VIDEO - नाशिकमधील मुघल स्थापत्यकलेचा दुर्मिळ नमुना
By Admin | Published: July 6, 2016 09:24 AM2016-07-06T09:24:35+5:302016-07-06T12:38:50+5:30
नाशिकमधील शालिमार येथील शहाजहांनी मशीददेखील मुघलकालीन असून दुर्मिळ व देखणी आहे.
अझहर शेख,
नाशिक, दि. ६ - मुघल स्थापत्यकला ही आगळीवेगळी मानली जाते. कारण या स्थापत्यकलेनुसार बांधण्यात आलेल्या भारतातील जामा मशीद असो किंवा ताजमहाल अशा सर्वच मुघलकालीन वास्तू दुर्मिळ व देखण्या अशाच आहे. शहरातील शालिमार येथील शहाजहांनी मशीददेखील मुघलकालीन असून, इसवी सन १६११-१२च्या सुमारास मिर्झा शहाबुद्दीन बेग मुहम्मद खान शहाजहांन हे गव्हर्नर असताना नाशिकमध्ये (तेव्हाचे गुलशनाबाद) दोन वर्षे मुक्कामी होते. तेव्हा त्यांनी शहाजहांनी मशिदीचे बांधकाम स्वखर्चाने केल्याची माहिती देखभाल करणारे पीरजादा कुटुंबीयाच्या चौदाव्या पिढीचे हाजी वसीम पीरजादा यांनी दिली.
मुघलकाळातील काही वास्तू आजही शहरात टिकून आहे. मुघल स्थापत्यकलेची आकर्षक रचना बघण्यासाठी या वास्तूंना एकदा तरी भेट द्यावी. शहरात शहाजहांनी ईदगाह, जहांगीर मशीद या वास्तूही मुघलकालीन स्थापत्त्यकलेची साक्ष देतात.
सैन्यदलाचा प्रमुख असताना शहाजहांन नाशिक शहरात १६११-१२ साली नाशिक शहरात आला असताना दोन वर्षे मुक्कामी होता. यावेळी सुफी संत हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांची भेट घेतली. यावेळी बाबांच्या हस्ते शहाजहांनने शहाजहांनी मशिदीची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. शहाजहांन बादशाने स्व-खर्चाने या मशिदीचे बांधकाम पूर्ण केले. मुघलस्थापत्यकलेनुसार ही मशीद संपूर्ण दगडांमध्ये बांधण्यात आली आहे. या मशिदीची क्षमता सुमारे सातशे-आठशे लोकांची आहे. या मशिदीची देखभाल दुरुस्तीची सर्व जबाबदारी पहिल्यापासून पीरजादा कुटुंबाकडे आहे. काळानुरूप मशिदीच्या बांधकामाची डागडुजी करण्यात आली आहे; मात्र हे करताना दगडांवर जशी पानाफुलांचे नक्षीकाम होते तसेच नक्षीकाम पुन्हा सीमेंटच्या बांधकामावरही करण्यात आले आहे. मशिदीला तीन घुमट असून, ते संपूर्ण काळ्या दगडातील आहे. शहरातील तीन घुमट असलेली ही एकमेव मशीद आहे. या मशिदीचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे मनोरा (मीनार) नाही. चारशे वर्षांपूर्वी ज्याप्रमाणे शहाजहांनच्या सैन्याने मशिदीची उभारणी केली. त्याचप्रमाणे मशिदीच्या बांधकामाची जोपासना करण्याचा प्रयत्न विश्वस्तांकडून आजही केला जात आहे. मशिदींना मीनार व दर्ग्यांवर घुमट असतात; मात्र या मशिदीचे बांधकाम या रचनेला अपवाद आहे. शहाजहांनी मशिदीवर एक नव्हे तर तीन एकसारखे घुमट आहेत.
शहरासह जिल्ह्यातील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले हुसेनी बाबा यांनी त्यावेळी शहाजहांनी मशिदीमध्ये सर्वप्रथम आपल्या भक्तांसोबत नमाजपठण केल्याचे पीरजादा सांगतात. तसेच या मशिदीमध्ये आजपर्यंत विविध ज्येष्ठ धर्मगुरूंनी नमाजपठण केल्याचा इतिहास आहे. यामध्ये मुफ्ती आजम-ए-हिंद हजरत अब्दुल मुस्तुफा रजा, मुफ्ती रजबअली शाह, मुफ्ती शरीफुलहक, मुफ्ती जलालोद्दीन अमजदी यांचा समावेश आहे. शहरातील सर्वांत जुनी मशीद म्हणून शहाजहांनी मशिदीकडे बघितले जाते. या मशिदीभोवती तीन जुन्या विहिरीदेखील त्या काळात खोदण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक विहीर ही संपूर्ण परिसरातील नागरिकांची तहान भागवत होती. काळानुरूप या विहिरी बुजल्या आहेत. मशिदीला लागूनच पीरजादा कुटुंबीयांचे कब्रस्तानही आहे.
मशिदीच्या विश्वस्तांनी नुकताच नवीन वजुखाना परिसरात उभारला आहे. शहरातील सर्व मशिदींपैकी एक आदर्श असलेला हा वजुखाना आहे. या ठिकाणी कमी पाणी जाणाऱ्या तोट्या बसविण्यात आल्या आहेत. या वजुखान्यामधील फरशीचे केलेले बांधकामही देखणे आहे.