VIDEO - आदिवासींच्या जीवनात रंग भरणारी शिक्षणाची ‘फुलवारी’
By Admin | Published: November 11, 2016 04:54 PM2016-11-11T16:54:18+5:302016-11-11T19:40:11+5:30
ऑनलाइन लोकमत/अनिल गवई खामगाव, दि. 11 - ‘ती’ मुलं अनाथ नाही, निराधारही नाहीत, पण यातील सर्वच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ...
ऑनलाइन लोकमत/अनिल गवई
खामगाव, दि. 11 - ‘ती’ मुलं अनाथ नाही, निराधारही नाहीत, पण यातील सर्वच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत. यापैकी काहींच्या घरात कौटुंबिक स्वास्थ नाही... शैक्षणिक सुविधा नाहीत.. पण सा-यांकडे शिकण्याची उमेद आणि जिद्द आहे. अशा आदिवासी दुर्गम भागातील चिमुकल्यांसाठी ‘तरूणाई’ झटत असल्यामुळे सातपुड्यातील ओसाड माळरानावर मोफत शिक्षणाची ‘फुलवारी’ फुलत आहे.
शिक्षण आणि आधुनिक क्रांतीच्या जगापासून कोसोदूर असलेल्या सातपुड्यातील आदिवासींच्या जीवनात शिक्षणाचा गोडवा निर्माण करण्यासाठी ‘तरूणाई’ने गेल्या सात महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न चालविले आहेत. आदिवासी बालकांना हसत खेळत शिक्षण दिल्या जात असल्यामुळे जळगाव जामोद तालुक्यात येत असलेल्या वडपाणी, बांडापिंपळ, कुंवरगाव, चालठाणा, चाळीसटापरी, भिंगारा या आदिवासीबहुल वस्तीतील तब्बल ४०-५० लहान बालकांना आता ‘फुलवारी’चा चांगलाच लळा लागला आहे. शहरी भागातील लहान मुलं, किड्स स्कुल, नर्सरीत जातात. हसत-खेळत शिक्षणाचे धडे गिरवतात. त्याच धर्तीवर आदिवासी बालकांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासोबतच राहणीमानाचाही दर्जा सुधारण्यासाठी गेल्या सात महिन्यांपासून ‘तरूणाई’चा मोरक्या घरा-दारावर तुळशीपत्रं ठेवून झटत आहे.
कॉन्व्हेंटसारखाच ‘फुलवारी’चा ड्रेसकोड !
आदिवासी बालकांसाठी भरणारी ‘फुलवारी’ ही अनोखी शाळा डोंगर पायथ्याच्या माळरानावर भरत असली तरी, शहरी कॉन्व्हेंट आणि इतर शाळांप्रमाणेच तरूणाईच्यावतीने मोफत ड्रेस आणि इतर साहित्य दिल्या जाते. त्यामुळे इतर शाळांप्रमाणेच फुलवारीचा ड्रेस कोड असल्याचे दिसून येते. आदिवासी मुलांना शिक्षणात गोडी वाटावी म्हणून खेळणी आणि इतर साहित्यासोबतच त्यांना मोफत खाऊ देखील तरूणाईच्यावतीने पुरविण्यात येतात.
https://www.dailymotion.com/video/x844hm8