VIDEO : पंढरपूरमधील महिला स्नानगृहाच्या खिडकीतून महिलांचे काढले जायचे फोटो
By admin | Published: July 12, 2016 12:59 PM2016-07-12T12:59:40+5:302016-07-12T13:30:57+5:30
पंढरपूरातील महिला स्नानगृहातील खिडकीतून महिलांचे फोटो काढल्यामुळे स्नानगृह महिलांसाठी सुरक्षित राहिलेले नाही.
Next
दीपक होमकर
ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. १२ - पंढरपूरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी शेकडो भाविक पंढरीत येतात. वारीच्या काळात मठ, लॉज, हॉटेल मिळत नसल्याने एसटी स्थानकावरील सुलभ शौचालय व स्नानगृहातचे ते अंघोळ करायचे मात्र हे स्नानगृह महिलांसाठी सुरक्षित राहिलेले नाही. स्नानगृहाच्या खिडकीतून महिलांचे फोटो काढण्यात येत असल्याने महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पंढरपूर बसस्थानकाच्या सुलभ शौचालय संकुलातील महिलांच्या स्नानगृहाच्या पाठीमागील बाजूच्या खिडकीतून काही टपोरी तरूण सारखे डोकावायचे तर कधी मोबाईल घेऊन व्हिडीओ आणि फोटोही काढत होते. स्नानगृहात स्नान करताना एका प्रवासी महिलेलाच याचा अनुभव आल्यावर ती जोराने किंचाळली, प्रचंड घाबरल्याने तीचा रक्तदाब कमी झाला व ती तेथेच कोसळली. त्यानंतरही अनेकदा तक्रारी करूनही या मुलांचा त्रास कमी झाला नाही म्हणून महिलांचे स्नानगृह बंदच करुन टाकले अशी धक्कादायक माहिती शौचालय संकुलाचे व्यवस्थापक राजुकमार सिंग आणि येथील महिला कर्मचारी मंगल परमार यांनी ‘लोकमत’ला दिली.
शौचालय संकुलाच्या पाठीमागील बाजूस रेल्वे रुळ आहे. रेल्वे स्थानकापासून समांतर अंतरावर रुळ रहावे यासाठी सहा फुटाचा कट्टा बांधून त्यावर रुळ बांधले आहे. रुळाचा कट्टा आणि शौचालय यांच्या मध्ये सुमारे पाच फुटाचे अंतर आहे. त्यामुळे या कट्ट्यावर उभे राहिल्यास स्नानगृहाची खिडकीपर्यंत मुलांची उंची पोचते. मात्र हा कट्टा आणि स्नानगृह यांच्यामध्ये सुमारे पाच ते सहा फुटाचे अंतर आहे त्यामुळे खिडकीच्या सिमेंटच्या जाळीतून बाथरुमध्ये खाली वाकून पाहणे शक्य होत नसल्याने मुलांनी खिडकीची जाळीच फोडून टाकली आहे. कहर म्हणजे जाळीच्या आत एक लाकडी फळी टाकून अनेकवेळा काही मुले महिलांच्या स्नानगृहातही प्रवेश करत होते अशी धक्कादायक माहिती कर्मचार्यांनी सांगितली. येथील व्यवस्थापक आणि कर्मचार्यांनी त्या मुलांनी हुसकाविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्यावरच दगडफेक करण्यात आली असल्याची तक्रारही त्यांनी ‘लोकमत’कडे केली.
महिला व मुलांना मोफत सेवा फक्त फलकावरच
शौचालयासाच्या वापरासाठी पुरुषांना दोन रुपये दर आकारावे व महिला मुलांना मोफत वापरण्यास देण्याचा नियम आहे. तसा अस्पष्ट अक्षरातील फलकही शौचालयाच्या ठिकाणी लावला आहे. परंतू येथील कर्मचारी महिलांना संकुलात येतानाच अडवितात व त्यांच्याकडून पाच रुपये सक्तीने वसूल करतात. पुरुषांनाही दोन रुपये असताना पाच रुपये दर सक्तीने वसूल करतात. अनेक वेळा सुट्टे पैसे नसतील तर त्यांना वेठीस धरले जाते. त्यामुळे महिला व मुलांची येथे कुचंबना केली जाते.
आम्ही परप्रांतिय आहोत येथे पोट भरण्यासाठी नोकरी करतो मात्र येथील स्थानिक गुंडाकडून आमला दमदाटी केली जाते. महिलांच्या स्नानगृहात डोकावल्यावर त्यांना हटकल्यावर त्यांनी आमच्यावरच दगडफेक केली त्यानंतर आम्ही तक्रार करूनही येथील अधिकारी, पोलिसांनी दखल घेतली नाही.
राजकुमार सिंग, व्यवस्थापक, सुलभ शौचालय, पंढरपूर
एकटी महिला स्नानासाठी आली तर त्यांना आम्ही स्नानगृह देत नव्हतो कारण ते सुरक्षित नव्हते मात्र त्यांचा गृप असेल व ते एकजण स्नान करताना दुसर्या पहारा देत असतील तरच त्यांना स्नानगृह द्यायचो मात्र त्यातही धोका असल्याने अखेर स्नानगृह गेल्या सहा महिन्यापासून बंद ठेवले.
- मंगल परमार, कर्मचारी, सुलभ शौचालय, पंढरपूर