VIDEO : मुंबईत ‘पिवळे’ सोने ठरतेय ‘काळे’ : लोकमतच्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघड झाले वास्तव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2016 04:04 AM2016-11-12T04:04:43+5:302016-11-12T15:12:58+5:30
मनीषा म्हात्रे, मुंबई चौकशीचा ससेमिरा मागे लागू नये, यासाठी काळा पैसा साठवलेली मंडळी सोन्याच्या मार्केटकडे वळली आहेत. सोने व्यापाऱ्यांनीही ...
मनीषा म्हात्रे, मुंबई
चौकशीचा ससेमिरा मागे लागू नये, यासाठी काळा पैसा साठवलेली मंडळी सोन्याच्या मार्केटकडे वळली आहेत. सोने व्यापाऱ्यांनीही आपला भाव वाढवत बाजारात अवघ्या ३० ते ३२ हजार रुपयांत मिळणारे सोने तब्बल ५० ते ७० हजार रुपयांना विकत असल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आली.
मुंबईतील मुलुंड, घाटकोपर, दादर, आग्रीपाडा, भायखळा, पायधुनी येथील सोन्याच्या दुकानापासून थेट सीएसटी येथील झवेरी बाजार, दागिना बाजारात ‘लोकमत’ पोहोचले. या वेळी काळा पैसा खपवण्यासाठी सोन्याच्या बिस्टिकांना झळाळी मिळत असल्याची माहिती हाती लागली. दक्षिण आणि मध्य मुंबईतील काही ठिकाणी आयकर विभागाच्या छाप्याच्या धसक्याने सराफांनी दुकाने बंद करून घरी राहणे पसंत केले होते. तर काही ठिकाणच्या दुकानदारांनी खुलेआम बाजार मांडलेला दिसून आला. सोन्याच्या बाजारांत रोजच्या रोज हजारो कोटींची सोन्याची उलाढाल होते. शुक्रवारी मात्र या बाजाराचे स्वरूप पालटले होते. मुंबईबाहेरूनही अनेक जण येथे ‘अतिरिक्त’ पैसा घेऊन दाखल झालेले होते. या सोने खरेदीत महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. अनेक दुकानांपासून अगदी हाकेच्या अंतरावर पोलीस बंदोवस्त कडक होता. पण, विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेषही नव्हता. काळा पैशांच्या बिझनेसमध्ये मोठ्या ज्वेलर्सपेक्षा छोटे व्यापारी हे अधिक प्रमाणात सक्रिय दिसून आले. ‘मॅडम धंदा है. यहाँ सब चलता है. टेन्शन नहीं लेने का..’ असे छातीठोकपणे ग्राहकांना सांगितले जात होते. सोन्याप्रमाणे अन्य मार्गानेही काळा पैसा बदलून देण्यासाठी व्यावसायिकांनी शक्कल लढविल्याचे दिसून आले.
अरे मॅडम जी, यहा पचास का भाव है... आगे जाकर तो ६० से ७० हजार रुपया देना पडेगा. हा भाव कोणत्या इलेक्ट्रिकल अथवा महागड्या वस्तूचा नाही, तर सोन्याच्या दुकानांत आणि बाजारात खपवल्या जाणाऱ्या काळ्या पैशांचा आहे. ५०० आणि १०००च्या नोटा चलनातून मंगळवारी रात्रीपासून रद्द केल्यावर काळ्या पैशांद्वारे मोठ्या प्रमाणात सोने खरेदी सुरू आहे. झळाळते पिवळे सोने काळ्या पैशांतून जमवण्याचा जणू चंगच काहींनी केला आहे. कुठे सोन्याची बिस्किटे तर कुठे दागिन्यांचे आमिष दाखवून ही मंडळी काळ्या पैशाला पिवळा रंग देताना दिसून आली. काही ठिकाणी मात्र प्रामाणिक व्यापारीही भेटले.
{{{{dailymotion_video_id####x844hnh}}}}
रत्नमाला ज्वेलर्स, मुलुंड
प्रतिनिधी : आज सोन्याचा तोळ्याचा भाव काय?
व्यापार : सध्या ३२ हजार रुपये भाव चालू आहे.
प्रतिनिधी : आमच्याकडे पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा आहेत. त्या घेणार का?
व्यापारी : किती आहेत?
प्रतिनिधी : खरंतर माझ्या ओळखीच्यांचे काही पैसे आहेत. अंदाजे ३ लाख आहेत.
व्यापारी : भाव जास्त लागणार मॅडम.
प्रतिनिधी : कितीपर्यंत तुम्ही देणार?
व्यापारी : मलाही विचारून घ्यावे लागेल. ४८ हजार रुपयांपासून ५० ते ५८ असा भाव सुरू आहे. तीन लाखांत ६० ग्रॅमचे सोन्याचे बिस्किट देऊ शकतो.
प्रतिनिधी : पैसे आणून दिल्यानंतर लगेच मिळेल का?
व्यापारी : हो. तुम्ही पैसे आणून द्या. मी बघतो. पण तुम्ही बँकेत का नाही भरत आहात?
प्रतिनिधी : शक्य नाही बँकेत जमा करणे. म्हणूनच तुमच्याकडे आलो आहोत.
व्यापारी : ठीक आहे, तुम्ही पैसे घेऊन या रात्री ९ वाजेपर्यंत दुकान सुरू असते.
चोक्सी ज्वेलर्स, झवेरी बाजार
प्रतिनिधी : यहाँ पे पुराने नोट लेते है क्या?
वॉचमेन : हाँ, लेते है ना मॅडम.
प्रतिनिधी : क्या रेट है?
वॉचमेन : अरे फिलहाल ५० का रेट चल रहा है. आप अंदर जाईये. मिल जाएगा. (वॉचमनशी बोलून दुकानात प्रवेश केला)
प्रतिनिधी : यहाँ पे ५००, १००० का पुराना नोट लेते है ऐसा पता चला.
व्यापारी : हाँ लेते है.
प्रतिनिधी : त्या बदल्यात नवीन नोटा मिळणार की सोने?
व्यापारी : बिस्किट मिलेगा, पचासके रेट से.
प्रतिनिधी : पैसे दिल्यानंतर किती वेळात मिळणार?
व्यापारी : पैसे द्या माल घेऊन जा, किती रक्कम आहे.
प्रतिनिधी : तीन लाख रुपये आहेत.
व्यापारी : तुम्हाला २ लाख ६८ हजार रुपयांत ५० ग्रॅम सोन्याची बिस्किटे मिळतील.
प्रतिनिधी : ठीक आहे. आम्ही पैसे घेऊन येतो.
छोटा व्यापारी, झवेरी बाजार
प्रतिनिधी : आमच्या ओळखीच्यांच्या नोटा संपवायच्या आहेत. काय करावे लागेल?
कारागीर : माल घ्या.
प्रतिनिधी : काय भावाने द्याल?
व्यापारी : पन्नासच्या भावाने मिळेल. बाहेर दुसरीकडे गेलात तर ६० ते ७० हजार रुपये मोजावे लागतील.
प्रतिनिधी : दागिने मिळणार का? की कच्चा माल?
व्यापारी : प्युअर माल मिळेल. बिस्किट मिळतील.
प्रतिनिधी : किती वेळात माल हातात मिळेल. काही ओळखपत्र दाखवावे लागेल का?
व्यापारी : नाही, कागदपत्र कशाला? पैसे किती आहेत?
प्रतिनिधी : पाच लाख आहेत आमच्या मित्राकडे. पैसे आणतो आणि बिस्किट घेऊन जातो.
एस. एस. के. गोल्ड ज्वेलर्स,
दागिना बाजार
प्रतिनिधी : दागिने घ्यायचे आहेत. काय भाव चालू आहे?
व्यापारी : सध्या ३१ हजार ५०० रुपये सुरू आहे. पण ५००, १०००च्या नोटा घेणार नाही.
प्रतिनिधी : का? इथे तर बरेच जण घेतात असे समजले. अहो जास्तीची रक्कम आहे.
व्यापारी : नहीं मॅडमजी यहाँ कोई नही लेगा, बँक में डाल दो.
प्रतिनिधी : अरे हमारा नहीं है, हमारे पेहचानवाले का है. इसलिये नही हो सकता. आपसे कुछ हेल्प हो सकती है क्या?
व्यापारी : नहीं मॅडमजी, कितने पैसे है?
प्रतिनिधी : तीन से चार लाख है.
व्यापारी : सॉरी मॅडमजी, नहीं हो सकता.
छोटा व्यापारी,
वर्कशॉप झवेरी बाजार
प्रतिनिधी : अहो दुकान बंद करत आहात का? जुन्या नोटा घेणे बंद केले असे समजते.
कारागीर : अहो सगळंकाही सुरळीत सुरू आहे. जुन्या नोटा घेताहेत.
प्रतिनिधी : काय भाव आहे?
व्यापारी : सध्या ६० हजारांचा भाव आहे. सध्या जो मनाला येईल त्या भावाने सुरू आहे. पैसे द्या आणि अर्ध्या तासात माल हातात.
प्रतिनिधी : दागिने हवे असतील तर काय करावे लागेल?
व्यापारी : नाही मॅडम, उगाच कशाला जास्तीचे पैसे देता? कारागिरामागे चार ते पाचशे जास्त द्यावे लागतील. त्यात हा भाव पुढे ८० ते ९०च्या घरात जाणार आहे.
प्रतिनिधी : ठीक आहे आम्ही कळवतो. धन्यवाद!
कारागीर, दागिना बाजार
प्रतिनिधी : अरे बॉस, यहाँ पे पुराना नोट लेनेवाला कोई है क्या?
व्यापारी : नहीं मॅडमजी, यहाँ पे कोई नहीं. कल ले रहे थे मगर आज नही लेंगे. कलही यहाँ पे छापा पडा हे. सब डरे हुए है. आप फटे नोटवालों के पास जाओ. वहाँ पें चलता है.
प्रतिनिधी : थँक्यू.
यश ज्वेलर्स, मुलुंड
प्रतिनिधी : पेण्डेट घ्यायचे आहे. काय भाव आहे सध्या?
व्यापारी : ३० हजार ८०० रुपये आहे.
प्रतिनिधी : ५००, १०००च्या नोटा चालतील का इथे?
व्यापारी : ५०० आणि १०००च्या नोटा चलनातून रद्द केल्या आहेत. मलाही ३० ते ४० टक्क्यांची आॅफर आहे. मात्र आम्हाला मार्केटमधून ५० हजारांचा भाव येतोय. पण खोटा धंदा कशाला करायचा? म्हणून मी दुकानच बंद करत आहे.
प्रतिनिधी : कुणी दुसरे करून देणार का?
व्यापारी : मॅडम, शक्य नाही हो.