय झाला पाहिजे असं स्पष्टपणे राजनाथ सिंह यांनी सांगितलं. "राम जन्मभूमीचा वाद न्यायालयात आहे, मध्यस्थी करण्याच्या निर्णयाचं स्वागत आहे. दोन्ही पक्ष एकमेकांशी बोलून पर्याय काढणार असतील तर त्याचं स्वागत आहे", असंही त्यांनी सांगितलं.
दाऊद इब्राहिमवर बोलताना राजनाथ सिंह यांनी सांगितलं की, "दाऊद इब्राहिमवर एकूण 33 केसेस आहेत. तो कराचीत आहे यामध्ये दुमत नाही. पाकिस्तानवर दबाव आणण्याचा पुर्ण प्रयत्न सुरु आहे".
ज्यांनी महाराष्ट्राचे नाव उंचावले, इथल्या मातीची शान वाढविली आणि इथे प्रगती घडवून आणली अशा १४ क्षेत्रांतील मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी लोकमतने उचललेले पाऊल हे आता केवळ सोहळा नव्हे, तर गौरवशाली परंपरा बनू पाहात आहे.
लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराच्या यंदाच्या चौथ्या पर्वातील विजेते ठरविण्याची मोलाची कामगिरी महाराष्ट्राच्या अभिमानात भर टाकणाऱ्या ११नामांकित ज्युरींनी पार पाडली आहे. जाहीर झालेली नामांकने, त्यावर जगभरातील वाचकांनी भरभरून दिलेली मते या पार्श्वभमीवर तब्बल साडेतीन तासांच्या विचार मंथनातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह ११ नामवंत ज्युरींनी विजेत्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे.
‘लोकमत’ने केलेल्या मंथनातून जाहीर झालेली १४ कॅटेगरीतील नामांकने आणि लोकमताचा कौल यावर अंतिम निवडीचा साज चढविण्याची जबाबदारी आनंदाने पार पाडणाऱ्या ज्युरी मंडळात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, डॉ. प्रकाश आमटे, अर्णव गोस्वामी, मिलिंद देवरा, महेश भट्ट, विक्रम लिमये, विक्रम श्रॉफ, सुनील सूद, डॉ. रमाकांत पांडा, विजय दर्डा आणि मृणाल कुलकर्णी यांचा सहभाग आहे.
नामांकन प्राप्त व्यक्तींना जगभरातील वाचकांनी लोकमतच्या वेबसाइटवर मतदानाद्वारे दिलेली पसंती तसेच ११ नामवंत ज्युरींचा कौल यांच्या एकत्रित विचारातून या पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत. तब्बल दोन दशलक्ष वाचकांनी या मतदानात सहभागी होत १४ कॅटेगरीतील नामांकनांसाठी दीड कोटी मते नोंदविली.
सर्व पुरस्कारांच्या माहितीसाठी क्लिक करा
https://www.dailymotion.com/video/x844vin