व्हिडीओ-पुणेकरांनी उत्साहातही जपले सामाजिक भान,रुग्णवाहिकेला दिला रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2016 09:06 PM2016-09-18T21:06:15+5:302016-09-18T21:08:22+5:30
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या सोहळा पाहण्यासाठी पुण्याच्या टिळक चौकामध्ये अवघा जनसागर ओसंडला होता. या गर्दीमध्ये एका नागरिकाला त्रास
Next
ऑनलाइन लोकमत
पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीचा सोहळा पाहाण्यासाठी पुण्याच्या टिळक चौकामध्ये अवघा जनसागर ओसंडला होता. या गर्दीमध्ये एका नागरिकाला त्रास होऊ लागल्यावर त्याला घेऊन जात असलेल्या रुग्णवाहिकेला रस्त्यावर जमलेल्या हजारो पुणेकरांनी तातडीने रस्ता करुन दिला. अवघ्या काही क्षणातच हजारोंची गर्दी दोन भागात विभागून तयार झालेल्या रस्त्यामधून ही रुग्णवाहिका कोणत्याही अडथळ्याशिवाय पार झाली. पुणेकरांच्या माणुसकीचे दर्शन घडवणा-या या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
एका गणेशभक्ताने एका इमारतीच्या छतावरुन हा व्हिडीओ चित्रीत केला आहे. एका गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीचे चित्रीकरण करीत असताना हे दृष्य कॅमे-यात कैद झाले. मंडळाच्या मिरवणुकीमध्ये वाजणारा नादब्रह्म ढोल ताशा पथकाचा ताल आणि त्याच्या ठेक्यावर तरुणाई थिरकत असतानाच अचानक रुग्णवाहिकेच्या सायरनचा आवाज येऊ लागतो. काही कळायच्या आतच पोलीस नागरिकांना बाजुला होण्याची विनंती करु लागलात. कार्यकर्ते आणि स्वयंसेवक गणेशभक्तांना मागे सरकवू लागतात. सायरनचा आवाज करीत एक रुग्णवाहिका पुढे सरकू लागले. नादब्रह्म पथकाचे वादक वादन थांबवतात. अवघ्या तीस सेकंदांमध्ये हजारो गणेशभक्तांचा तो जनसागर दोन भागात विभागला जातो. रुग्णवाहिकेसाठी रस्ता करुन दिला जातो. कोणतीही गडबड, ढकलाढकली, चेंगरा चेंगरी न होता अडथळ्याविना ही रुग्णवाहिका रुग्णालयाकडे निघून जाते. आणि पुन्हा मिरवणुकीचा जल्लोष सुरु होतो.
पुणेकरांच्या माणुसकीची झलक दाखवणारा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओची सध्या पुण्यामध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.
पाहा व्हिडीओ-