VIDEO: नातेवाईकांनाच करावी लागते रुग्णांची स्ट्रेचरवरून ने-आण!
By Admin | Published: October 3, 2016 06:37 PM2016-10-03T18:37:20+5:302016-10-03T19:27:11+5:30
पश्चिम विदर्भाचे ट्रामा केअर सेंटर अशी ओळख असलेल्या अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होण्याचे प्रकार
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 3- पश्चिम विदर्भाचे ट्रामा केअर सेंटर अशी ओळख असलेल्या अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहे. रुग्णांच्या सेवेसाठी आरोग्य कर्मचारी व वार्ड बॉय असतानाही रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना एका वार्डमधून दुसºया वार्डमध्ये हलविण्याचे काम त्यांच्या नातेवाईकांनाच करावे लागते. रुग्णाचे नातेवाईकच रुग्णाला स्ट्रेचरवरून ने-आण करीत असल्याचे चित्र या रुग्णालयात नेहमीच पहावयास मिळते.
सर्वोपचार रुग्णालयात अकोला जिल्ह्यासह लगतच्या वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील हजारो रुग्ण दररोज उपचारार्थ दाखल होतात. या रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे हा त्यांचा अधिकार आहे; परंतु येथे रुग्णांची हेळसांड होते. अपघात कक्षात रुग्णाची नोंद झाल्यानंतर तेथून त्यांना संबंधित वार्डमध्ये स्ट्रेचरवरून हलविण्यासाठी रुग्णालयात वार्ड बॉय, परिचरांची नियुक्ती आहे. परंतु, हे सेवक रुग्णालयात उपस्थितच नसतात. त्यामुळे नातेवाईकांनाच स्ट्रेचरवरून रुग्णांना हलवावे लागते. अपघात कक्ष ते अतिदक्षता विभागापर्यंतचा रस्ता गुळगुळीत नसल्याने स्ट्रेचरला हादरे बसतात. परिणामी रुग्णाला त्रास सहन करावा लागतो.