VIDEO- रेल्वेतील चहा-बिस्किटातून लूट

By admin | Published: August 27, 2016 01:49 AM2016-08-27T01:49:28+5:302016-08-27T01:49:28+5:30

लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये चहा विकणाऱ्यांकडून प्रवाशांची होणारी फसवणूक एका प्रवाशाने उघडकीस आणली.

VIDEO - Robbery in tea-biscuits | VIDEO- रेल्वेतील चहा-बिस्किटातून लूट

VIDEO- रेल्वेतील चहा-बिस्किटातून लूट

Next

गौरी टेंबकर-कलगुटकर,
मुंबई- लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये चहा विकणाऱ्यांकडून प्रवाशांची होणारी फसवणूक एका प्रवाशाने उघडकीस आणली. इतकेच नव्हेतर, लुबाडणाऱ्या रेल्वेच्या कंत्राटदारालादेखील त्याने चांगलाच धडा शिकविला.
दीपक जाधव असे या प्रवाशाचे नाव आहे. ते मूळचे गोरेगावचे रहिवासी असून, ते ‘लोकसेवा प्रतिष्ठान’ या संस्थेचे अध्यक्ष आहेत. देवगड या त्यांच्या गावी गेलेले जाधव ५ जुलै रोजी कणकवलीहून मुंबईला जनशताब्दी गाडीने परतत होते. त्या वेळी संध्याकाळी गाडीत चहा विकणाऱ्या एका व्यक्तीकडे त्यांनी चहा मागितला. तेव्हा त्या चहाची किंमत त्याने १० रुपये असल्याचे सांगितले. त्यामुळे जाधव यांनी त्याच्याकडे मेन्युकार्ड मागितले. तेव्हा मेन्युकार्ड न दाखवता त्याने चक्क जाधव यांना ‘लेने का है तो लो, वरना जाओ,’ असे उत्तर दिले. त्या वेळी त्यांनी तुझ्या मॅनेजरला बोलव, असे सांगितले. तेव्हाही ‘तुम जाकर बुलाकर लाओ,’ असे उत्तर त्याने जाधव यांना दिले. अखेर जाधव यांनी आवाज चढवला, तेव्हा कोणीतरी जाऊन चहा विक्रेत्यांचा मॅनेजर ए. के. राय जो सनशाईन प्रायव्हेट लिमिटेड नामक कंपनीचा प्रमुख आहे, त्याला बोलावून आणले.
राय आल्यानंतर जाधव आणि अन्य प्रवाशांनी रायला घेरले आणि त्याची चांगलीच कानउघाडणी केली. मुख्य म्हणजे ज्यांना ज्यांना १० रुपयाने एक कप चहा विकण्यात आला होता त्या सर्वांना ३ रुपये परत करण्यास सांगण्यात आले. ज्यात वातानुकूलित डब्यातील प्रवाशांचादेखील समावेश होता. त्यानंतर या प्रकरणी टीसीकडे तक्रार करण्यात आली. ज्याची प्रत ‘लोकमत’कडे आहे. दोषींवर काय कारवाई करणार, असे विचारले असता त्यांना मेमो देण्यात येईल, असे उत्तर टीसीकडून देण्यात आले. दर दिवशी लाखो प्रवासी या ट्रेनने प्रवास करतात. त्यामुळे दिवसभरात गाडीत चहा पिणाऱ्यांची संख्यादेखील तितकीच मोठी आहे. त्यानुसार प्रत्येकाकडून ३ रुपये अधिक आकारले जात असतील तर रेल्वेचे कंत्राटदार महिनाभरात लोकलमधून किती रुपयांची फसवणूक करत असतील? याचा नुसता अंदाजच केलेला बरा, अशी प्रतिक्रिया एका प्रवाशाने दिली.
>‘बिस्किट मिळालेच नाही!’ : ‘आम्ही राय याला अख्ख्या रेल्वेत फिरवले आणि त्याच्या माणसांनी कोणाकोणाला चहा विकला याबाबत विचारणा केली. तेव्हा ज्यांना या लोकांनी चहा विकला त्या प्रत्येकाकडून चहाच्या एका कपासाठी १० रुपये आकारण्यात आले मात्र कोणालाही बिस्किटचा पुडा मिळाला नसल्याचे उघड झाल्याचे जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
>प्रत्येक डब्यात रेटकार्ड लावा
दर दिवशी प्रवाशांची नकळतपणे फसवणूक करणाऱ्या कंत्राटदारांना धडा शिकवायचा असेल तर खाद्यपदार्थाचे रेटकार्ड प्रत्येक डब्यात लावण्यात यावे, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. कारण हे कार्ड नेहमी लपविले जाते आणि त्याचा गैरफायदा उठविला जातो.
>जाधव आणि राय यांच्यात झालेला संवाद
जाधव : चाय कितने मे बेचते हो?
राय : सात रुपया
जाधव : तो दस दस रुपया क्यो लेते हो?
राय : छोटा बिस्किट का पेकेट देते है साथ मे...
जाधव : मगर किसी को भी नही मिला बिस्किट
ट्रेन मे
राय : तभी तो पैसा वापस दिया
जाधव : रेटकार्ड किधर है?
राय : हमारे पास है साब
जाधव : तो छुपाते क्यों हो?
राय : निरुत्तर

Web Title: VIDEO - Robbery in tea-biscuits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.