VIDEO- तासगावच्या रथोत्सवाला अलोट गर्दी

By admin | Published: September 6, 2016 05:47 PM2016-09-06T17:47:00+5:302016-09-06T20:32:03+5:30

तासगाव येथील गणपतीचा २३७वा ऐतिहासिक रथोत्सव मंगळवारी भाविकांच्या अलोट गर्दीत आणि उदंड उत्साहात पार पडला.

VIDEO-Rhapsody | VIDEO- तासगावच्या रथोत्सवाला अलोट गर्दी

VIDEO- तासगावच्या रथोत्सवाला अलोट गर्दी

Next

ऑनलाइन लोकमत

सांगली, दि. 6 - मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात तासगावच्या ऐतिहासिक आणि प्रसिध्द गणपतीचा २३७ वा रथोत्सव मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडला. पाच तासांहून अधिक काळ सरू असलेल्या रथ यात्रेत राज्यभरातून आलेल्या भाविकांनी हजेरी लावली. गुलालाच्या उधळणीत रंगलेल्या भाविकांच्या उत्साहाचा भक्तीसागर सर्वांनी अनुभवला. 

तासगावचा उजव्या सोंडेचा गणपती राज्यासह देशभर प्रसिध्द आहे. नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असल्यामुळे इथल्या दीड दिवसाच्या गणपती विसर्जन आणि रथोत्सवात सहभागी होण्यासाठी सांगली जिल्ह्यासह राज्यभरातील गणेशभक्तांनी मोठ्या उत्साहाने हजेरी लावली. गणपती पंचायतन व पटवर्धन संस्थानचा यंदाचा २३७ वा रथोत्सव होता. ९६ फूट उंच असणारे गोपुर, तीन मजली आणि तीस फूट उंचीचा, चारचाकी रथदेखील प्रसिध्द आहे. हा रथ गणेशभक्तांनी दोरखंडाच्या साहाय्याने ओढण्याची महाराष्ट्रातील एकमेव परंपरा आहे. सार्वजनिक रथोत्सवाची सुरुवात तासगावचे परशुरामभाऊ पटवर्धन यांनी सुरू केली. सर्व जाती-धर्मातील लोकांनी एकत्र येऊन हा रथ ओढण्याची परंपरा आहे. सामाजिक ऐक्याची प्रेरणा देणाऱ्या या उत्सवात रथ ओढण्यासाठी भाविकांत झुंबड उडाली होती. 

मंगळवारी सकाळी राजवाड्यात श्रीमंत राजेंद्र पटवर्धन यांच्याहस्ते आरती झाली. दुपारी १२ वाजता वाद्यांच्या गजरात पालखीतून मातीच्या मूर्तीचे व ऐतिहासिक १२५ किलोच्या पंचधातूच्या मूर्तीचे राजवाड्यात आगमन झाले. पालखीसमोर पारंपरिक गोंधळी, होलार व कैकाडी समाज मानाने वादन करीत होता, तर संस्थानची गौरी हत्तीण दिमाखात चालत होती. गणेशमूर्ती मंदिरात आल्यावर तिची विधिवत पूजा करण्यात आली. आरतीनंतर दोन्ही मूर्ती पालखीत ठेवण्यात आल्या. संस्थानचा रथ केळीचे खुंट, फुलांच्या माळा व नारळाच्या तोरणांनी सजवला होता. नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असल्याने रथास तोरण बांधण्यासाठी गणेश भक्तांची झुंबड उडाली होती.
रथासमोर अनेक झांजपथक व गोविंदा मंडळांनी आपल्या कला सादर करताना रथास मानवंदना दिली. मातीच्या व पंचधातूच्या मूर्ती रथामध्ये ठेवण्यात आल्या. आरती म्हटल्यानंतर रथोत्सवास सुरुवात झाली. झांज पथकाचा ठेका, मोरयाऽऽ मोरयाऽऽ चा जयघोष व गुलाल, पेढ्यांच्या उधळणीत दुपारी १ वाजून २० मिनिटांनी रथ ओढण्यास सुरुवात झाली. रथ ओढताना रथातून भाविकांवर गुलालाची उधळण होत होती. तसेच पेढे, खोबरेही रथ ओढणाऱ्या भाविकांना दिले जात होते. 
गणपती मंदिरपासून अर्धा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या काशी विश्वेश्वराच्या मंदिराजवळ रथयात्रा पोहोचल्यानंतर, आरती करुन शास्त्रशुद्ध पद्धतीने मातीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर रथाचा परतीचा प्रवास सुरु झाला. चार तासांच्या मिरवणुकीनंतर तासगावचा ऐतिहासिक २३७ वा रथोत्सव शांततेत पार पडला.

Web Title: VIDEO-Rhapsody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.