VIDEO- करवीर निवासिनीच्या दर्शनासाठी रांगा
By admin | Published: May 14, 2017 09:00 PM2017-05-14T21:00:44+5:302017-05-14T21:00:44+5:30
शनिवार व रविवार सलग सुटीमुळे करवीरनिवासिनी अंबाबाई दर्शनासाठी आलेल्या भाविकांमुळे शहरात रविवारी गर्दी ओसंडून वाहत होती.
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 14 - शनिवार व रविवार सलग सुटीमुळे करवीरनिवासिनी अंबाबाई दर्शनासाठी आलेल्या भाविकांमुळे शहरात रविवारी गर्दी ओसंडून वाहत होती. भाविकांच्या अलोट गर्दीमुळे दर्शनरांगा अक्षरश: ओसंडून वाहत होत्या.
शाळांचे निकाल लागून उन्हाळी सुटी सुरू झाल्याने शहरवासीयच नव्हे, तर राज्यांसह परराज्यांतील भाविकांनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. सकाळी सात वाजल्यापासून करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराचे चारही दरवाजे गर्दीने फुलून गेले होते आलेल्या भाविकांच्या चारचाकींमुळे तर दुपारनंतर बिंदू चौक येथील पार्किंग फुल्ल झाल्याने वाहनांच्या गर्दीमुळे वाहने भाऊसिंगजी रोड व बिंदू चौकात थांबून होती. विद्यापीठ हायस्कूल, सरस्वती चित्रमंदिर, साकोली कॉर्नर, शिवाजी रोड आदी ठिकाणी वाहने पार्किंग करण्यात आली होती. परराज्यांसह राज्यातील भाविक रविवारचा सुटीचा दिवस म्हणून अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने खासगी व स्वत:च्या वाहनाने कोल्हापुरात दाखल झाले होते. पहाटे सहा वाजल्यापासून भाविकांनी दर्शनरांगेत गर्दी केली होती. भवानी मंडप, महाद्वार रोड, जोतिबा रोड, बिनखांबी गणेश मंदिर, बिंदू चौक, शिवाजी चौक आदी परिसरात भाविक रस्त्यावरील वस्तू खरेदी करताना दिसत होते. दुपारनंतर दर्शनरांगेत उभारणाऱ्या भाविकांचा ओघ वाढला. त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. उन्हाळी सुटीमुळे यात्री निवास, लॉज, खासगी घरे, धर्मशाळा आदी भाविकांनी फुल्ल झाली होती. परिसरातील खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर मोठी गर्दी दिसत होती. रविवारी दिवसभरात लाखो भाविकांनी करवीरनिवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. भवानी मंडप येथे पहाटेपासूनच करवंदे, जांभळे, फणसाचे गरे आदी विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात मलकापूर, आंबा आदी परिसरातील महिला विक्रेत्या आल्या होत्या. या रानमेव्याचा आनंद पर्यटक भाविकांनी लुटला. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने मंदिर परिसरात मंडप घातल्याने बाहेरून आलेल्या भाविकांना आतून फिरताना उन्हाचे चटके जाणवले नाहीत. त्यामुळे या व्यवस्थेचे कौतुक भाविकांनी केले. रात्री गर्दीचा ओघ कमी झाला.