VIDEO : पुरुषोत्तमचा कल्ला ....

By admin | Published: July 25, 2016 08:38 AM2016-07-25T08:38:13+5:302016-07-25T10:48:29+5:30

पुण्याच्या नाट्यस्पर्धांची पंढरी समजली जाणारी पुरुषोत्तम करडंक स्पर्धा या १६ आॅगस्ट पासून सुरु होत आहे. या स्पर्धेत पुण्याच्या ५१ महाविद्यालयीन संघांचा सहभाग असून त्यांच्या तालमींना वेग आला आहे.

VIDEO: Purushottam kalla .... | VIDEO : पुरुषोत्तमचा कल्ला ....

VIDEO : पुरुषोत्तमचा कल्ला ....

Next
 
पुणे, दि. २५ -  पुण्याच्या नाट्यस्पर्धांची पंढरी समजली जाणारी पुरुषोत्तम करडंक स्पर्धा यंदा १६ आॅगस्ट पासून सुरु होत आहे.या स्पर्धेत पुण्याच्या ५१ महाविद्यालयीन संघांचा सहभाग असून या संघांच्या तालमींना सध्या वेग आला आहे.स्पर्धेचे यंदाचे ५२ वं वर्ष असून या स्पर्धेतून अनेक नाट्य-सिने कलाकार महाराष्ट्राला मिळाले आहेत.शिस्त व उत्तम दर्जा यासाठी ही स्पर्धा ओळखली जाते. अभिनयाला या स्पर्धेत अधिक महत्त्व असल्याने कलाकारांना अधिक मेहनत घ्यावी लागत आहे.
  ६० मिनिटाच्या एकांकिकेमागे विद्यार्थ्यांची अनेक महिन्यांची मेहनत व चिकाटी असते.प्रत्येक संघ पूर्ण आत्मियतेने व जोशाने तयारी करत असतो.पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत सहभागी असलेल्या संघांची रंगमंचामागील तयारी, तालमींमधील जोश व उत्साह लोकमत तुमच्यासाठी घेऊन आले आहे. सहभागी संघांशी व त्यांच्या दिग्दर्शकांसोबत केलेली बातचीत तुम्हाला लोकमतच्या वेब साईटच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे.
 ‘सांस्कृतिक आणि कलाक्षेत्राच्या वर्तुळातील सृजनशील अभिव्यक्ती आणि कलागुणांना अढळ जागा मिळवून देणारं हक्काचं व्यासपीठ’ असा या स्पर्धेचा नावलौकिक आहे.  म्हणूनच महाविद्यालयीन जगतात या स्पर्धेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पन्नास वर्षांपूर्वी महाराष्ट्र कलोपासक संस्थेनं लावलेल्या स्पर्धेच्या या छोट्याशा रोपट्याचं आज वटवृक्षात रूपांतर झालं असून, पुण्याबाहेरही स्पर्धेची बीजं रोवली आहेत.  प्रायोगिक, व्यावसायिक, समांतर अशा विविधतेने बहरलेल्या रंगभूमीवर पाऊल टाकण्याचं बाळकडू कलाकारांना मिळतं, ते याच स्पर्धेतून. याच ‘पुरूषोत्तम’नं रंगभूमीला प्रतिभावान कलाकारांची एक उत्तुंग अशी यशस्वी मालिका दिली. त्यामध्ये प्रकर्षानं नाव घेता येतील अशी मंडळी म्हणजे डॉ. जब्बार पटेल, डॉ. मोहन आगाशे, योगेश सोमण, संजय पवार, प्रवीण तरडे, सुबोध भावे, अमृता सुभाष, सोनाली कुलकर्णी, उपेंद्र लिमये, मुक्ता बर्वे. यासारखी आणखीही अनेक नावं आहेत.
स्पर्धेची शिस्त आणि महाविद्यालयांच्या नाटकांमधील दरारा हे या स्पर्धेचं अनोखं वेगळेपण असून, ते आजही टिकून ठेवण्यात संस्थेचाच मोठा वाटा आहे. पुरुषोत्तमने अनेक उत्तमोत्तम अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक मराठी कलासृष्टीला दिले. 
महाविद्यालयांमध्ये पुरुषोत्तमची धामधूम सुरू झाली आहे. ‘लोकमत आॅनलाईन’च्या माध्यमातून तालमींपासून ते लेखक- दिग्दर्शक आणि अभिनेते करत असलेले नवनवीन प्रयोग आपल्यापर्यंत पोहोचविणार आहोत....
 
 
कलाकारांनी  ‘पुरुषोत्तम’ला मोठे केले
     गेल्या पाच दशकांपासून नाटकवेडी तरुण मुलं ‘पुरुषोत्तम करायचंचऽ’ म्हणून पुरती भारावली जातात. नाटक म्हणजे फक्त लेखन, दिग्दर्शन, अभिनय नव्हे. ‘पुरुषोत्तमला बॅकस्टेज करतोय’ हेही अभिमानानं सांगितलं जातं. पुरुषोत्तम करंडक नावाचं व्यासपीठ नुसतं नाटक शिकवत नाही, तर जगण्यासाठी लागणारी उर्मी, उर्जा भरभरुन देतं. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची ही किमया, जादू वर्षानूवर्षे टिकून आहे. आजवर कितीतरी नाट्यस्पर्धा सुरू झाल्या आणि बंद पडल्या; पण ‘पुरूषोत्तम’ ही महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा आहे कुणाचेही आर्थिक पाठबळ नसताना पाय घट्ट रोवून उभी आहे, याचा सार्थ अभिमान आहे. अनेकांकडून स्पर्धेच्या प्रायोजकत्वाविषयीची विचारणा झाली; पण कोणताही व्यावसायिक उद्देश ठेवून स्पर्धा करायची नसल्यानेच महाराष्ट्र कलोपासक शिवाय कुणाचाही ‘ब्रँड’ त्यामागे लागला नाही आणि तो कधी लागणार नाही, असा सार्थ विश्वास कलोपासकच्या पदाधिका-यांनी व्यक्त केला.  
        ‘लोकमत’ कार्यालयात झालेल्या सदिच्छा भेटीत महाराष्ट्र कलोपासक संस्थेचे चिटणीस राजेंद्र ठाकूर देसाई आणि सदस्य अमृता पटवर्धन यांनी मनमोकळा संवाद साधला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या जीवनात पुरूषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेला अत्यंत अनन्यसाधारण महत्व आहे. पन्नास वर्षाच्या वाटचालीकडे आगेकूच करणा-या या स्पर्धेने रंगभूमीच्या इतिहासात एक मानदंड प्रस्थापित केला आहे. या स्पर्धेने व्यावसायिक, प्रायोगिक आणि समांतर रंगभूमीला प्रतिभावंत कलाकारांची एक मालिका दिली. कलाकारही आपल्या यशस्विततेचे श्रेय ‘पुरूषोत्तम’लाच देतात. पण यामध्ये कलाकारांचा मोठेपणा आहे; आपल्या कलागुणांनी ते मोठे झाले आहेत, ‘पुरूषोत्तम’ने आम्हाला मोठे केले असे जेव्हा ते सांगतात, तेव्हा ते स्पर्धेला मोठे करतात, त्या कलाकारांचे आम्ही नेहमीच ॠणी राहू, अशी भावना ठाकूर देसाई यांनी व्यक्त केली.
 
 

 
  ते म्हणाले, महाराष्ट्र कलोपासक संस्थेच्या वतीने कोणत्याही व्यावसायिक उद्देश ठेवून  ही स्पर्धा आयोजित केली जात नाही. म्हणूनच या स्पर्धेची विश्वासार्हता आजही टिकून आहे. संस्थेचे चिटणीस पुरूषोत्तम उर्फ आप्पासाहेब वझे यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एखादा उपक्रम सुरू करण्याची कल्पना पुढे आली. महाविद्यालयीन स्तरावर एकही स्पर्धा नाही, असे दिसल्यावर एकांकिका नाट्यप्रकार रूजू करण्याचा विचार पुढे आला आणि चिटणीस राजाभाऊ नातू यांनी पुण्यात १९६३ मध्ये पुरूषोत्तम स्पर्धेला सुरूवात केली. तरूण पिढीच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हाच या स्पर्धेचा हेतू होता आणि आजही कायम आहे. सुरूवातीच्या काळात म्हणजे 1936 मध्ये  शिक्षकांनी सुरू केलेली ही संस्था होती. दत्तो वामन पोतदार हे अध्यक्ष आणि केशवराव दाते हे उपाध्यक्ष होते. त्यावेळी शासनाने नाटकांवर करमणूक कर आणला; मग संस्थेने अभिनव शक्कल लढवत  ‘रसिकाकूल योजना’ अमलात आणली, अनेक कुटुंबांना सदस्य करून घेतले आणि रंगभूमीला हक्काचा प्रेक्षक मिळाला. हौशी नाटकांचे प्रयोग होऊ लागले आणि संस्थेलाही हळूहळू अनेक कलाकार मिळाले. संस्थेला मधु जोशी यांनी इंफ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून दिले. या सगळ्यांच्या पुण्याईमुळे पुरूषोत्तमचा प्रवास अखंडपणे सुरू राहिला आहे, त्यांच्या विचारांवरच संस्थेचे काम आजही सुरू आहे, पैसा कमवणे हा उददेश न ठेवता निरपेक्ष वृत्तीने काम करणारे कार्यकर्ते हेच संस्थेच्या कामाचे वेगळेपण आहे. म्हणूनच इतक्या वर्षानंतरही कोणाचेही प्रायोजकत्व न घेताही संस्था स्वबळावर स्पर्धेचे आयोजन करीत आहे, यात अनेक अडचणीही आल्या पण त्यावर मात करीत संस्थेने आपला कार्यप्रवास सुरू ठेवला आहे. 
 
 पुण्याबाहेरही स्पर्धेचा विस्तार
पुण्याबाहेरच्या महाविद्यालयांमधल्या तरूणांनाही स्पर्धेचे व्यासपीठ मिळावे यासाठी जळगाव, नागपूर, रत्नागिरी आणि मुंबई या ठिकाणी केंद्र स्थापन करण्यात आली असून, या केंद्राच्या माध्यमातून पुरूषोत्तम करंडक स्पर्धा याभागात आयोजित केली जाते. यंदाच्या वर्षीपासून मात्र मुंबई केंद्र बंद करण्यात आले आहे. ही स्पर्धा गरजू कलाकारांसाठी आहे, ज्यांना स्पर्धेची गरज नाही त्यांच्यासाठी ही स्पर्धा भरविण्याची आमची इच्छा नाही. मुंबई केंद्रात विद्याथर््यांचा खूप वाईट अनुभव आल्यामुळे नाईलाजास्तव हे केंद्र आम्हाला बंद करावे लागल्याचे ठाकूरदेसाई सांगतात. कोणत्याही महाविद्यालयाला स्पर्धेमध्ये दोन प्रवेशिका भरता येत नाहीत, असा नियम करण्यात आला आहे. स्पर्धा जास्त दिवस चालल्यास परीक्षक मिळणे अवघड जाते, असेही त्यांनी सांगितले.
 
 स्पर्धेच्या नियमांचा आणि शिस्तीचा बाऊ
अनुभवातून निर्माण झालेले हे नियम आहेत त्याचा बाऊ करण्याची गरज नाही. नाटक सुरू झाल्यानंतर कुणालाच अगदी परीक्षक, पदाधिकारी कुणालाच प्रवेश दिला जात नाही. यात कुणालाच जाच आणि त्रास देण्याचा हेतू नाही. नाटक सादर करताना कलाकारांना त्रास होऊ नये हीच त्यामागची प्रांजळ भावना आहे. शिस्त चांगल्या गोष्टींसाठी रूजविण्यासाठी असलीच पाहिजे. नियम असणे आयोजनाच्या दृष्टीने सोयीस्कर असते. संस्थेचे पदाधिकारी परीक्षकांच्या निकालामध्येही हस्तक्षेप करीत नाहीत. एखाद्याला परीक्षक योग्य वाटत नसेल तर त्या महाविद्यालयाने तसे पत्र संस्थेला सादर करावे आणि नुसतीच एकांकिका सादर करावी. पण परीक्षक बदलला जात नाही. 
 
 संघाच्या एकांकिकांचे चित्रीकरण करण्याची इच्छा; बजेट नाही
स्पर्धेतील 51 संघांचे चित्रीकरण करून ठेवण्याचा प्रस्ताव अनेकदा समोर आला. तीन वर्षांपूर्वी हा प्रयत्न झाला देखील. मात्र संस्थेचे बजेट तेवढे नसल्याने ते करता येणे शक्य झाले नाही. मुळात चित्रीकरण करताना कलाकारांना त्रास होणार आणि यासाठी 3 कॅमेरा सेटस लागणार, महाविद्यालयांकडून पैसे घेऊन करायचे म्हटले तरी  त्याला सर्वांची परवानगी मिळायला हवी, तरच ते शक्य आहे. महाविद्यालयांवर तरी आम्ही बोजा का द्यायचा? असे ठाकूरदेसाई यांनी सांगितले.   
 
 विद्यार्थी लेखकांची परंपरा
पुरुषोत्तम स्पर्धेमुळे विद्यार्थी लेखकांची आगळीवेगळी परंपरा निर्माण झाली आहे. सुरुवातीच्या सहा-सात वर्षांच्या काळात फारसे विद्यार्थी लेखक उदयाला आले नाहीत. मात्र, सतीश आळेकर, सुहास तांबे, दिलीप कोल्हटकर, योगेश सोमण, अभिराम भडकमकर यांच्या रुपाने विद्यार्थी लेखकांची परंपरा निर्माण झाली. 
 
 स्पर्धेतील विषयांचे बदलते स्वरुप
ही स्पर्धा संपूर्णपणे विद्यार्थ्यांची असल्यााने एकांकिकांच्या विषयांमध्ये कालानुरुप वैविध्य पहायला मिळत आहे. संबंधित पिढीचे विषय, भावविश्व या विषयांमधून हाताळले जाते. दर दहा वर्षांनी एकांकिकांच्या विषयांमध्ये कमालीचे वैविध्य दिसून येते. त्या त्या दशकांतील सामाजिक, आर्थिक, स्थित्यंतरांचे प्रतिबिंब एकांकिकांमधून उमटत आले आहे. त्यामुळे युवा  
पिढीच्या भावविश्वाचा आरसा येथे पहायला मिळतो.
 
  पारितोषिकांच्या नावांना अनन्यसाधारण महत्व
पुरुषोत्तम स्पर्धेला कोणतेही वलय नव्हते, तेव्हापासून ठरावीक नावांनी एकांकिकांना पुरस्कार दिले जातात. ज्यांच्या नावे अथवा स्मरणार्थ पुरस्कार दिले जातात, ती नावे फार मोठी नाहीत. मात्र, स्पर्धेत रुजलेली विचारसरणी, संस्कार आणि पुरस्कारांची महती महत्वाची आहे. व्यावसायिकीकरण हा पुरुषोत्तमचा उद्देशच नाही. त्यामुळे, बक्षिसांची नावे कधीही बदलली जाणार नाहीत, यावर कलोपासक ठाम आहे. संस्थेला अनेकदा पैशांच्या अडचणी निर्माण झाल्या. त्यावेळी सदस्य भक्कमपणे पाठीशी उभे राहिले. यापुढेही सदस्यांचा पाठिंबा महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
 
   इंटरनॅशनल ड्रामा फेस्टिव्हल
‘पुरुषोत्तम’च्या कक्षा दिवसेंदिवस विस्तारत आहेत. याचाच एक भाग म्हणून इंटरनॅशनल ड्रामा फेस्टिव्हल आयोजित करण्याचा कलोपासकचा मानस आहे. विविध देशांमधील ड्रामा स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या नाट्यमहोत्सवाचे आयोजन हा या फेस्टिव्हलमागील मुख्य उद्देश आहे. याबाबत युनेस्को आणि आयएपीआर या संस्थांशी बोलणी सुरु आहेत. वर्षभरात सर्व परवानग्यांची पुर्तता होऊन पुढील वर्षी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता आहे.
  
बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय
 
दोन शूर,सायकल,पेशंट,हू लेट द डॉग्ज आऊट अशी दर्जेदार नाटके पुरुषोत्तम स्पर्धेत सादर करुन बी.एम.सी.सीने करंडकांवर नाव कोरले आहे.हाच यशाचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी बी.एम.सी.सी चा यंदाचा संघ नव्या जोमाने व उत्साहाने तालमिला लागला आहे.
अभिनयाला या स्पर्धेत अधिक महत्त्व असल्याने या संघाचा दिग्दर्शक स्वप्निल भावे कलाकारांच्या एक्सप्रेशन्सवर अधिक भर देत आहे.या संघाची संहिता ठरली असून अभिनय कार्यशाळेच्या माध्यमातून कलाकारांची निवड करण्यात आली आहे.
    निपुण धमार्धिकारी,अमेय वाघ,सिद्धार्थ मेनन,आलोक राजवाडे,ओम भूतकर या आजच्या मराठी नाट्य-सिनेसृष्टीतील कलाकारांच्या कारकिदीर्ची सुरुवात हि बी.एम.सी.सी तूनच झाली.नवनवीन विषय पुरुषोत्तमच्या माध्यमातून रंगमंचावर मांडून बी.एम.सी.सीने आपला वेगळाच ठसा उमटवला आहे.त्यामुळे यंदाचा संघ पुरुषोत्तम मध्ये काय सादर करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
 
फर्ग्युसन महाविद्यालय
 
फर्ग्युसन महाविद्यालय पुरुषोत्तम स्पर्धेत नेहमीच आपला ठसा उमटवत आले आहे.त्यामुळे यंदा हा संघ काय नवीन घेऊन येत आहे याची उत्सुकता सगळीकडे पाहायला मिळतेय.यंदा फर्ग्युसन तर्फे पुरुषोत्तम करंडक  किशोर गरड हा बसवत असून नाटकाच्या तालमीही सध्या सुरु झाल्या आहेत.
    फर्ग्युसन,माणूस व निसगार्तील संघर्ष यंदाच्या नाटकातून मांडणार असून नाटकातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे किशोर लोकमतशी बोलताना म्हणाला.
 
 
गरवारे वाणिज्य महाविद्यालय
 
मागील वर्षी नंबरात आलेला गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचा संघ यंदाही करंडकावर आपली मोहोर उमटवण्यासाठी सज्ज झाला आहे.मागील वर्षी अभिनयाची बक्षीसंही गरवारेने पटकवलेली होती.त्यामुळे या संघाकडून यंदा अजून अपेक्षा उंचावलेल्या आहेत.
     या संघाच्या तालमी जोरदार सुरु झाल्या असून संहिता व अभिनयावर जास्त भर देण्याचा प्रयत्न संघ करत आहे.संहितेनुरुप कलाकारांची निवड करणार असून यंदाही पुरुषोत्तमवर संघाचे नाव कोरण्याचा मानस या संघाचा दिग्दर्शक ऋषीकेश टेंभे याने लोकमतशी बोलताना व्यक्त केला.
 
कावेरी महाविद्यालय
 
कावेरी महाविद्यालयाची तयारी जोरदार सुरु झाली असून यंदा चांगलं सादरिकरण करण्याचा विश्वास कावेरी संघाचा दिग्दर्शक प्रणव रत्नापारखी याने लोकमतशी बोलताना व्यक्त केला.कावेरीने कधी करंडक मिळवला नसला तरी यंदा हा संघ पुर्ण तयारीने स्पर्धेत उतरण्यास सज्ज झाला आहे. 
     नाटकाच्या तालमी सुरु झाल्या असून विषयाशी निगडीत इंप्रोवायझेशन केले जात आहेत.वेळेचे योग्य नियोजन केले असल्याने विद्यार्थ्यांकडून लेक्चरसही केली जात आहेत.मुलांचा उत्साह खूप असून,पुरुषोत्तमसाठी नवनवीन आरोळ््याही या संघाने तयार केल्या आहेत.
 
एम.आय.टी
 
यंदा  एम.आय.टी चा संघ तरुणांचे प्रश्न घेऊन पुरुषोत्तमध्ये सादरीकरण करण्यास सज्ज झाला आहे.पुरुषोत्तम मध्ये नेहमीच वेगवेगळे विषय हाताळले गेले आहेत.त्यामुळे यंदा तरुणांना भेडसवणाºया प्रश्नांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न एम.आय.टी करणार  आहे. 
    यंदा एम.आय.टी कडून चिन्मय लाड हा दिग्दर्शन करत असून आदेश ताजने याने संहिता लेखन केले आहे.संघाची निवड झाली असून तालमींनाही आता वेग आला आहे.यंदा नाटक दमदार करणार असल्याचे चिन्मयने लोकमतशी बोलताना सांगितले.
 
स.प.महाविद्यालय 
 
१०० वषार्ची परंपरा असलेल्या स.प.महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत भाग घेण्यासाठी तयारीला सुरुवात झाली आहे. नुकतीच नाटकाच्या दिग्दर्शकाने नाटकाची निवड चाचणी पार पाडली व नाटकासाठी आवश्यक पात्रांची निवड केली आहे. यंदा सादर करत असलेल्या नाटकामध्ये वेगळ्या धाटणीचा विषय मांडण्याची इच्छा दिग्दर्शक यश रुईकर याने व्यक्त केली.
    नवीन विषय घेऊन स.प महाविद्यालय प्रेक्षकांसमोर येत असूून यंदाही जोरदार सादरिकरण करण्याल संघ सज्ज झाला आहे.
 
 
मॉडर्न
 
नव्या जोमाने व उत्साहाने यंदा मॉडर्नचा संघ पुरुषोत्तमसाठी सज्ज झाला असून पहिल्या नवात जाण्याचा मानस नाटकाचा दिग्दर्शक चिन्मय टिपणीस याने लोकमतशी बोलताना व्यक्त केला.तालमींना वेग आला असून पात्रांची निवड झाली आहे.
    कार्यशाळेच्या माध्यमातून नवीन कलाकारांना अभिनयाचे प्रशिक्षण देण्यात आले असून दमदार सादरिकरण करण्यास हा संघ तयार झाला आहे. अभिनयाला पुरुषोत्तमध्ये अधिक महत्त्व असल्याने जास्त वेळ तालिम संघाकडून केली जात आहे.
 
सी.ओ.ई.पी
दर्जेदार नाटके प्रेक्षकांसमोर घेऊन येणारा सी.ओ.ई.पीचा संघ यंदाही नवीन विषयासोबत सादरिकरणास सज्ज झाला आहे.इंजिनिअरिंगच्या अभ्यासामुळे तालमींना कमी वेळ मिळत जरी असला तरी मिळालेल्या वेळेचा सदउपयोग करुन उपयुक्त तालिम सध्या हा संघ करीत आहे.टिम बॉण्डिंग उत्तम झाली असून संहितेला योग्य ज्ञाय देण्याचा प्रयत्न संघाचे कलाकार करत आहेत.सुमित घोलवड यंदा पुरुषोत्तम या संघाकडून दिग्दर्शीत करत असून दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रतिस्पर्धी संघांना कडवी टक्कर हा संघ देणार यात काही शंका नाही.
 
टीम पुरुषोत्तमचा कल्ला 
नम्रता फडणीस, प्रज्ञा केळकर- सिंग, प्राची मानकर,  निलेश बुधावले,  राहुल गायकवाड, प्रीती जाधव, प्रसाद कदम
 

 

Web Title: VIDEO: Purushottam kalla ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.