VIDEO - मॅट अभावी प्रतिभावान कुस्तीपटूंना लाल मातीत करावा लागतोय सराव
By Admin | Published: January 28, 2017 03:54 PM2017-01-28T15:54:03+5:302017-01-28T15:54:03+5:30
ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 28 - राज्यातील नाशिक, कोल्हापूर, सातारा आदी जिल्ह्यांमध्ये कुस्तीच्या तालमींची मोठी परंपरा आहे. तशीच ती ...
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 28 - राज्यातील नाशिक, कोल्हापूर, सातारा आदी जिल्ह्यांमध्ये कुस्तीच्या तालमींची मोठी परंपरा आहे. तशीच ती अनेक गावांत आणि शहरांतही आहे. मात्र शहरासह सर्वच गावांमध्ये आता थोडयाफार फरकाने बलोपासनेच्या पद्धतीत आरपार बदल होत आहेत. कुस्तीला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाल्याने हा बदल होत आहे; मात्र लाल मातीच्या आखाडयात खेळणारे अनेक पहिलवान अजूनही आधुनिक सोयी सुविधांपासून वंचित आहेत.
एकीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर पदकांसाठी डोळे लावून बघण्याची वेळ असताना वेगवेगळ्या तालमींमध्ये दर्जेदार पहिलवान घडत असताना त्यांना व्यावसायिक कुस्तीसाठी आवश्यक मॅटचे दर्शनही होत नसल्याने तालमींमध्ये अजूनही लाल मातीचाच धुरळा उडतो आहे. लाल मातीत लोळताना कडाकड शड्ड ठोकल्याने तरुणाईला हुरूप येतो हे तितकेच खरे असले तरी व्यावसायिक कुस्ती खेळण्यासाठी मॅटची किती गरज आहे, हे वास्तव राष्ट्रकुल स्पर्धामध्ये सुवर्णपदक पटकावणा-या कुस्तीपटू गीता फोगाट यांच्या संघर्षावर चित्रित झालेल्या ‘दंगल’ चित्रपटातून संपूर्ण देशासमोर आले आहे.
नाशिकच्या विविध तालमींमध्येही असेच दुर्देवी वास्तव पाहायला मिळत आहे. शहरातील तीनशे वर्षाची परंपरा असलेल्या दांडेकर-दीक्षित तालीम संघातील पहिलवानही गेल्या अनेक वर्षापासून मॅटपासून वंचित आहेत. त्यांना केवळ मातीतच सराव करावा लागतो आहे. या तालमीत काही मुलीही कुस्तीचे प्राशिक्षण घेतात. यातील शिल्पा तांबोळी ही महिला कुस्तीपटू राज्यपातळीवर कुस्ती खेळत असून, तिने विविध स्पर्धामध्ये चमकदार कामगिरी केली आहे.
तिला सराव करण्यासाठी तालमीत मॅट उपलब्ध होत नसल्याने विविध स्पर्धासाठी पुरेसा सराव होत नाही. तालमीत दहा वर्षापूर्वी मिळालेली एकच मॅट असून, तिची दुरवस्था झाली आहे. या फाटलेल्या मॅटवरच काही पहिलवान सराव करतात. तर अनेकजण या फाटलेल्या मॅटऐवजी मातीतच सरावाला प्राधान्य देतात. त्यामुळे क्रीडा विभागाने शहरातील तालीम संघांना मॅट आणि प्रशिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
शहरात गुलालवाडी व्यायामशाळा, यशवंत व्यायाम-शाळा, मोहन मास्तर तालीम, दांडेकर-दीक्षित तालीम, रोकडोबा तालीम, छपरीची तालीम, मधली होळी तालीम, गणोशवाडी तालीम, ओकाची तालीम अशा अनेक व्यायामशाळांचा बोलबाला होता. परंतु क्रीडा विभागाच्या अनास्थेमुळे तालमींना मॅट तर मिळालीच नाही परंतु वारंवार मागणी करूनही चांगला प्रशिक्षक मिळत नसल्याची खंत उत्तर महाराष्ट्र तालीम संघाचे उपाध्यक्ष हिरामण वाघ यांनी दिली. बहुतेक तालमींमध्ये आखाडा असून, कुस्ती बंद झाली आहे. तर काही तालमींच्या हौदातील कुस्ती बंद होण्याच्या मार्गावर आहे. अशा परिस्थितीत किमान सुरू असलेल्या तालमींना मॅट आणि चांगले कोच देऊन नाशिकमधील कुस्तीला प्रोत्साहन देण्याची मागणी होत आहे.
https://www.dailymotion.com/video/x844q2o