VIDEO - क्रीडा क्षेत्रात रेश्मा माने "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर"

By Admin | Published: April 11, 2017 08:46 PM2017-04-11T20:46:41+5:302017-04-11T23:11:15+5:30

शेतकऱ्याची मुलगी ते आंतराष्ट्रीय कुस्तीपटू अशी वाटचाल करणारी कोल्हापुरची कुस्तीपटू रेश्मा अनिल माने हिने यावर्षीचा क्रीडा क्षेत्रातील महाराष्ट्रीयन ऑफ द इयर मान पटकावला.

VIDEO - Reshma Mane in the field of sports "Lokmat Maharashtrian of the Year" | VIDEO - क्रीडा क्षेत्रात रेश्मा माने "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर"

VIDEO - क्रीडा क्षेत्रात रेश्मा माने "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर"

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - आमिर खानच्या दबंगमधील गीता आणि बबिता या फोगट बहिणींप्रमाणेच शेतकऱ्याची मुलगी ते आंतराष्ट्रीय कुस्तीपटू अशी वाटचाल करणारी कोल्हापुरची कुस्तीपटू रेश्मा अनिल माने हिने यावर्षीचा क्रीडा क्षेत्रातील महाराष्ट्रीयन ऑफ द इयर मान पटकावला.  या विभागात ऑलिम्पियन दत्तू भोकनळ, महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना, सायकलपटू ऋतुजा सातपुते, कुस्तीपटू रेश्मा माने आणि युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ यांना नामांकन मिळाले होते. त्यात रेश्मा माने हिने बाजी मारली.  
मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळा सुरू आहे. आहे. आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने समाजाला दिशा आणि प्रेरणा देण्याचा वसा घेतलेल्या सेवाव्रतींचा गौरव करण्याच्या "लोकमत"च्या संकल्पाचे चौथे पर्व यंदा साकारत आहे. युपीएएल प्रस्तुत लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पॉवर्ड बाय कर्म आणि अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने साकारत आहे. 
 
रेश्मा माने हिने  शेतक-याची मुलगी ते आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू असा प्रवास केला आहे. सरावासाठी रेश्माने मुलांबरोबर दोन हात केले. गावातील जत्रेच्या फडात कुस्त्या जिंकणारी रेश्मा आज आंतरराष्ट्रीय मैदाने गाजवत आहे. ऐपत नसतानाही रेश्माच्या सरावात खंड पडू नये, यासाठी तिच्या कुटुंबीयांनी तिला घरातच आखाडा बांधून दिला. सुशिक्षित समजल्या जाणा-या अनेक घरांत मुलींना दुय्यम वागणूक मिळत असताना, वडणगेसारख्या खेडेगावात एक कुटुंब मुलीला कुस्तीपटू बनविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. रेश्माचा जन्म शेतकरी कुटुंबातला. आई-वडील शेतकरी. आपल्या मुला-मुलींना कुस्ती शिकवायची हे मानेंचे ध्येय. या ध्येयातूनच रेश्माची जडणघडण होत गेली. वयाच्या ६ व्या वर्षापासून रेश्मा कुस्तीशी जोडली गेली. वयाच्या ८ व्या वर्षी रेश्माने प्रत्यक्ष कुस्तीत पदार्पण केले. यानंतर, पदके जिंकण्याचा तिने सपाटाच सुरू केला, तो आजतागायत सुरू आहे.  
 
हा सोहळा थेट पाहा फेसबुकवर...
 
facebook.com/lokmat
 
(मला किती दिवसांसाठी मुख्यमंत्री करणार ? आठवलेंचा फडणवीसांना प्रश्न)
(मेडिकल क्षेत्रात डॉ. मुफ्फझल लकडावाला यांचा लोकमत "महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" पुरस्काराने गौरव)
 
रेश्माच्या कुस्तीमधील कारकीर्दीविषयी थोडक्यात माहिती 
वयाच्या आठव्या वर्षी प्रत्यक्ष कुस्तीच्या आखाड्यात उतरणाऱ्या रेश्मा हिने आतापर्यंत अनेक स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीस्पर्धांमध्ये विविध पदके पटकावली आहेत.  तिने सिंगापूर येथे झालेल्या कॉमनवेल्थ वरिष्ठ महिलांच्या फ्री स्टाईलमध्ये ६३ किलो गटात सुवर्ण पदक पटकाविले. अशी कामगिरी करणारी ती महाराष्ट्राची एकमेव महिला कुस्तीगीर ठरली. २०१६ मध्ये रेश्माने ऑल इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धेत कांस्य पदक, गोंडा (उत्तर प्रदेश) येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ग्रीको रोमन गटात ६३ किलोगटात रौप्य पदक, पुणे महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या महापौर केसरी कुस्ती स्पर्धेत महिला खुल्या गटात सलग तिस-यांदा विजेतेपद, म्हैसूर येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक, मेकीन (फ्रान्स) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कनिष्ठ महिला कुस्ती स्पर्धेत ६७ किलो गटात चौथा क्रमांक, गोंडा (उत्तर प्रदेश) येथे झालेल्या राष्ट्रीय वरिष्ठ गट महिला कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक अशी पदके मिळविली आहेत. २३ फेब्रुवारी २०१७ रोजी हरियाणा येथे झालेल्या अखिल भारतीय विद्यापीठीय कुस्ती स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करीत, रौप्य पदक पटकाविले. आजपर्यंत रेश्माने २५ पेक्षा जास्त सुवर्ण पदके मिळवली आहेत. ‘ऑलिम्पिक’मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून, सुवर्ण पदक पटकाविणे हे रेश्माचे ‘लक्ष्य’ आहे.
 
या भूमीशी ज्यांनी रक्ताचे आणि घामाचे नाते जोडले, ज्यांनी आपले आयुष्य इथल्या समृद्धीसाठी वेचले, अशा महाराष्ट्रीयनांचा सन्मान करण्यासाठी "लोकमत"ने सुरू केलेल्या पुरस्काराची एव्हाना परंपरा झाली आहे. "लोकमत"च्या संपादकीय चमूने केलेले मंथन, जगभरातील कोट्यवधी वाचक तसेच नामवंत ज्युरींचा कौल यातून विजेत्यांची निवड साकारत आहे. १४ क्षेत्रांमधील प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या मान्यवरांप्रमाणेच राज्याच्या कानाकोपऱ्यात इतरांना प्रेरणादायी ठरेल, अशा कार्याचे बीज पेरणाऱ्यांचाही शोध या निमित्ताने घेतला गेला. समाजमनावर प्रभाव टाकणाऱ्या तसेच विकास आणि समृद्धीच्या वाटचालीत भर टाकलेल्या नानाविध क्षेत्रांमधील प्रतिभेचा आरसा म्हणून युपीएल प्रायोजित "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" पुरस्कारांकडे पाहिले जात आहे.
 
ज्यांनी महाराष्ट्राचे नाव उंचावले, इथल्या मातीची शान वाढविली आणि इथे प्रगती घडवून आणली अशा १४ क्षेत्रांतील मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी लोकमतने उचललेले पाऊल हे आता केवळ सोहळा नव्हे, तर गौरवशाली परंपरा बनू पाहात आहे.
लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराच्या यंदाच्या चौथ्या पर्वातील विजेते ठरविण्याची मोलाची कामगिरी महाराष्ट्राच्या अभिमानात भर टाकणाऱ्या ११नामांकित ज्युरींनी पार पाडली आहे. जाहीर झालेली नामांकने, त्यावर जगभरातील वाचकांनी भरभरून दिलेली मते या पार्श्वभमीवर तब्बल साडेतीन तासांच्या विचार मंथनातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह ११ नामवंत ज्युरींनी विजेत्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. 
 
‘लोकमत’ने केलेल्या मंथनातून जाहीर झालेली १४ कॅटेगरीतील नामांकने आणि लोकमताचा कौल यावर अंतिम निवडीचा साज चढविण्याची जबाबदारी आनंदाने पार पाडणाऱ्या ज्युरी मंडळात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, डॉ. प्रकाश आमटे, अर्णव गोस्वामी, मिलिंद देवरा, महेश भट्ट, विक्रम लिमये, विक्रम श्रॉफ, सुनील सूद, डॉ. रमाकांत पांडा, विजय दर्डा आणि मृणाल कुलकर्णी यांचा सहभाग आहे.
 
यंदा मोलाची भर...: आता चौथ्या पर्वात "लोकसेवा-समाजसेवा", "परफॉर्मिंग आर्ट्स", "कला", "क्रीडा", रंगभूमी, मराठी चित्रपट, "उद्योग", ‘पायाभूत सेवा’, "राजकारण", "प्रशासन (आश्वासक)" यातील एकंदर १३ कॅटेगरींसह "वैद्यकीय" क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या १४ पुरस्कारांच्या व्यतिरिक्त स्पर्धेच्या पलीकडे जाणारे उत्तुंग कर्तृत्व सिद्ध केलेल्या सहा महनीय व्यक्तींना विशेष पुरस्कार दिला जाणार आहे.
 
नामांकन प्राप्त व्यक्तींना जगभरातील वाचकांनी लोकमतच्या वेबसाइटवर मतदानाद्वारे दिलेली पसंती तसेच ११ नामवंत ज्युरींचा कौल यांच्या एकत्रित विचारातून या पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत. तब्बल दोन दशलक्ष वाचकांनी या मतदानात सहभागी होत १४ कॅटेगरीतील नामांकनांसाठी दीड कोटी मते नोंदविली.
 
सर्व पुरस्कारांच्या माहितीसाठी क्लीक करा
 
lmoty.lokmat.com

Web Title: VIDEO - Reshma Mane in the field of sports "Lokmat Maharashtrian of the Year"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.