व्हिडिओ - धावत्या रेल्वेत चढण्याच्या नादात आला रेल्वेखाली, पोलिसांनी वाचवलं
By Admin | Published: June 17, 2016 11:52 AM2016-06-17T11:52:07+5:302016-06-17T11:57:16+5:30
लोणावळा रेल्वे स्थानकात धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात प्रवाशाचा तोल गेला आणि रेल्वेखाली आला
>ऑनलाइन लोकमत -
पिंपरी, दि. 17 - वेळेत पोहोचण्याच्या नादात अनेकजण धावत्या रेल्वेत चढण्याच्या प्रयत्न करतात. ज्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. लोणावळा रेल्वे स्थानकात अशाच प्रकारे धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात प्रवाशाचा तोल गेला आणि रेल्वेखाली आला. सुदैवाने रेल्वे स्थानकावर उभे असलेल्या पोलिसांची त्याच्यावर नजर पडली आणि त्यांनी त्याचा जीव वाचवला. ही चित्तथरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
बुधवारी दुपारी तीन वाजता मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणा-या नागरकोईल रेल्वे लोणावळा स्थानकात पोहोचली होती. रेल्वे सुरु झाल्यानंतर एक तरुण धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करु लागला. पण तोल गेला आणि रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये तो पडला. सुमारे 100 फूट तो फरफटत गेला. पण त्याच्या ओरडण्याचा आवाजाने स्थानकावरच उभे असलेल्या सचिन भोई आणि सुमित पाल या पोलीस शिपायांनी मदतीसाठी धाव घेतली. मोटरमननेदेखील प्रसंगावधान राखत रेल्वे थांबवली. त्यानंतर तरुणाला सुखरूप बाहेर काढण्यात आलं.
पोलीस आणि मोटरमनमुळे तरुणाचा जीव वाचला. पोलिसांनी चौकशी करुन त्याला सोडून दिलं आहे. मात्र यामुळे धावत्या रेल्वेत चढणे तुमच्या जीवावर बेतू शकते हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे.