Pritam Munde : Video - "आजच्या एवढ्या स्वार्थी जगात..."; रक्षा खडसेंसाठी प्रितम मुंडेंची खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 02:27 PM2024-06-11T14:27:51+5:302024-06-11T14:34:38+5:30
Pritam Munde And Raksha Khadse : रक्षा खडसे या तिसऱ्यांदा रावेर मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. याच दरम्यान प्रितम मुंडे यांनी रक्षा खडसेंसाठी खास पोस्ट लिहिली आहे.
लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ७१ मंत्र्यांचा शपथविधी राष्ट्रपती भवनात पार पडला. या नव्या मंत्र्यांना खातेवाटप जाहीर करण्यात आलं. मोदींच्या नेतृत्वाखालील या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील ६ मंत्र्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील नितीन गडकरी, पीयूष गोयल यांना केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट खात्याची जबाबदारी देण्यात आली. शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांच्याकडे स्वतंत्र प्रभार असलेल्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी आहे. रामदास आठवले, रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ यांच्याकडे राज्यमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे.
रक्षा खडसे या तिसऱ्यांदा रावेर मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. याच दरम्यान प्रितम मुंडे यांनी रक्षा खडसेंसाठी खास पोस्ट लिहिली आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांनी एक सुंदर व्हि़डीओ शेअर केला आहे. यामध्ये दोघींचे फोटो पाहायला मिळत आहेत. "आजच्या एवढ्या स्वार्थी जगात आपली मैत्री दृष्ट लागण्यासारखीच आहे... १० वर्षातला प्रवास तुमच्या सगळ्यांच्याच सोबतीने खूप छान झाला, पण तुझं स्थान माझ्या आयुष्यात खास होतं आणि नेहमी राहील" असं प्रितम मुंडे यांनी म्हटलं आहे.
"10 वर्ष ही खूप काही देऊन गेली , बहुतेक चांगलंच. मंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतर जल्लोष साजरा करण्यापेक्षा आपली मैत्रीण संसदेत नाही म्हणून गहिवरून येणारी तू! रक्षा, आजच्या एवढ्या स्वार्थी जगात आपली मैत्री दृष्ट लागण्यासारखीच आहे..."
"पक्षातील निवडणूक निरीक्षकांना एकमेकांच्या शिफारसी करणाऱ्या, स्वतःच तिकीट जाहीर झालं की नाही यापेक्षा मैत्रिणीचं तर झालं न हे बघणाऱ्या, निकालाच्या दिवशी स्वतःचे उतार चढाव हाताळताना देखील एक नजर कायम दुसरीच्या निकालाकडे ठेवणाऱ्या. १० वर्ष सतत संसदेत शेजारी बसणाऱ्या, पक्षाच्या बैठकांना एकत्रच जाणाऱ्या, दिल्लीत एकाच मजल्यावर राहणाऱ्या, एकमेकींना राजकीय घटनांपासून कपड्यांच्या रंगसंगतींपर्यंत सल्ले देणाऱ्या आपण. संसदेतली विधेयकांची चर्चा करणाऱ्या आपण, अनेक देवदर्शनांना देखील एकत्रच गेलो!"
"१० वर्षातला प्रवास तुमच्या सगळ्यांच्याच सोबतीने खूप छान झाला, पण तुझं स्थान माझ्या आयुष्यात खास होतं आणि नेहमी राहील. आजच्या या स्वार्थी जगात निस्वार्थ मैत्री जपणारी माझी मैत्रीण रक्षा तुला या यशाच्या कोटी कोटी शुभेच्छा आणि तुझ्या हातून आजपर्यंत घडलं तसंच चांगलं कार्य घडो, सतत लोकसेवा तुझ्या हातून घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना" असं प्रितम मुंडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.